Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Viewing all 2339 articles
Browse latest View live

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाचे खरे प्रश्न वेगळेच!

$
0
0

‘हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग’ही बातमी (२ ऑक्टो.) वाचली. महाराष्ट्रातल्या फार कमी लोकांनी हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा पाहिलेला आहे. एका फोटोमध्ये लाल रेषेने दाखवलेला भाग तडा गेलाय असे म्हटले आहे जो की एकूण कडय़ाच्या दोन टक्के भाग पण नसेल आणि असे भासवण्यात येत आहे की कोकणकडा धोक्यात आहे.
दुसऱ्या फोटोत दाखवल्याप्रमाणे त्या कडय़ाची जाडी एवढी आहे की तो ढासळण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसऱ्या फोटोतल्या माणसांच्या आकारावरून त्या दगडाच्या जाडीचा अंदाज येऊ शकेल. रानवाटा संस्था गेली १० र्वष हरिश्चंद्रगडावर सफाई मोहिमा राबवते आहे आणि त्या जागेचा अभ्यास करते आहे. आमच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे आणि प्रश्न : संस्थेच्या फोटोग्राफी रेकॉर्ड्सनुसार गेल्या १० वर्षांत कडय़ावरचा एक दगडही हललेला नसून ती भेग दाखवली जात आहे ती कित्येक र्वष जुनी आहे. (मुळात ती भेग अशी नाहीच आहे.)
नसíगक रचनेने बनलेला कोकणकडा आज महाराष्ट्राचे भूषण बनले पाहिजे होते. पण आज तो विद्रूप कसा दिसू शकेल आणि पैसा कसा खाता येईल या दिशेने प्रवास सुरू झाला आहे, असा संशय येतो. आतापर्यंत दोनदा कोकणकडय़ावर रेलिंग लावण्यात आले आणि कडय़ाचे सौंदर्य विद्रूप करण्यात आले. महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांनी ते बाजूला काढून ठेवले असता पुन्हा नवीन खर्च दाखवून ते पुन्हा उभे करण्यात आले. त्यानंतर मात्र ते गिर्यारोहकांनी उखडून दरीत फेकून दिले. यामागचे कारण असे की वादळी पावसात लोखंडाकडे वीज आकर्षति होते आणि त्याचे झटके गिर्यारोहकांना बसलेले आहेत.
हरिश्चंद्रगडावर असलेले खरे प्रश्न आणि गरज : हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर दारू पिणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. कडय़ावरच्या पाटर्य़ामुळे उंदीर वाढले आहेत आणि त्यामुळे सापांची संख्यासुद्धा वाढते आहे. (या पाटर्य़ाविषयी गावकऱ्यांच्या तक्रारीवर स्थानिक आमदाराने दिलेले उत्तर असे की त्याशिवाय पर्यटन वाढणार नाही. तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका.) गडावरच प्लास्टिक खाऊन आसपासच्या गावामधल्या गुरांच्या संख्येवर मोठा फरक पडलेला आहे. हरिश्चंद्रेश्वर या हेमाडपंथीय मंदिरावर सोनकीची फुले उगवली आहेत जे त्या वास्तुरचनेसाठी अत्यंत धोकादायक आहे आणि त्याकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत आहे.
– मंदार करमरकर, विलेपार्ले (मुंबई)

‘छद्मइतिहास’लेखनाचे वास्तव!
देवेंद्र इंगळे यांचा ‘इतिहासाची साक्ष जाणावी!’ (३० सप्टें.) हा लेख वाचला. या लेखातून त्यांनी इतिहास लेखनशास्त्रासारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे सूतोवाच केलेले आहे. त्यांच्या मते वर्तमान राजकीय पाश्र्वभूमीवर ‘जमातवादाची व छद्मइतिहासाची वारंवार चिकित्सा करून पुन:पुन्हा खरा इतिहास मांडत राहण्याची गरज आहे. आज महाराष्ट्र कशाला इतिहास म्हणावे आणि कुणाला इतिहासकार म्हणावे याविषयी संभ्रमात आहे’. इंगळे यांनी कोणाबद्दल हे लिहिले हे नोंदवले असते तर वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असती. ज्याच्याबद्दल लेख लिहायचा आहे त्यांचे नाव न घेता ते वाचकांना ‘बुद्धिवादी-विवेकवादी इतिहासकारांनी त्याविरोधात लेखणी चालविण्याची आणि बोलण्याची गरज आहे’ अशा भाषेत आवाहन करीत आहेत.
लिओपोल रँके नावाच्या इतिहासकाराने No document, no history असे म्हटलेले आहे. इतिहासलेखनात व्यक्तिनिष्ठता येऊ नये हे कितीही वास्तव असले तरी वस्तुनिष्ठता मांडणारा इतिहासकार व्यक्तिनिष्ठेची छाप न ठेवता कुठलाही इतिहास लिहिणे अवघड आहे. इतिहासाचे विविध दृष्टिकोन विकसित झालेले आहेत. उदा. प्रादेशिक, राष्ट्रवादी, मार्क्सवादी, दलित, दुर्लक्षित (Subaltern) यांचा इतिहास. भूतकाळ हा केवळ भूतकाळ कधीही नसतो. रोमिला थापर म्हणतात त्याप्रमाणे भूतकाळ हा वर्तमान म्हणून लोकांना हवा असतो (The Past As Present).
‘ज्यांचा इतिहास शास्त्रातील गंभीर ज्ञानव्यवहाराशी दुरान्वयानेही संबंध नाही असे छद्मइतिहासकार इतिहासातील पेचांवर बोलू लागले आहेत. ही स्थिती अतिशय वेदनादायक आहे’ असे इंगळे म्हणतात. या वाक्याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. ज्यांचा इतिहासाशी दररोज संबंध येतो ती मंडळी जेव्हा गप्प बसतात, निष्क्रिय बनतात स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी कोणतीही भूमिका न घेता ‘नरो वा कुंजरो वा’ची वाट धरतात तेव्हा त्याची फळे काय येतील? कुठलाही संदर्भ न देता जेव्हा समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोक आपापल्या परीने टोकाची भूमिका मांडतात हाच आदर्श घेऊन ब्रिगेडी संस्कृतीत वाढलेले अनेक जातीय संघटनांचे ब्रिगेडी इतिहासकार कोणत्या अव्वल साधनांचा वापर करतात, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’च्या असंख्य टाळ्याखाऊ विधानांना कोणत्या इतिहासाचा आधार आहे, भावनेच्या िहदोळ्यावर हेलकावणाऱ्या महाराष्ट्रात कादंबरीकारांनी मराठीची काय वाट लावली हा मुद्दा जेवढा महत्त्वाचा नाही त्यापेक्षा जास्त इतिहासाच्या प्राध्यापकांनी व महाराष्ट्रातील विद्यापीठातील इतिहास विभागांनी किती वाट लावली हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ज्यांच्या चुली इतिहास विषयाच्या अध्यापनाने पेटतात त्यांच्या अक्षम्य आळसाचा परिणाम म्हणून गेल्या १०-१५ वर्षांत लिहिल्या गेलेल्या कोणत्याही इतिहास ग्रंथांची चिकित्सा का केली नाही, निदान हे ग्रंथ वाचून चूक, बरोबर, साफ खोटे का म्हटले नाही.
ज्यांचा दीर्घकाळ इतिहास विषयाशी संबंध आलेला आहे, जे ८५ पुस्तके लिहिण्याचा दावा करतात त्या नांदेड विद्यापीठातील महनीय अभ्यास मंडळाच्या अभ्यासक्रमावर कटाक्ष टाकला म्हणजे विद्यापीठीय शिक्षणाचे कसे ‘पीठ’ होते आहे हे इंगळे यांना कळेल. दर्जाहीन अभ्यासक्रमाने, प्राध्यापक लिमिटेड दृष्टिकोनाने पिढय़ान्पिढय़ा उद्ध्वस्त करण्याचे अभद्र काम केले जाते आहे. त्यामुळे इतिहास विषय घेऊन प्राध्यापक न झालेल्या लेखकांच्या कुवतीवर शंका घेण्यापेक्षा लाखो रुपये पगार घेणारी सत्य इतिहासकार मंडळी कुठे वामकुक्षी घेत आहेत हे पाहणे फार हितकारी ठरणारे आहे. कोणताही विषय ही कोणा एका वर्गाची मक्तेदारी नसून कोण काय लिहितो यापेक्षा तो किती कसदार लिहितो आहे, संदर्भ कोणते देतो आहे, किती वाचन त्यांनी केलेले आहे, किती वाचकांनी ते वाचलेले आहे, ग्रंथ कोणती प्रकाशन संस्था प्रकाशित करीत आहे त्याच्या विचाराचे मूल्य काय आहे, यावर चर्चा केलेली अधिक उत्तम राहील. ‘बाजारू’, ‘सत्ताधाऱ्यांच्या दिवाणखान्यातील आश्रित भाट’, ‘लोकानुरंजनाचा स्वार्थी धंदा’ करणाऱ्या छद्म्ोतिहासकारांचा विरोध झाला नाही.
भारत हा बहुजाती, बहुधर्मी, बहुवर्गी समाजात विभागलेला आहे. ज्यांच्या ज्यांच्या अस्मिता ज्या गतीने जागृत होतील त्या गतीने ते आपापल्या इतिहासाचे लेखन करीत राहतील. ब्राम्हणांनी आपल्या सोयीचा इतिहास लिहिला. आज दलित, मराठा, िलगायत, राजपूत, धनगर हा समाज पुरेसा जागृत झालेला आहे आणि ब्राह्मणांनी केलेले इतिहास लेखन सप्रमाण समर्थपणे खोडत आहे. इंगळे म्हणतात तसे एखाद्या व्यक्तीचा ‘इतिहासशास्त्रातील गंभीर ज्ञान व्यवहाराशी दुरान्वयानेही संबंध नाही’ हे कशावरून ठरले, कोणी ठरवले, त्यांचे निकष काय? आणि अशी व्यक्ती असंख्य ग्रंथ लिहितात, लोक त्यांची पुस्तके वाचतात, शासनाची व समाजाची अनेक बक्षिसे मिळतात, विद्यापीठे त्याची दखल घेतात, काही ग्रंथाच्या तीन तीन आवृत्त्या प्रकाशित होतात तरीही एकही इतिहास प्राध्यापक ना विरोधासाठी काही लिहितो ना समर्थनार्थ काही लिहितो या बेफिकीर वृत्तीला काय म्हणायचे? उपेक्षास्त्र हा एकच पर्याय मराहाष्ट्रातील अभ्यासकांनी निवडलेला आहे काय? एखादा लेखक केवळ तो इतिहास विषय घेऊन शिकला नाही म्हणून इतिहास लिहिण्यासाठी अपात्र ठरतो की काय? इतिहास लेखन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपणच इतिहासाचे तेवढे जाणकार आणि बाकी सगळे बेकार हा तुच्छताभाव ज्ञान क्षेत्रात टिकणारा नाही. असंख्य विद्वानांनी एकाच वेळी विविध ज्ञान शाखांत लीलया प्रवेश केलेला आहे त्यांनाही आपण विविध शाखांतील पदव्या दाखवा म्हणणार का? ज्यांच्याबद्दल लिहितोय त्यांचे नावही घेण्याचे धाडस न दाखवणाऱ्या इंगळे यांनी कॉ. पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्येच्या निमित्ताने लोकांना लेखणी चालविण्याचे व वाणी चालविण्याचे आवाहन करावे हाही एक विरोधाभासच नव्हे का?
– प्रा. डॉ. बालाजी चिरडे, नांदेड

अखंड असावे सावधान !
‘हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग’ ही बातमी वाचली. साधारणत: २००४ साली या कडय़ाचा माथ्याकडचा काही भाग तुटून खाली पडला होता. त्यावेळी अनेक गिर्यारोहक जखमी झाले होते. या अपघातावेळीच कोकणकडय़ाच्या या संभाव्य अपघाताबाबत खरेतर धोका लक्षात आलेला होता. या वृत्तामुळे त्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. भूशास्त्रीय बदल हे अतिशय सावकाश पद्धतीने होत असतात. यामुळे आजच्या या भेगेकडे दुर्लक्ष करणे भविष्यात खूप धोकादायक ठरू शकते. कारण गडावर येणारे बहुसंख्य पर्यटक या कडय़ावरच रेंगाळत असतात. सुमारे दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा आणि ५०० मीटर उंचीचा हा कोकणकडा अंतर्गोल आहे. उभ्या महाराष्ट्रात असा रौद्रभीषण कडा नाही. ती महाराष्ट्राची संपत्तीच आहे. यामुळे त्याला वाचवणे गरजेचे आहे. या वृत्तामुळे यादृष्टीने काही पावले पडावीत.
मध्यंतरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोकणकडय़ाच्या माथ्यावर लोखंडी कठडे लावलेले होते. ऐकिवात असे आहे, की ते काहीजणांना आवडले नाहीत म्हणून त्यांनी ते उखडून फेकून दिले. दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या टकमक टोकावरील कठडय़ांचीही अशीच मोडतोड केली आहे. वस्तुत: अशा कडय़ांवर अगदी टोकाला गेल्यास तोल जाऊन अपघात होण्याचा धोका असतो. म्हणून अशी लक्ष्मणरेषा असणे गरजेचे आहे. बसवलेले कठडे शाबूत ठेवणे हेही आपले कर्तव्य आहे. ते परस्पर काढून फेकून देणे हा तर राष्ट्रीय गुन्हाच आहे. कोकणकडय़ाच्या पडलेल्या या भेगेकडे तातडीने लक्ष घालणे, त्यावर काही उपाययोजना करणे, तिथे सावधगिरीचे कठडे तातडीने बसवणे हे सारे करणे गरजेचे आहे. ‘लोकसत्ता’ने एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
– प्रा. प्र. के. घाणेकर, पुणे

आता आदिवासींना मार्गदर्शनही करावे
दलालांकडून फसवणूक झाल्याने लवासा प्रकल्पाला विकली गेलेली जमीन काही आदिवासींना आता परत मिळणार आहे. यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. आता त्या आदिवासींना तीच जमीन विकण्यापेक्षा कसून कशी लाभदायक ठरू शकते याचे मार्गदर्शनदेखील कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. त्यासाठी शेतीतील नवीन प्रगत तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेती करावी लागेल. कारण आता उपजीविकेचे साधन नुसते परत मिळून उपयोग नाही, तर ते कुटुंबाच्या उन्नतीचे साधनदेखील ठरले पाहिजे.
– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)

कठडे काढणे चुकीचेच
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाला भेग पडल्याचे वृत्त वाचले आणि मनात धस्स झाले. या कोकणकडय़ाचे आणि गिरिभटक्यांचे खूप जवळचे नाते आहे. दीड किलोमीटर लांबीचा हा कंकणाकृती कडा खरेतर आमचा नैसर्गिक वारसा आहे. कित्येकशे फूट खोल हा कडा देशावरून थेट कोकणात कोसळतो. या कडय़ावरून दिसणारा निसर्ग अवर्णनीय आहे. तळाशी गच्च झाडी, मध्ये कातळ कडा आणि वर अवकाश असे इथे आलो, की निसर्गाचा एक वेगळाच पट पाहायला मिळतो. या साऱ्यांमुळेच हा कडा पर्यटकांपासून ते गिर्यारोहकांपर्यंत सतत मोहिनी घालत असतो.
खरेतर महाराष्ट्राचे भूषण असलेल्या या कडय़ाचे वेळीच जतन, संवर्धन करणे हे अतिशय आवश्यक आहे. शासनाने भूशास्त्रज्ञांच्या मदतीने तातडीने या तडा गेलेल्या जागेला भेट देऊन त्याबाबत उपाययोजना कराव्यात असे सुचवावेसे वाटते. या कडय़ाभोवती सुरक्षेचे कठडे हे सर्वाच्याच सोयीचे असतात. काळजीतून उभ्या केल्या गेलेल्या या कठडय़ांना धक्का लावण्याची वृत्ती चुकीची आहे. हे कठडे पुन्हा उभे करावेत, इथल्या धोक्याची पाटी इथे लावावी.
फक्त या साऱ्या उपाययोजना करताना निसर्ग निरीक्षणात कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. आमच्या महाराष्ट्राचे भूषण असलेल्या या कडय़ास वेळीच जतन करणे हे गरजेचे आहे.
– उष:प्रभा पागे, पुणे

शिवसेनेची पुन्हा स्टंटबाजी!
‘शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द’ ही बातमी (८ ऑक्टो.) वाचली आणि प्रश्न पडला की, राजकीय बाल्यावस्थेतून शिवसेना बाहेर कधी येणार? ‘तुम्ही खूप लोकांना थोडा काळ फसवू शकता किंवा थोडय़ा लोकांना बराच काळ फसवू शकता. पण खूप लोकांना बराच काळ फसवू शकत नाही,’ अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे. तात्पुरता राजकीय फायदा मिळविण्यासाठी पाकिस्तानचे क्रिकेटपटू, कलावंत यांना विरोध करण्याचे डावपेच पूर्णपणे कालबाह्य़ झाले आहेत, हे राजकुमार आदित्यला केव्हा कळणार? त्यातही, शिवसेनेचा पाकिस्तानला एवढा पराकोटीचा विरोध असेल, तर नरेंद्र मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान येणार म्हटल्यावर शिवसेनेने त्या समारंभावर बहिष्कार घालून आधी पाकिस्तानबाबतचे धोरण जाहीर करा; मगच मंत्रिमंडळात सामील होऊ, असे भाजपला ठणकावून सांगायला हवे होते. पण तसे काहीच झाले नाही. परंतु असा स्वाभिमान प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे, हा शिवसेनेचा िपडच नाही.
समाजातील आíथक, राजकीय, सामाजिक ठगांशी शिवसेनेने शेवटपर्यंत लढून दोन हात केल्याचे स्मरत नाही. कचेरीतल्या दाक्षिणात्याला धमकाव, रस्त्यावरच्या भयाला मार, एखाद्या कचेरीतील हतबल अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फास ही यांची वर्षांनुवर्षांची मर्दुमकी राहिली आहे. ज्या मराठी कम्युनिस्टांवर हल्ले करून शिवसेना फोफावली, त्या शिवसेनेने कम्युनिस्टांकडून निदान स्वाभिमानाचे धडे तरी घ्यायला हरकत नाही. २००४ साली ६१ कम्युनिस्ट खासदारांच्या पािठब्याने संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार केंद्रात आले, तेव्हा कम्युनिस्टांनी सत्तेत सहभागी व्हावे म्हणून काँग्रेस आग्रही होती. पण कम्युनिस्टांनी ते निमंत्रण नाकारले. इतकेच नव्हे, तर अमेरिकेशी अणुकरार करण्याच्या प्रश्नावरून सरकारशी मतभेद झाल्यावर त्यांनी सरकारचा पािठबाच काढून घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य होता की नाही, हा मुद्दा वेगळा. पण सत्तेपासून फारकत घेण्यासाठी लागणारे नतिक धर्य कम्युनिस्टांकडे आहे. पण शिवसेनेचे तसे नाही. भाजपकडून सतत अवहेलना होत असूनही सत्तेच्या लालसेपोटी ही मंडळी काही अधिकार नसतानाही केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळात ठाण मांडून आहेत. म्हणजेच, जिथे कणा दाखवायला हवा तिथे वाकायचे आणि नको तिथे दुरभिमान दाखवायचा, असा प्रकार यांच्या बाबतीत आहे.
काही वर्षांपूर्वी राजकुमार आदित्यच्या राजकारण प्रवेशासाठी शिवसेनेने रोिहटन मिस्त्री यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यावरून नव्हती का स्टंटबाजी केली? त्यात मुंबई विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू वेळुकर पडले स्वभावाने शामळू. त्यामुळे यांचे आयतेच फावले.
 जयश्री कारखानीस, मुंबई

गोरक्षण अभ्यासासाठी समिती नेमावी
‘गाईंचे देवत्व सावरकर का नाकारतात’ या मथळ्याच्या पत्रातील (लोकमानस, ६ ऑक्टोबर) सावरकरांचे उद्धृत केलेले विचार गेल्या शतकातील असूनही ते कालबाह्य़ ठरत नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून भारतातील एकूण दूध उत्पादन जगात आघाडीवर असले तरी आपल्याकडील ८० टक्के दूध उत्पादन म्हशी आणि संकरित गाईंचे असून (काही देशी दुधाळ गाई धरूनही) ज्या बिनजातीच्या कोटय़वधी देशी गाई पाळणे अजिबात परवडत नाही, त्यांचा उत्पादनातील वाटा अवघा २० टक्के आहे. आपल्या देशी गाई सरासरीने ६०० लिटर दूध देतात तर अमेरिकेतील गाईचे सरासरी उत्पादन ९००० लिटर. आपल्याला जवळ वाटणाऱ्या इस्रायलमध्ये ते वार्षकि ११ हजार लिटरच्या पुढे गेले आहे. अशी वाटचाल आपल्या देशात होऊ शकली तर ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल; परंतु यासाठी सावरकरांनी सांगितलेले सत्य स्वीकारावे लागेल. घटनेत तरतूद होऊन दीर्घ कालावधी लोटला असल्याने गोरक्षण या विषयासाठी एक समिती नेमावी. ही समिती या विषयाबाबत सांगोपांग अभ्यास करून गोवंशाचे संवर्धन, भाकड जनावरांची संख्या कमी करून शेतीवरील तो बोजा कसा कमी करावा आणि त्याच वेळी मांसाहारी वर्गाची गरज कशी पूर्ण करावी, प्रश्नांवर वैज्ञानिक मत देऊ शकेल.
मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)

साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे थांबवावे
सध्या देशात पुरस्कार परत करण्याची साथ आली आहे असे वाटते. नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी तसेच त्या पूर्वी कर्नाटकातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत केले होते. १२५ कोटी जनतेच्या या देशात अगणित विचारांचे, जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांच्यात सामंजस्य असावे ही अपेक्षा रास्त असली तरी व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे. सरकार कोणाचेही असो, देशात दुर्दैवी घटना घडतच असतात. त्यासाठी सत्तेवर असणाऱ्या सरकारला दोष देताना त्यापूर्वीच्या कोणत्या तरी सरकारने दिलेला पुरस्कार परत करणे हे, पुरस्कारप्राप्त व्यक्ती खरेच त्या पुरस्काराला पात्र होती का, याबाबत शंका उपस्थित होण्यासारखे आहे. त्यामुळे माझी या मान्यवरांना विनंती आहे की, त्यांनी त्यांना पुरस्कार देणाऱ्या सरकारचा, ज्या जनतेच्या वतीने पुरस्कार दिला आहे त्यांचा विचार करून हा आचरटपणा थांबवावा. कारण पुरस्कार परत केल्याने परिस्थिती बदलेल असे काही होणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट सरकारच्या हातात असतेच असे नाही. दुर्दैवी प्रकार थांबण्यासाठी फार मोठय़ा सामाजिक अभिसरणाची आवश्यकता असून ते नजीकच्या काही दशकांत संभवेल असे वाटत नाही.
 उमेश मुंडले, वसई

अभियांत्रिकी व्यथेला तंत्रपरिषद जबाबदार
‘अभियांत्रिकीची व्यथा’ हा अग्रलेख (६ ऑक्टो.) वाचला. याबाबतीत एप्रिल २०१२ मध्ये ‘तंत्र अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये मुबलक वाढ’ अशी बातमी आली होती. त्याहीपूर्वी तीन-चार वर्षांपासून शिल्लक जागांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. त्या वेळी (२०१२) रिक्त जागांची संख्या ६६ हजार होती. त्यामुळे त्या वर्षी नव्याने वाढीव जागा व नवीन महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, असे पत्र राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेला लिहिले होते. त्याची दखल न घेता परिषदेने आपल्या अखत्यारीत १७ नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्याचा नि जागांमध्ये एकूण ३० हजारांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ‘‘संस्थांनी मोठी आíथक गुंतवणूक केली म्हणून त्यांना मान्यता नाकारणे योग्य नाही’ असे त्याचे समर्थनही केले होते. ही निव्वळ तंत्र परिषदेने केलेली दादागिरी होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जास्तीच्या जागा व महाविद्यालये राज्यावर लादली गेली. या परिस्थितीला राज्याचे तंत्रशिक्षण खाते जबाबदार नसून शिफारस नसतानाही आपलीच मनमानी करणारी अ. भा. तंत्रशिक्षण परिषद जबाबदार आहे.
– शरद कोर्डे, ठाणे


‘आधार’ निराधार होण्याची भीती

$
0
0

‘आधार लटकले’ हा अग्रलेख (९ ऑक्टो.) वाचला. एखाद्या योजनेचा उद्देश चांगला असतो, पण त्याचा आरंभ करताना, अंतिम ध्येय गाठण्यात त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली गेली पाहिजे याच्या नियोजनाकडे अतिशय सहजतेने बघितले जाते हे दुर्दैव आहे. आधार कार्डाची योजना जाहीर केली, ते नसेल तर सरकारी योजनांचे फायदे घेता येणार नाहीत असा बागुलबुवाही दाखवला गेला, पण अंतिम उपयोग ज्या ज्या क्षेत्रात, कार्यालयांत करून घ्यायचा आहे त्यांच्या सर्व मुख्याधिकाऱ्यांना त्याबद्दलची कल्पना दिली आहे का, सर्व नागरिकांपर्यंत त्याच्या उपयोगाची माहिती पोहोचली आहे का, याचा आढावा घेतला गेला होता का? बायोमेट्रिक ठसे घेतले जाणार तर त्याची गुप्तता कशी राखली जाईल याबद्दल आधीच्या सरकारने मौन पाळले आणि आत्ताच्या सरकारने ते तसेच पुढे दामटले.

किती लोकांनी आधार कार्डसाठी अर्ज दिले, त्यातल्या किती जणांना किती वेळात ती मिळाली, कित्येकांना ती पुन:पुन्हा मिळाली, किती जणांची माहिती चुकीची होती, ती किती वेळात दुरुस्त करून नवीन आधार कार्डे मिळाली, या साऱ्यांचा तपशील गुलदस्त्यातच आहे. या पाश्र्वभूमीवर आधी विरोध करणाऱ्या आत्ताच्या सरकारने पारदर्शी राहून आधार योजना फसल्याची कबुली देणे आणि त्यात सुधारणा करून ती राबवण्यासाठी आत्ता जिथे ती जोडली जात असतील त्या अनुदान योजनांना ‘आधार’सक्ती स्थगित करून नव्याने पावले उचलणे आवश्यक आहे. अमेरिकेसारख्या देशात एक आंतर्देशीय सुरक्षा क्रमांक दिला जातो, तोही काही मिनिटांत अर्ज स्वीकारून आणि साध्या पोस्टाने काही दिवसांत घरपोच पाठवून; ज्याचा उपयोग देशाच्या सर्व योजना, खासगी आस्थापनांमधल्या योजनांमध्ये नागरिकांना कायमस्वरूपी करता येतो. त्यासाठी घेतलेली खासगी माहिती संगणकांमध्ये गोपनीयतेचे सर्व निकष पाळून सांभाळली जाते वर्षांनुवष्रे. त्याचा अभ्यासही आधी केला पाहिजे. तसे चित्र जर आपल्याकडे दिसणार नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाचीच री ओढण्यात ‘जनतेचे न्यायालय’ पुढाकार घेईल आणि ‘आधार’ कायमचे निराधार होईल अशी भीती वाटते.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

कॉँग्रेसकडे नेत्यांची फळीच नाही

‘टाकाऊंतून किती टिकाऊ?’ हा अग्रलेख (८ ऑक्टोबर) वाचला. मोदी सरकारच्या शिडातील हवा ओसरू लागल्याचा फायदा करून घेणे करंटय़ा कॉँग्रेस पक्षाला कळत नसल्याचे त्यात म्हटले आहे. पण कॉँग्रेस पक्षाच्या ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ घराणेशाहीवर तगलेला पक्ष पक्षांतर्गत घराणेशाहीला शरण जातो यात काही नवल नाही, पण नगमासारख्या अभिनेत्रीला सरचिटणीसपद देण्यात येते तेव्हा पक्षधुरीणांची कीव करावीशी वाटते. गेल्या सोळा महिन्यांत काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवून नव्या उमेदीने प्रभावी विरोधी पक्ष बनले पाहिजे होते. पण त्यासाठी लागणारी पुढाऱ्यांची फळीच नाही, हे काँग्रेस पक्षाचे खरे दुर्दैव आहे. त्याला काय करायचे?
माया हेमंत भाटकर, चारकोप (मुंबई)

अशांना शिक्षाच करा

कोकणकडय़ास पडलेल्या भेगेविषयीचा पत्रव्यवहार (लोकमानस, ९ ऑक्टो.) वाचला. वास्तविक वर्षांनुवष्रे पाणी झिरपल्याने डोंगरकपारींना भेगा पडणे हे नित्याचे असून प्रसंगी डोंगराचा भाग कोसळून मोठा अनर्थ होऊ शकतो. असे प्रकार भूतकाळात घडले आहेत, याची माहिती करमरकर यांना नसावी असे वाटते. हरिश्चन्द्रगडावर अन्नपदार्थाचा वापर वाढला व पर्यायाने उंदीर वाढले आणि पाठोपाठ साप वाढले हे न पटण्यासारखे आहे, कारण त्या गडावरील अनेक पक्षी पडलेल्या अन्नाचा ताबडतोब फडशा पाडण्यास टपलेले असतात. कोकणकडय़ावर बसवलेल्या लोखंडी रेिलगमुळे वीज खेचली जाऊन झटका बसणे केवळ अशक्य आहे, कारण तसे होण्यासाठी रेिलगची उंची वीज खेचून घेण्याइतपत असावी लागते. अशी दिशाभूल करणारी माहिती देणे गैर आहे. रेिलग उखडून ती दरीत फेकणे म्हणजे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करण्याचा प्रकार असून, तसे करणाऱ्यास शिक्षाच केली पाहिजे, असे माझे ठाम मत आहे.
– मुरली पाठक, विलेपार्ले (मुंबई)

हा धोक्याचा इशारा!

‘हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग’ही बातमी वाचली. या बातमीबद्दल ‘लोकसत्ता’कारांचे आभार. भेग फाकली असल्याने तिकडे जाणाऱ्या प्रत्येकाने याची नोंद घ्यायला हवी. खरोखरीच कोकणकडय़ाचा हा भाग कोसळला तर? हरिश्चंद्रगड आणि त्याचा कोकणकडा म्हणजे निसर्गसौंदर्याचा मानिबदूच जणू! छातीत धडकी भरवणाऱ्या इथल्या या कोकणकडय़ाविषयी दुर्गमित्रांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. गेल्या काही वर्षांत ऊन, तुफानी वारा आणि जोरदार पाऊस यामुळे कोकणकडा परिसरात क्षरण सुरू आहे. आम्ही दरवर्षी गडावर जातो. गेली काही वष्रे यात खंड पडलेला नाही. गडाचा हा परिसर पाहिला, तिथली पडझड दिसली की मनाला खंत वाटत राहते.
त्यासाठी दुर्ग भटक्यांनी एकत्रित होऊन प्रयत्न करायलाच हवेत. शासन तसेच राज्यातील कोणीही यात पुढाकार घेतला तर आमचाही सहभाग त्यात निश्चितपणे असेलच. कारण शेकडो दुर्गप्रेमींप्रमाणे मीदेखील कोकणकडय़ाचा निस्सीम चाहता आहे. – श्याम तिवारी, मालपाणी ट्रेकर्स ग्रुप, संगमनेर

शिवसेनेची भूमिका योग्यच
भारतातील आतंकवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असतो हे सर्वज्ञात आहे. पाकिस्तानी कलावंत वा खेळाडूंनी याबद्दल कधी नाराजी, निषेध व्यक्त केला आहे? मग याचा असाही अर्थ निघतो की यातून होणाऱ्या नरसंहाराबद्दल त्यांना जराही दु:ख नाही. त्यांच्याबाबत सतत दाखवल्या जाणाऱ्या निर्थक सामंजस्यामुळे ते आपल्याला कधीच गांभीर्याने घेत नाहीत. पाकिस्तान व तेथील नागरिकांबाबत आपण नेहमीच पराकोटीची सहिष्णुता दाखवत आलो आहोत; पण याचेही प्रत्युत्तर जर ते वेळोवेळी गोळी झाडून अथवा बॉम्बस्फोट करून देणार असतील, तर मग शिवसेनेने गुलाम अली यांची मफल होऊ न देण्याची केलेली कृती ‘या परिस्थितीत’ योग्यच आहे.
– अजित कवटकर, अंधेरी (मुंबई)

पारंपरिक औषधांचे संशोधन हवे

वैद्यकशास्त्रातील नोबेल विल्यम कॅम्पबेल, सातोशी ओमुरा, यु यु टू या शास्त्रज्ञांना मिळाले. यु यु टू यांनी चीनमधील पारंपरिक औषधांचे संशोधन व प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून वनस्पतिजन्य ‘आर्टमिसिनीन’ हा हिवतापावर गुणकारी घटक शोधला. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथ ‘चरकसंहिता’, ‘सुश्रुतसंहिता’, ‘अष्टांग हिृदया’ यांसारख्या ग्रंथांवर संशोधन व्हायला हवे, जेणेकरून एखाद्या रोगावर पूर्वीचे औषध निष्प्रभ झाले तर त्याचा उपयोग पुढील अद्ययावत औषध म्हणून करता येईल आणि प्राचीन भारतीय औषध पद्धतीला (ग्रंथांना) जागतिक स्तरावर पुन्हा उजाळा येईल.
– आशीष कल्याणकर, नांदेड

असा हट्ट धरणे कायद्याच्या तत्त्वात बसते?

$
0
0

अशोक वाजपेयी, नयनतारा सहगल, उदय प्रकाश व आता शशी देशपांडे यांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून व राजीनामा देऊन जीवित व अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयीची तळमळ प्रकट केली आहे असे मानले तरी ती उघड उघड सिलेक्टिव्ह आहे. कारण अशा सर्वच हत्या वा अभिव्यक्तीच्या गळचेपीच्या विरोधात ती यापूर्वी कधीच प्रकट झालेली दिसत नाही. अन्यथा १९८४च्या शिखांच्या हत्याकांडावेळी वा ७५च्या आणीबाणीत या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जात असताना या मंडळींचे (जरी तांत्रिकदृष्टय़ा ते त्या वेळी साहित्य अकादमीचे सदस्य वा पुरस्कारप्राप्त मान्यवर नव्हते तरी) त्याबाबत काय म्हणणे वा धोरण होते? कारण यापैकी कोणीही खणखणीतपणे आणीबाणीचा वा शीख हत्याकांडाचा विरोध केल्याचे ऐकिवात नाही.

जीवित राहण्याचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य फक्त िहदूंचा व िहदूंच्या देवदेवतांचा अपमान करणाऱ्यांनाच मिळावे व सामान्य िहदू बॉम्बस्फोटासारख्या घटनांत मेले वा जन्मभराचे अपंग झाले किंवा िहदूंना पूज्य असणाऱ्या देवदेवतांची विटंबना केली गेली तरी त्याचे वाईट वाटायचे (निषेध तर दूरची गोष्ट) कारण नाही असे या राजीनामाबहाद्दरांचे म्हणणे आहे काय? त्या बरोबरच सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन वा मलालाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत हे अकादमीचे पुरस्कार घेतलेले समाज प्रबोधनाचे ठेकेदार का मूग गिळून गप्प आहेत?
कोणाचीही हत्या निषेधार्हच आहे व योग्य तपास होऊन दोषींना शिक्षा मिळावयासच हवी याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. परंतु आम्ही म्हणतो तीच विचारसरणी व तिचे अनुयायी दोषी मानले जाऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असा हट्ट धरणे हे विद्यमान कायद्याच्या तरी तत्त्वात बसते का? पण याचाही विचार हे पुरोगामी विचारवंत करताना दिसत नाहीत आणि िहदुत्ववाद्यांना आरोपीच नाही तर दोषी मानून कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणांवर दडपण यावे इतका प्रचार करत आहेत.
त्यामुळेच साहित्य अकादमीच्या अध्यक्षांनी या मंडळींना संस्थेचे राजकीयीकरण न करण्याचे जे आवाहन केले आहे ते योग्यच आहे. परंतु या झापडबंद विचारकांना ते रुचणारही नाही व पचणारही नाही.
– गोिवद यार्दी, नाशिक

विचारवंतांची असहिष्णुता

मोदी सरकारच्या कारकीर्दीत असहिष्णुता आणि िहसाचार वाढल्याचा निषेध व्यक्त करीत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त काही लेखकांनी त्यांचे पुरस्कार आणि शिष्यवृत्त्या परत केल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला असा निषेध करण्याचा अधिकार आहे हे मान्य करतानाच या विचारवंतांनी त्यांच्यासोबत अशीच कृती न करणाऱ्या इतर साहित्यिकांबद्दल व्यक्त केलेली नाराजी मात्र योग्य वाटत नाही. ज्या तीव्रतेने या साहित्यिकांना सध्याचा काळ असहिष्णुतेचे द्योतक वाटतो, ती तीव्रता एक तर इतर त्यांच्यासारख्याच मान्यवरांना जाणवत नसेल किंवा हा काळ त्यांना असहिष्णुतेचा वाटतच नसेल या शक्यता दृष्टिआड करून चालणार नाहीत. Sensitivity to what & to what extent या प्रसिद्ध उद्गाराची या वेळी आठवण येते. ‘माझ्याच जाणिवा तेवढय़ा खऱ्या आणि उत्कट’ हा अभिनिवेश म्हणजे इतरांच्या विचारस्वातंत्र्याची पायमल्लीच होय. त्यामुळे हीसुद्धा एक प्रकारे विचारवंतांची असहिष्णुताच होय. ‘अॅण्टी एस्टॅब्शिमेंटवाल्यांची एस्टॅब्शिमेंट’
असं गमतीदार, पण मर्मावर बोट ठेवणारं वक्तव्य पुलंनी एकदा केलं होतं त्याची आठवण व्हावी, असं या विचारवंतांचं वागणं आहे.
-राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

एवढा गहजब कशासाठी?

बिहारमधील निवडणूक प्रचारादरम्यान लालूप्रसाद यादव यांनी असे वक्तव्य केले की, िहदूही गोमांस खातात. त्यात गर काय व एवढा गहजब कशासाठी? प्रख्यात पत्रकार स्वामिनाथन अय्यर यांनी अलीकडेच एक लेख लिहून स्पष्ट केले आहे की, मी ब्राह्मण असलो तरी गोमांस खातो. दुसरा एक ब्राह्मण रवी शास्त्री याने एकदा क्रिकेट समालोचन करताना जाहीरपणे सांगितले की, मला गोमांस आवडते. केवळ वानगीदाखल ही दोन नावे दिली आहेत.
दुसरा मुद्दा आहे, तो सपाचे नेते आझम खान यांनी दादरी प्रकरण यूनोत नेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा. देशांतर्गत प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ नयेत, हे तत्त्वत: बरोबर असले, तरी स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वष्रे कटाक्षाने पाळण्यात आलेल्या या अलिखित संकेताचे उल्लंघन प्रथम कोणी केले? मोदींनी. गेल्या वर्षी अमेरिका-युरोपच्या दौऱ्यांत मोदी केवळ काँग्रेस पक्षावरच टीका करून थांबले नाहीत, तर आपण भारतात जन्माला आलो, याची भारतीयांना पूर्वी लाज वाटायची असा जावईशोध लावणारे व स्वत:च स्वत:ची पाठ थोपटणारे पण फॅसिस्ट मनोवृत्तीला साजेसे उन्मादक वक्तव्य त्यांनीच केले हे कोण विसरू शकेल?
देशाचे पंतप्रधानच जर अशी विधिनिषेधशून्य वक्तव्य करीत असतील तर वाचाळ आझम खान यांनी असे वक्तव्य केले म्हणून आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्याला किती महत्त्व द्यायचे हे सुज्ञ नागरिकांनीच ठरवायला हवे.
– संजय चिटणीस, मुंबई

शब्दावाचून कळले सारे..

‘काय चाललंय काय’ या सदरातील व्यंगचित्र (१० ऑक्टो.) एकाही शब्दाचा वापर न करता खूप काही सांगून जाते.
दाहीदिशांनी पारंपरिक व आधुनिक शस्त्रे पुढे सरसावीत आहेत, पण अभिजात संगीताची लकेर या (व अशा) आक्रमणांना न जुमानता शांतपणे विहरतच आहे, असा अर्थ मला या चित्रातून प्रतीत झाला. संगीताचे प्रतीक म्हणून ‘स्टाफ नोटेशन’चा वापरही राजकीय व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांची कल्पकता दर्शवतो.
– सुकुमार शिदोरे, पुणे

तरीही हे सेक्युलर!

बांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन ट्विटरवर म्हणाल्या : (गझल गायक गुलाम अलींचा मुंबई पुण्यातील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रद्द झाल्यावर) आता (पश्चिम बंगालच्या सेक्युलर मुख्यमंत्री) ममतादीदी त्यांचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत, पण मला तेथे (यायला/कार्यक्रम करायला) बंदी आहे. कारण (दोघेही मुस्लीम असलो तरी) धर्माध मुस्लीम माझा द्वेष करतात, गुलाम अलींचा नाही! आपल्याकडच्या तथाकथित सेक्युलर लोकांची मानसिकता उघडी करणारी ही ट्विप्पणी आहे. वास्तविक तस्लिमा या लेखिका म्हणजे कलावंत आहेत. बंगाली त्यांची मातृभाषा आहे. बांगलादेश व पश्चिम बंगाल यांची संस्कृती/ चालीरीती यात साम्य आहे. धर्म मुस्लीम असला तरी त्या खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांच्या आहेत. त्यामुळे खरे तर त्यांनी अर्ज केल्यावर त्यांना भारताचे नागरिकत्व मिळायला हवे होते. पण यूपीए/डावे/ ममतादीदी कोणीही त्यांना ते द्यायला हो म्हणत नाहीत (मतपेढीसाठी!) नि तरीही स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घेतात.
-श्रीधर गांगल, ठाणे

बोनस देणे रेल्वेला कसे परवडते?

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर करण्यात आला आहे. अर्थात त्याला रकमेची कमाल मर्यादादेखील आहेच. तरीही रेल्वेचे उत्पन्न कमी असल्यामुळे रेल्वेला आधुनिक सोयीसुविधा देणे कठीण होत आहे, ही वस्तुस्थिती असताना कर्मचाऱ्यांना बोनस देणे रेल्वेला कसे काय परवडते?
रोजचा रेल्वे प्रवास अनेक अडचणींचा, धोकादायक आणि कामगार वर्गाच्या रोजीरोटीला मुकायला लावणारा ठरत असताना कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्त बोनस देण्यामागे रेल्वेचे काय तर्कशास्त्र आहे? गेल्या काही दिवसांत मुंबईची रेल्वे सेवा सतत काही ना काही कारणांनी बाधित झालेली असते. लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याच्याशी रेल्वे कर्मचाऱ्यांचा काहीही संबंध नाही असे म्हणता येईल का?
-मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)

 

टोल-ठेकेदाराकडून हे  प्रणयाराधन  कशासाठी?

$
0
0

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी ११ ऑक्टोबर रोजी पुण्याहून मुंबईस जाणाऱ्या ज्या शेकडो बसगाडय़ा व मोटारींवर भाजपचे झेंडे होते, त्यांना द्रुतगती महामार्गावरील टोलच्या ठेकेदाराकडून टोलमाफी देण्यात आल्याची बातमी (लोकसत्ता, १२ ऑक्टोबर) वाचली. ठेकेदाराचे हे प्रणयाराधन कशासाठी होते?

तळेगाव-दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकत्रे संतोष शेट्टी यांच्या हत्येच्या प्रकरणात सदरचा ठेकेदार संशयित आरोपी असून त्या प्रकरणाची फाइल सध्या गृह विभागाकडे शीतपेटीत बंद आहे. गृह विभाग भाजपकडे असल्यामुळेच हे प्रणयाराधन, की टोलवसुलीबाबत शासनाने पारदर्शीपणा आणू नये यासाठी केलेली साखरपेरणी? ठेकेदाराने दिलेला टोलमाफीचा हा लाभ उठविणाऱ्या सांस्कृतिक ठेकेदारांना हे प्रश्न पडले की नाहीत?
-अविनाश वाघ, पुणे

दादरी घटनेवर पंतप्रधानांचे मौन

‘विधवा विचारवंत’  या अग्रलेखातून ( १२ ऑक्टो.) ज्या थोर साहित्यिक, ज्यांना देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळाला अशा सर्वावर (ही यादी वाढतच असतानाही) सरसकट टीका करण्यात आली. हा खरे तर या साहित्यिकांवर अन्याय आहे.

कारण दादरीकांड ही घटना घडली तो मुळात अपघात नव्हता. आणि ती घटना घडल्यानंतर त्याचे समर्थन करणारे भाजपचे वाचाळवीर पुढे येताना दिसत होते ते जास्त िनदनीय आणि लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. आपले माननीय पंतप्रधान नीता अंबानीने हातात झाडू घेतला की ट्वीट करतात, पण एवढे मोठे दादरीकांड घडूनही त्यावर मात्र मौन बाळगून शांत बसतात.
– नितीन कोंडिबा महानवर, बीड.

नैतिकतेवर शंका घेण्याचा अधिकार

आपल्या देशातील वैचारिक सहिष्णुता संपल्यात जमा असताना ‘विधवा विचारवंत’ हा अत्यंत समतोल अग्रलेख लोकसत्ताने लिहिला आहे. हिदुत्ववाद आपल्या देशाला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतो यात वादच नाही. परंतु आजकाल साहित्यिकांमध्ये पुरस्कार परत करायची जी लाट आली आहे ती भंपक आणि दांभिक आहे.

या लोकांसाठी गुजरातमध्ये दंगल झाली की मुख्यमंत्री मोदी जबाबदार असतात आणि पुढे उत्तर प्रदेशात दंगली झाल्या की अखिलेश यादव जबाबदार नसतात, तर आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतात.

यांचा मुख्य कंडू उभी हयात ज्यांना विरोध केला ते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे आहे. आज या मुद्दय़ावर हे आव आणतील की आम्ही आत्ता सुरुवात केलीय. आम्हाला शहाणपण उशिरा आलंय म्हणून ते चूक ठरवू नये किंवा लोकशाहीत आम्हाला हवे तेव्हाच आम्ही विरोध करू.

..या सगळ्या गोष्टी खऱ्या मानल्या तरी लोकशाहीत यांच्या नैतिकतेवर शंका घ्यायचा अधिकार प्रत्येकाला उरतोच, त्याचे काय?
– सौरभ गणपत्ये, ठाणे

या शब्दाचा वापर खटकणाराच

विधवा हा शब्द ज्या रीतीने ‘विधवा विचारवंत’ या अग्रलेखात (१२ ऑक्टो.) वापरला आहे ते वाचून वाईट वाटले. या जागी अनाथ, निराधार यासारखे शब्द वापरूनही अर्थ बदलत नव्हता; मात्र अग्रलेखात जाणीवपूर्वक विधवा हा शब्द वापरला आहे;  कारण नवऱ्याच्या मरणाला विधवा कारणीभूत असते अशी अग्रलेखाची धारणा आहे (अग्रलेखातील शेवटच्या चार ओळी). तसेच विधवा या शब्दातून जो अर्थ आणि अनेक नकार परंपरेमध्ये व्यक्त होतात त्यांना या अग्रलेखात मान्यता आहे. यामधून महिलांचा थेट अपमान होतो असे मला वाटते.

व्यक्तीला राग किंवा संताप व्यक्त करण्यासाठी जहाल शब्दांची गरज लागते. अशी गरज निर्माण होणे नसíगक आहे, मात्र या गरजेपोटी कोणत्या शब्दांचा वापर करतो आहोत, याचे तारतम्य या अग्रलेखात सुटले आहे असे माझे मत आहे.
– विजय तांबे, मुंबई

आणीबाणीनंतर पहिल्यांदाच साहित्यिकांनी आवाज नोंदवला.. 

‘विधवा विचारवंत’ या अग्रलेखातील काही विचार हे पटण्यासारखे असले तरी काही मुद्दय़ांचा विचार करावयास हवा, असे मला वाटते :

१) गेल्या काही दिवसांत विविध लेखक/ विचारवंत यांनी पुरस्कार परत करण्याची जी मालिका सुरू केलेली आहे, ती फक्त दादरी हत्याकांडामुळे आहे हे अग्रलेखातील अनुमान चुकीचे आहे. ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची झालेली हत्या, डॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या चौकशीत होत असलेली दिरंगाई, सरकारकडून आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळ मानल्या गेलेल्या अनेक संघटनांकडून लादल्या गेलेल्या विविध बंदय़ा व अशाच एका वादातून, गोमांस बंदीमुळे दादरी येथे नाहक गेलेला बळी या सर्वाचा हा एकत्रित परिपाक आहे.

२) नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याआधीही देशात धार्मिक दंगे होत होते, याबद्दल दुमत नाही; परंतु ऐंशीच्या दशकात झालेले शिखांचे हत्याकांड असो व पंजाब-हरयाणात झालेले िहदूंवरील दहशतवादी हल्ले, या सर्वापेक्षा २००२ मध्ये झालेले गोध्राकांड जास्त चíचले गेले वा जाते. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे २००० च्या सुरुवातीपासून उदयास आलेले व त्यानंतर अक्राळविक्राळ स्वरूपात विस्तारलेले ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’ हे आहे. यात फक्त ‘वैचारिक अप्रामाणिकपणा’ किंवा ‘िहदू-द्वेष’ आहे असे म्हणणे म्हणूनच मला अताíकक वाटते. आणि या इलेक्ट्रॉनिक माध्यम-विस्फोटात फक्त िहदू धर्मीयच नव्हे तर दहशतवादाच्या मुद्दय़ावरून मुसलमान वा धर्मातराच्या मुद्दय़ावरून ख्रिश्चन धर्मीय असे सर्वच कमी-जास्त प्रमाणात चघळले गेलेले आहेत वा जात आहेत. आणि हे फक्त धार्मिक प्रकरणांबाबतच नाही. दिल्लीतील सामूहिक (निर्भया) बलात्कार प्रकरणाअगोदर देशात बलात्काराचे गुन्हे घडत नव्हते का? परंतु निर्भया प्रकरणात मीडियाच्या विलक्षण कव्हरेजमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला.

उशिरा का होईना, आणीबाणीनंतर प्रथमच आपल्या देशातील विचारवंत हे पुरस्कार परत करून आपला एक संघटित आवाज नोंदवीत आहेत, ही सुखद बाब आहे. आपण आशा करू या की, संघटितरीत्या ही वाणी पुढे आपणाला भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या बाबतीतही अशीच तळपत राहील.
– डॅनिअल मस्करणीस, वसई

साहित्यिक वलयासाठी राजीनाम्याचा कावा

विधवा विचारवंत (१२ ऑक्टोबर) हा अग्रलेख लिहून दादरीच्या निमित्ताने भुरटय़ा िहदुत्ववाद्यांना आलेला कैफ आणि त्याचा विद्यमान सरकारवर होणारा परिणाम याची गंभीर नोंद ‘लोकसत्ता’ने घेतली आहे. तथाकथित बुद्धिवाद्यांच्या दुट्टपी धोरणाचेही अचूक विश्लेषण यानिमित्ताने यात केले आहे.

ही जी सांस्कृतिक साथ बोकाळली आहे ती मला डेंग्यू आणि स्वाइन फ्लूपेक्षा भयंकर वाटते. कारण इतर साथीच्या आजाराला औषध आहे, उपचारानंतर ती नियंत्रणात येते आणि मुख्य म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून आपण सर्वच दक्ष असतो. पण इथे उलटे आहे. काही साहित्यिकांना, विचारवंतांना आपल्यालाही लागण झाली पाहिजे अशी असुरी इच्छा आहे. एक प्रकारचा कैफ वातावरणात निर्माण झाला आहे. आपण राजीनामा दिला की आपल्याला आपोआप साहित्यिक म्हणून वलय निर्माण होईल असा कावाही काहींच्या मनात आहे.

त्यातल्या त्यात एक बरे आहे, आमच्या मराठी साहित्यिक विचारवंतांना ही लागण झाली नाही. पुरस्काराचे पसे परत करावे लागले तर, असा मध्यमवर्गीय विचार त्यांना या ‘विधवा  विचारवंत’ या उपाधीपासून दूर ठेवण्यास मदत करत असावा.
– गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)

 

 

 

विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून?

$
0
0

‘अस्वच्छता अभियान’ हे स्फुट (अन्वयार्थ, १३ ऑक्टो.) वाचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘स्वच्छ भारत’ची घोषणा खरोखरच सर्वांपर्यंत पोहोचली का, हे पाहणे गरजेचे   आहे. पांढरे कपडे घालून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंतही ती पोहोचली की नाही, याबाबत शंका आहे. हे अभियान फक्त फोटो काढण्याइतपत मर्यादित राहायला नको. खरे तर कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सहभागी होऊन ‘स्वच्छ भारत’साठी धडपडायला हवे; परंतु स्थिती ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून?’ अशीच दिसते आहे.
– किरण भागवत मुंडे, परळी-वैजनाथ

संयम आवश्यकच

‘शिव-शाईचा स्वार्थवाद’ या अग्रलेखातून (१३ ऑक्टो.) शिवसेनेच्या विचारहीन व उथळ प्रवृत्तीचा खरमरीत समाचार घेण्यात आला आहे. स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या पक्षांनी आपली प्रत्येक कृती फार विचारपूर्वक व संयमाने करणे आवश्यक असते; पण उटपटांग वृत्ती हाच शिवसेनेचा पाया असल्यामुळे त्यांच्याकडून लोकशाहीला साजेशा प्रगल्भ कृती होणे तसे अवघडच आहे.

मात्र पत्रकारितेची जबाबदारी म्हणून ‘लोकसत्ता’ अशा उथळ घटकाचे उचित रीतीने कान पिळतो, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. याच अग्रलेखातून सुधींद्र कुलकर्णी यांचे वास्तव रूप आधोरेखित करण्यात आले, हेही बरेच झाले. लोकशाहीत अशीच तटस्थ व संतुलित टीका अपेक्षित असते. ही टीका द्वेषमूलक नसून सर्वाचीच प्रगल्भ अशी राष्ट्रनिष्ठा वाढावी या भूमिकेतून असते हे संबंधितांना कळणे मात्र गरजेचे आहे.
डॉ. अनंत राऊत, पीपल्स कॉलेज, नांदेड

धर्माध शक्तींनी पाकिस्तानींनाच व्यासपीठ देण्याचे ठरवले तर?

एका गोष्टीचे नवल वाटते की परराष्ट्रमंत्री असताना उघडपणे िहदुस्थानविरुद्ध भूमिका घेणाऱ्या त्या पाकिस्तानी मंत्र्यासाठी स्वत:चे झालेले काळे तोंड जगाला दाखवण्याची कुलकर्णीना किती घाई झाली होती. इतकी की तेच काळे तोंड घेऊन माध्यमांसमोर फिरण्यात त्यांना कोणते तरी शौर्य गाजवल्याचा आनंद झाला होता, असे वाटत होते.

पाकिस्तानी क्रिकेटर, नेते, कलाकार, व्यावसायिक किती चांगले असतात, याबाबत शासनाच्या परवानगीने पोलीस बंदोबस्तात जाहीर व्याख्याने घेण्यासही अशांना काहीच वाटणार नाही. कारण जो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला तोही अशाच वृत्तीचा परिपाक होता असे म्हणण्यास वाव आहे. महाराष्ट्राच्या भूमीत हा कार्यक्रम होऊ देणाऱ्या शासनाचा धिक्कारच! एक मोफत सल्ला असा, की राष्ट्राभिमान काय असतो हे जरा इस्रायलकडून तरी शिकावे. लक्षवेधी बाब म्हणजे एका व्यक्तीचा फाजील हट्ट शासनाने पुरवला खरा, पण या देशामध्ये ज्या धर्माध शक्ती वळवळ करत आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जाणीवपूर्वक पाकिस्तानींनाच येथे कोणतेही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा धडाका लावल्यास वा तसे सूचित केल्यास शासन काय करणार आहे?
  -जयेश राणे, भांडुप

काळे कोणत्या कल्पनांना फासले?

सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासून शिवसेनेने अनेकांची सहानुभूती गमावली आहे. कुलकर्णी हे भाजपचे विचारप्रमुख असताना, त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाकिस्तानबरोबर शांतता व्हावी म्हणून मोठे प्रयत्न केले. त्याला किती यश आले हे काळ ठरवील. परंतु वाजपेयी यांच्या काळात (१९९८-२००४) अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय निर्णय घेण्यात कुलकर्णी यांचा पुढाकार होता, हे निश्चित.

कुलकर्णी यांचे ‘म्युझिक ऑफ द स्पििनग व्हील’ हे पुस्तक काळे फासणाऱ्यांनी वाचलेले दिसत नाही. त्यात ते लिहितात, ‘गांधी म्हणजे विसाव्या शतकातील येशू ख्रिस्त आहेत. हिंदू-मुसलमान दंग्यांत ते १९४६ साली नौखाली येथे हातातील काठी टेकत, वयाच्या ७६व्या वर्षी चालले.’ गांधीजींना जी िहदू-मुसलमान एकी अपेक्षित होती, ती आजच्या काळात सुधींद्र कुलकर्णी भारत-पाकिस्तानमध्ये आणू इच्छित असतील, तर त्यांना सर्वानी पाठिंबा दिला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुलकर्णी यांना जो पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

– मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

आक्षेपात गफलत

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम यांस विरोध करणाऱ्यांचा नेहमीचाच आक्षेप म्हणजे पाकिस्तानी सन्य आणि अतिरेकी सीमेवर आपल्या जवानांना मारत असताना पाक कलाकारांना आम्ही भारतात आमंत्रित का करायचे? भावनिक स्तरावर हा आक्षेप योग्यच वाटतो. पण त्यात मोठी वैचारिक गफलतही आहे. पाक सन्य वा अतिरेकी यांच्याशीही दमाने घ्या अशी कोणाचीच भूमिका नाही, तेथे ‘जशास तसे’ अशीच सर्वाची भूमिका आहे. कुलकर्णी यांनीही हेच स्पष्ट केले.

पण केवळ लष्करी बळावर समस्या सुटू शकत नाही हेच अनेकदा सिद्ध झाले आहे. ज्या सन्याच्या बळावर तथाकथित राष्ट्रवादी येता जाता पाकला धडम शिकवण्याची भाषा करतात त्याच सन्यातील  निवृत्त लेफ्ट. जन. हसनन इंडियन एक्सप्रेस मधे लिहिलेल्या लेखात म्हणतात, Soldiers are perceived to be happiest when shells & bullets fly. Yet search a soldier’s heart & it will tell you that he is happiest when peace prevails. (IE, 15/1/14). तरीही ज्यांचा लष्करी बळाचाच आग्रह आहे त्यांनी मग स्वतच्या घरातील किमान एक तरी व्यक्ती सन्यात भरती करावी. तसेच आपला जो काही आयकर देय असेल तो सर्व भरावा,म्हणजे देशाच्या संरक्षण खर्चात भरीव वाढ करता येईल.

– अनिल मुसळे, ठाणे (प.)

 भाजपचा ‘मित्रपक्ष’ सध्या राजकीय ‘चेक-मेट’च्या स्थितीत!

विकासकामांचे श्रेय शत-प्रतिशत भाजपच एकटा लाटत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या ‘अँटी-इन्कम्बन्सी’चा एकमेव मानकरी आपणच ठरत असल्याच्या भीतीतून, शिवसेना विरोधातून समतोलपणा साधण्याच्या प्रयत्नात दिसते. शिवसेनेजवळ एक तर युतीतला मित्रपक्ष होणे वा नेहमी स्वबळावर निवडणूक लढणे हाच पर्याय उरला आहे. प्रखर हिंदुत्ववादाला शिवसेनेने सध्या दिलेली दुय्यम प्राथमिकता आणि मराठी मतांचे वाढणारे ध्रुवीकरण पाहता शिवसेनेचे हे धाडस किती मदान मारेल हे कल्याण-डोंबिवली व मुंबई महानगरपालिकेच्या निकालांतून दिसेलच. परंतु सध्या सरकारमध्ये राहून राखलेला अलिप्तपणा अपमानित करणारा ठरतो आहे आणि सरकारमधून बाहेर पडल्यास पक्षफुटीची भीती बळावते आहे. शिवसेनेची ही नुकसानकारक कोंडी काही प्रमाणात भाजपनेच स्वत:च्या फायद्यासाठी केलेली निर्मिती आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. एकूणच, सध्या शिवसेना राजकीयदृष्टय़ा ‘चेक-मेट’ होणाऱ्या स्थितीमध्ये उभी आहे.

– अजित कवटकर, अंधेरी पूर्व (मुंबई)

..नाही तर शिवसेनेचीही अवस्था मनसेसारखी होईल!

पाकिस्तानचा गुंता सोडवण्यात सरकार असमर्थ आहे असे शिवसेनेला वाटत असेल तर ते सरकारमधून बाहेर का पडत नाहीत? कीसांगताही येईना आणि सहनही होईना अशी त्यांची अवस्था झाली आहे?

एकीकडे इतर प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यात अनेकदा स्वबळावर सत्ता स्थापन करीत असताना शिवसेनेला मात्र स्थापनेपासून एकदाही स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही. याचे कारण त्यांचे संकुचित राजकारण. केवळ राडेबाजी करून आपण लोकांना आपलेसे करू शकतो, असे जर शिवसेनेला आजही वाटत असेल, तर त्यांचीही अवस्था मनसेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. एकीकडे भाजप शिवसेनेची पद्धतशीरपणे मुस्कटदाबी करत असताना अशा घटनांमुळे शिवसेना स्वत:च आणखी खोलात जात आहे. तेव्हा शिवसेनेने आत्मपरीक्षण करून विकासाशी कालसुसंगत भूमिका अंगीकारावी अथवा त्याचे परिणाम त्यांना भविष्यात नक्कीच भोगावे लागतील.
  – विनोद थोरात, जुन्नर

 

हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला कसा?

$
0
0

प्रज्ञा पवार,  हरिश्चंद्र थोरात, संजय भास्कर जोशी यांनी राज्य शासनाचे पुरस्कार परत केल्याची बातमी (१४ ऑक्टो.) वाचली. या लेखकमंडळींनी आपले पुरस्कार परत करावेत की नाही, ते कधी परत करावेत हा त्यांचा हक्कआहे हे मान्य. पण एक लेखक म्हणून जेव्हा ते स्वत:ला समाजातील एक वेगळी व्यक्ती, अधिक प्रगल्भ व्यक्ती मानत असतील तर मात्र त्यांची ही कृती त्याला विसंगत म्हणावी लागेल. मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कलबुर्गी यांची हत्या ही एका साहित्यिकाची हत्या आहे हे गृहीतकच चुकीचे आहे. कलबुर्गी यांनी एक संशोधक म्हणून आपल्या िलगायत समाजाची चिकित्सा केली आहे आणि एकूणच धर्माची मांडणी केली आहे. त्यातून हा हल्ला झाला असे कुणाला वाटत असेल तर तो साहित्यिकावरील हल्ला म्हणता येणार नाही आणि असा हल्ला भांडारकर संस्थेवर झाला होता. अर्थात संशोधकावरील हल्ल्याचेही यात समर्थन मी करणार नाही, पण यामुळे साहित्यिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येत आहे असे मानणे सयुक्तिक होणार नाही

आजही लेखक समाजातील विसंगतीवर, अन्याय-अत्याचारावर लिहू शकतो व तो लिहीत आहे. त्यामुळे असे भययुक्त वातावरण असल्याचे बेगडी चित्र निर्माण करणे हा या राज्यावर, प्रशासनावर अन्याय ठरेल. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन होते आणि आम्ही म्हणत असू की येथील वातावरण सहिष्णू नाही, तर ही आत्मवंचना ठरेल.
-सौमित्र राणे, पुणे

 घटनाकारांवरही अन्यायच ?

‘बाबासाहेबांचे  विचारधन कुलूपबंद’ ही  बातमी (लोकसत्ता, १४ ऑक्टो.) वाचली.  हे आजवरच्या आपल्याकडील अनिष्ट अन्यायकारक परंपरेस धरूनच. कोणत्याही व्यक्तीचे परखड विचार गाडून टाकायचे असतील तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुतळे उभारून त्याभोवती आरत्या ओवाळणे, जयंती-पुण्यतिथीचे उत्सव साजरे करणे हे जोरात केले जाते. व्यक्तिपूजा करायची सवय झाली असल्याने पुतळ्याभोवती आरत्या ओवाळताना त्या व्यक्तीच्या अनुयायांचेदेखील त्यांना आदरणीय असलेल्या व्यक्तीच्या विचारांकडे दुर्लक्ष होते. बाबासाहेबांसारख्या क्रांतिकारी सुधारक नेत्याचे विचार हजारो वर्षांच्या चौकटीच्या मुळावर येणारे, अन्यायकारक व्यवस्थेलाच आव्हान देणारे असतील तर व्यवस्था राबविणाऱ्या यंत्रणेकडून त्यांना छुपा विरोध करायचा व पुतळे, स्मारके उभारण्यासाठी मात्र भरघोस अनुदाने द्यायची, असा दुटप्पी व्यवहार केला जातो. सामाजिक प्रगतीस अत्यंत आवश्यक असलेल्या न्याय, समता व बंधुता या विचारसरणीचे प्रतिपादन करून अन्यायास हिसाचाराने नव्हे तर वैचारिक लढा देणाऱ्या बाबासाहेबांचे विचार अन्यायकारक सामाजिक चौकटीला आव्हान देणारे आहेत. ते चौकट निर्माण करणाऱ्या स्वार्थसाधूंना परवडण्याजोगे नाहीत. म्हणूनच ते कुलूपबंद होऊन गाडले गेले. जेथे रूढी, परंपरांच्या, धर्माच्या कोणत्याही चिकित्सेला विरोध होतो तेथे विचारांना स्वातंत्र्य मिळणे दुरापास्त. अभिव्यक्तिस्वातंत्र्य फक्त कागदावर राहते. प्रत्यक्षात व्यवहार वेगळे असतात. घटनाकारांचीदेखील त्यातून सुटका नाही, असेच सध्या तरी म्हणायला लागेल
  – रजनी अशोक देवधर, ठाणे

 हे आश्चर्यच!

गेली अनेक वष्रे या देशात वारंवार अन्याय झाले, हत्याकांडे झाली. याची कलाकार, तत्त्वज्ञ यांना चीड आली नसेल? तरी  ते निद्रिस्त राहिले. पुरस्कार घेतच राहिले. त्यांनी साधना सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षांत ते कुणाला माहीतही नव्हते, त्याच न्यायावर दीड वर्ष झालेल्या मोदी सरकारला ते वेळ द्यायला तयार नाहीत. त्यांच्या विरोधाची लाट आणण्यासाठी ते पुरस्कार परत करू लागले हे आश्चर्यच म्हणायचे. याचा अर्थ मोदी करतात ते सर्व बरोबर असे नव्हे! हे सर्व पाहून पुरस्कार निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहते.
-किसन गाडे, पुणे

नीती आयोगाचा अंदाज धक्कादायक

रमेश पाध्ये यांचा ‘भाववाढीचा राक्षस सक्रिय होतोय..’ हा लेख (१४ ऑक्टो.) अभ्यासपूर्ण वाटला. सरकार आणि उच्चपदस्थ अधिकारी कसे निष्क्रियपणे काम करतात हे त्यातून स्पष्ट झाले. सरकारी अधिकारी वर्षांनुवष्रे काम करीत आहेत. मग डाळी अगोदरच आयात करण्याचा सल्ला सरकारला का दिला नाही? यूपीए सरकारचा निष्क्रियपणादेखील तितकाच कारणीभूत आहे. त्यांनी कडधान्याची ना संकरित वाण / जाती विकसित केल्या ना सिंचनाकडे लक्ष दिले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नीती आयोगाचा अंदाज धक्कादायक आहे. गेल्या दोन महिन्यांत कांदा व्यापाऱ्यांनी जवळपास आठ हजार कोटी रुपयांची लूट केली. एवढे पसे कुठे गेले? खरंच व्यापाऱ्यांच्या गोदामात कांद्याऐवजी नोटांची बंडले भरली की काय बिहारच्या निवडणुकीत?  ‘सब का साथ, सब का विकास’ हा नारा देऊन हे सरकार निवडून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे याप्रकरणी भूमिका मांडायला हवी.

देशाचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव हे की, डॉ. आनंद कर्वेसारख्या कृषी शास्त्रज्ञाकडे आधीचे आणि आताचे सरकारदेखील दुर्लक्ष करीत आहे.
– प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा (मुंबई)

 हा वाद म्हणजे नुरा कुस्ती!

गेल्या काही दिवसांत सेना-भाजपमधील संघर्ष चव्हाटय़ावर येऊ लागला आहे. विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवूनही कुणा एकाला बहुमत मिळत नाही असे दिसताच सेना-भाजप सत्तेसाठी एकत्र आले. सेना किंवा भाजपला कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात अडचणी आहेत. ज्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करून आपण सत्तेत आलो त्यांच्याशी जुळवून घेण्याची कृती जनतेच्या पसंतीला उतरणार नाही, हे सेना-भाजपला माहीत आहे. सारांश, शिवसेनेला भाजपची आणि भाजपला शिवसेनेची नितांत गरज आहे हे दोघेही ओळखून आहेत. त्यामुळेच ते सरकारमधून बाहेर न पडताच एकमेकांशी संघर्ष करीत आहेत. सत्तेची वाटणी, त्यानंतरही वेळोवेळी घडणारे मानापमान नाटय़ आणि सध्या बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमिपूजन, गुलाम अली आणि कसुरी यांचे कार्यक्रम या प्रकरणांतही सेना-भाजपने एकमेकांवर तुफान आरोप केले. स्वत: सत्तेतून बाहेर पडण्याऐवजी दोन्ही पक्ष समोरच्यालाच सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान देत आहेत. यातून एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सेना-भाजपमधील हे मानापमान नाटय़ संपणार नाही आणि मिळालेली सत्ताही ते सोडणार नाहीत. त्यामुळे या दोन सत्ताधारी पक्षातील वाद म्हणजे नुरा कुस्ती आहे हेच खरे.
– प्रकाश पोळ, कराड (सातारा)

शिवसेनेवरील विश्वास उडू लागला..

‘आम्ही नाही, तुम्हीच बाहेर पडा’ हे संजय राऊत यांचे वक्तव्य (१४ ऑक्टो.) वाचले. पूर्वी कुठल्या तरी मराठी चित्रपटातून ‘तुझा पगार किती? तू बोलतोस किती?’ हा संवाद फार लोकप्रिय झाला होता, त्याची या संजय ‘उवाच’ ने आठवण झाली. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा शिवसेनेच्या बाजूने नाही, हे राऊत विसरले आहेत की काय? पण आपली विधानसभेतील ‘पायरी’ ओळखावी आणि त्या हिशेबाने आपली भाषा सुधारावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून ठेवणेच व्यर्थ आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे आणि स्वबळावर ते ती लढत आहेत. मात्र, निकालांनी सत्तेसाठी एकत्र येणे भाग पाडल्यास पुन्हा एकदा हे ‘क्षणभराचे मित्र आणि अनंतकाळाचे शत्रू’ एकत्र येतील, यातही काही शंका नाही.  राज्य सरकारवरचा आणि विशेषत: शिवसेनेवरचा विश्वास अधिकाधिक उडायला ही असली तणातणी आणि (‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ या छापाचे!) विरोधाभासी वर्तन अधिकच मदत करीत आहे, हे दोन्ही पक्षांनी विसरू नये.
-सत्यव्रत इंदुलकर, ठाकुरद्वार (मुंबई)

 

 

नांगी टाकण्याची सक्ती करणे हेच का शासकांचे मोठेपण?

$
0
0

सध्या प्रसारमाध्यमे तसेच वृत्तपत्रे यांतून देशासाठी अतिशय ‘दुर्दैवी’- खरे तर लज्जास्पद- अशा दादरी हत्याकांडानंतर विविध शासकीय पुरस्कार परत करण्याची मान्यवर साहित्यिकांत लागलेली जी अहमहमिका आहे, त्यावर अतिशय नकारात्मक चर्वतिचर्वण चालले आहे.. ते आणखीच अयोग्य आहे.
एक तर इतके सर्व गंभीर प्रकार देशात होत असूनही त्यावर साधी दोन शब्दांची संवेदनशील प्रतिक्रिया देणेदेखील जड जावे, हा शासनाचा कोडगेपणा ठरला. हे गेंडय़ाच्या कातडीचे राजकारण हा एक भारतीय राजकारणातील सर्वपक्षीय विकार झाला आहे. दुष्काळ, भ्रष्टाचार, हत्याकांड, दंगली, दहशतवादी हल्ले, संप, आंदोलने.. सर्वच बाबतींत सातत्याने हेच चित्र दिसते. मग विविध पक्ष एकमेकांची भूतकाळातील राजकीय मढी उकरत बसतात. मूळ मुद्दा बाजूलाच. तर याबाबत समकालीन शासक प्रेसिडेंट बराक ओबामा तसेच जर्मन चान्सेलर अन्जेला मर्केल यांचा आदर्श ठेवण्यास हरकत नाही. अमेरिकेत नुकतेच घडलेले भयानक चाल्र्स्टन गोळीबार प्रकरण असो वा इतरत्र झालेला वांशिक किंवा अन्य स्वरूपाचा िहसाचार.. किंवा अगदी अहमद मोहम्मद या शाळकरी मुलाच्या बाबत घडलेला अपमानजनक प्रसंग असो (ज्यावर ‘लोकसत्ता’ने अग्रलेख लिहिला होता.) या प्रसंगांत आपल्या संवेदनशील शब्दांनी जनमानसाच्या भडकलेल्या भावनांवर फुंकर घालून त्या शांत करण्याचे चोख काम ओबामांनी केले. एवढेच कशाला ‘हुआंतानामो बे’ तुरुंगातील इराकी कैद्यांवरील अत्याचारांबाबत माफी मागितली किंवा क्युबा/ इराण यांसारख्या देशांचे शासक कट्टर प्रतिस्पर्धी असूनही त्यांच्याशीसुद्धा हातमिळवणी केली. अशी कैक उदाहरणे. तसेच सीरियन निर्वासितांना सर्व युरोप कस्पटासमान लेखत असताना आणि त्यांची केवळ ‘फुकटे अतिरेकी’ म्हणून संभावना करत असताना चान्सेलर मर्केल यांच्या जर्मनीने आपल्या आधुनिक देशाची कवाडे निर्वासितांना अगदी मुक्तपणे खुली करण्याचे तात्कालिक औदार्य तरी दाखवले.
तेव्हा नको त्या ठिकाणी भूतकाळातील राजकीय मढी उकरत बसण्यापेक्षा आपला अमर्याद सत्तेचा अहंकार बाजूला ठेवून थोडीफार मवाळ भूमिका घेण्यात कोणत्याही शासनाचे मोठेपण असते. तसेच ज्यांना साधा राजधर्म जपता येत नाही आणि ज्या सर्वपक्षीय शासकांचे हात विविध दगडांखाली अडकलेत त्यांनी साहित्यिकांच्या प्रामाणिकपणावर आक्षेप घ्यावा, हा तर मोठा विनोद आहे. शिवाय, ‘ब्रेकिंग न्यूज’ला चटावलेल्या ज्या माध्यमांना एखाद्या बातमीचे रिपोìटग करण्यापूर्वी विचार करण्यासही वेळ नसतो, त्यांनी न्यायदात्याच्या थाटात साहित्यिकांच्या वैचारिक भूमिकांची उलटतपासणी घ्यावी, हेही हास्यास्पदच. ‘लोकसत्ता’नेही सरसकट सगळ्याच साहित्यिकांना आरोपीच्या िपजऱ्यात उभे करून त्यांच्या ‘पुरोगामी’त्वाची जी अखंड झाडाझडती चालवली आहे, ती त्रासदायकच.
मुळात काही मूठभर साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले म्हणून एवढा त्रागा का? कारण, चित्र सध्या जसे रंगवले जाते त्याच्या अगदी उलट आहे. पुरोगामी साहित्यिक-विचारवंतांनी आपली अक्कल सरकारी पदरी गहाण टाकून कट्टर विचारसरणीसमोर नांगी टाकावी व राजकीय वारा वाहेल तशी पाठ फिरवावी, अशी सत्तालोलुप राजकीय पक्षांची धारणा आहे. ते घडत नाही म्हणून कोणाच्याही अध्यात-मध्यात नसणाऱ्या तसेच अिहसक मार्गाने साधा-सरळ निषेध नोंदवणाऱ्या साहित्यिकांस खलनायक ठरवण्याचा पद्धतशीर उद्योग सर्वच प्रसारमाध्यमे-सोशल मीडियातून सद्य:स्थितीत चालला आहे.
– नीलेश तेंडुलकर, रत्नागिरी
.. तरच आíथक गुन्ह्यांना पायबंद बसू शकेल
बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेतून ६१७२ कोटी रुपये काळ्या रकमेचे परदेशात हस्तांतर झाले व त्या घोटाळ्याची जाणीव रिझव्‍‌र्ह बँकेस होण्यापूर्वी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय आíथक गुन्हे अन्वेषण विभाग यांना झाली, ही बाब गंभीर असल्याचे ‘पसा लाटा, पसा जिरवा’ या अन्वयार्थात (१३ ऑक्टो.) लिहिले आहे. ते योग्य आहे पण धक्कादायक नाही, हे मी स्वत: अनेक बँकांत काम करताना अनुभवले आहे. या वस्तुस्थितीस अनेक कारणे आहेत व ती जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
पहिले कारण म्हणजे अशा हस्तांतरण व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील आíथक गुन्ह्यांचा अभ्यास करून रिझव्‍‌र्ह बँकेने स्वत:चे असे धोरण तयार केल्याचे जाणवत नाही. अतिरेकी कारवायांचा प्रतिबंध करण्यासाठी अमेरिकेने नाणे निधीमार्फत दिलेल्या सूचनांचे भाषांतरित स्वरूप अशा स्वरूपाची परिपत्रके रिझव्‍‌र्ह बँकेकडून सर्व बँकांना पाठविली जातात. या परिपत्रकांचा आशय अत्यंत ढोबळ स्वरूपाचा असून अतिरेकी संघटनांची खाती शोधणे एवढाच त्यांचा उद्देश असतो.
रिझव्‍‌र्ह बँक सर्व बँकांकडून ‘रोकड व्यवहार अहवाल’ व ‘संशयास्पद व्यवहार अहवाल’ असे दोन अहवाल काही मुदतीने मागविते. त्या मुदतीत पसे घेऊन गुन्हेगार गायब झालेले असतात. नंतर राहते ती केवळ शवविच्छेदन प्रक्रिया. ठरावीक रकमांपेक्षा अधिक रकमांचा ‘रोकड व्यवहार अहवाल’ हा बनविण्यास सोपा आहे व सर्व बँकांत वापरत असलेल्या विविध संगणक प्रणाली तो अहवाल बनवू शकतात. परंतु संशयास्पद व्यवहार शोधण्याचे काम या संगणक प्रणाली करू शकत नाहीत, कारण तसे व्यवहार शोधण्यासाठी ‘ऑब्जेक्टिव्ह’ (वस्तुनिष्ठ) स्वरूपाच्या स्पष्ट सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या नाहीत. हे काम मानवी मेंदूलाच करावे लागते. उदाहरणच द्यावयाचे झाले तर ज्या खात्यात मासिक उलाढाल जेमतेम रु. ५०,०००/- ची होते त्या खात्यात एकदम दहा लाख रुपये जमा झाले तर त्या खातेदारास बोलावून ती रक्कम कोणत्या स्रोतातून आली याची चौकशी बँकेने केली पाहिजे किंवा नुकत्याच उघडलेल्या खात्यात खूप मोठय़ा रकमेचे धनादेश समाशोधनासाठी भरले गेले तर ते कोणी व कशासाठी दिलेले आहेत याची खातरजमा बँकेने केली पाहिजे, अशा स्वरूपाच्या अनेक सूचना जरी रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या असल्या तरी त्यांपेक्षा भिन्न व अनपेक्षित परिस्थितीमध्येदेखील बँकेतील अधिकाऱ्यांनी स्वत: विचार करून नवीन प्रकारचे संशयास्पद व्यवहार शोधावेत, अशी अपेक्षा रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेली दिसून येते.
बँकांतील कामे ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे जलदगतीने करताना प्रत्येक खात्यावरील व्यवहार व उलाढाल तपासता येत नाही. त्यामुळे ‘संशयास्पद व्यवहार अहवाल’ बनविणे जिकिरीचे असते व संशयास्पद व्यवहारांची माहिती बँकेला सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय आíथक गुन्हे अन्वेषण विभाग अशा कार्यालयामार्फतच बहुधा समजते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. इतक्या ‘सब्जेक्टिव्ह’ व संदिग्ध सूचना असल्यामुळे त्या अमलात आणण्यासाठी संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) अद्यापपर्यंत कोणी बनवू शकलेले नाही.
प्रत्येक बँकेतील सर्व व्यवहारांचे केंद्रीय नियंत्रण आर.टी.जी.एस.प्रमाणे तात्काळ करण्यासाठी संगणक प्रणाली रिझव्‍‌र्ह बँकेने विकसित करून त्या प्रणालीवर काम करणारे तज्ज्ञ अधिकारी नेमल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या या विषयातील अपेक्षा पूर्ण होऊ शकतील व आíथक गुन्ह्यांना मुळातच पायबंद बसेल; परंतु असा प्रकल्प राबविण्यासाठी बराच खर्च करावा लागेल, तरीही तो आपल्या देशात आवश्यक आहे असे दिसते. कोणत्याही बँकेच्या अध्यक्षाने अधिकारी व सेवक यांना कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा संशयास्पद व्यवहारांचे किंवा आíथक गुन्ह्यांचे संशोधन व नियंत्रण त्यांच्याकडून करून घेऊ शकणार नाही. अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यासदेखील समजाव्यात इतक्या सोप्या व नि:संदिग्ध सूचना असतील तरच कोणतेही काम सक्षमतेने होते; परंतु या विषयातील सूचना अतिशय संदिग्ध व क्लिष्ट असल्याने संशयास्पद व्यवहार शोधण्याचे काम बँका पुरेशा सक्षमतेने करू शकत नाहीत. त्यामुळे केवळ बँकांना दोष न देता केंद्रीय संगणकीय संशोधन प्रणाली विकसित करून या व्यवहारांवर नियंत्रण रिझव्‍‌र्ह बँकेनेच आणले पाहिजे असे वाटते.
– विवेक शिरवळकर, ठाणे

बजरंगी आणि भाईजान

साहित्यिकांना पुरस्कारांचे तुकडे टाकून त्यांचे तुष्टीकरण करण्याचा मार्ग जगभरातली अनेक सरकारे चोखाळत असतील. बुद्धिमंतांनी जनतेचा बुद्धिभेद करू नये आणि राजकारण्यांचे उद्योग बिनबोभाट चालू राहावेत असा सर्वपक्षीय समंजसपणा त्यामागे असतो. भारतही त्याला अर्थातच अपवाद नाही. इंग्रज गेल्यानंतर सत्तेच्या जामदारखान्याच्या चाव्या सरंजामशहांच्या हातात आल्या. पंडित नेहरू हे या आधुनिक पेहेरावातल्या सरंजामशाही मानसिकतेचे मुकुटमणी! त्यांनी देशभर सरंजामशहांच्या हस्तकांना आपले सुभेदार म्हणून नेमले आणि पाठबळ दिले. महाराष्ट्र यालाही अपवाद नाही. आजवर मराठी लेखकांना किंवा पुस्तकांना जी जी सरकारी पुरस्कारांची बिस्किटे मिळालेली आहेत त्यांची आकडेवारी तपासली तर जास्तीत जास्त पुरस्कार मिळवणारी पुस्तके ही सत्ताधाऱ्यांच्या बठकीतल्या ठरावीक दोन-तीनच प्रकाशनांची असल्याचे आढळून येते.
सरकारी (किंवा बिनसरकारीही) पुरस्कार मिळवण्यासाठी किती लाचारी, जुळवाजुळवी, यातायात, लांडय़ालबाडय़ा अन् वशिलेबाजी करावी लागते हे तो पुरस्कारार्थीच नीट जाणे! प्रत्येक पुरस्कारार्थीने तो पुरस्कार कसा मिळवला? त्या वेळी परीक्षक कोण होते? निवड समितीने निवड कशी केली? असे प्रश्न स्वत:च्या मनाशी एकदा विचारावेत. पुरस्कार मिळावा यासाठी अक्षरश: भिकाऱ्यासारखे फिरणारे लेखक जसे आढळतात तसेच पोटदुखीपोटी दुसऱ्याला पुरस्कार मिळू नये यासाठी अगतिकपणे आटापिटा करणाऱ्या लेखकांचीही मोठी जमात आपल्याकडे दिसते.
बिहार निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दादरीकांड घडले. ती अत्यंत भयानक घटना होती, घृणास्पद होती. संवेदनशीलच काय पण असंवेदनशील माणसांनाही सुन्न करणारी, अक्षरश: झोप उडवणारी ती घटना होती. महाराष्ट्रात जसे जमीनमाफियांनी पाळलेले टगे असतात तसे उत्तरेतही असे इशाऱ्याची वाटच पाहत टपून बसलेले कुख्यात बजरंगी आहेत. त्यातल्या काहींनी धार्मिक उन्मादात हा हल्ला केला. िहसेचे अन् गुन्हेगारीचे रसायन मानवी मनात सतत खदखदत असते, त्याला विजिगीषुगिरीचा शेंदूर चढवून उदात्तीकरण अन् उद्दामीकरण केले गेले. पाचपोच नसलेल्या आणि मंत्रिमंडळात स्वतंत्रपणे काम करण्याचे काडीचेही अधिकार नसलेल्या मंत्र्यासंत्र्यांच्या अपरिपक्व वक्तव्यांनी जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले. या मंत्र्यांना आपल्याला मोदींनी कोणत्या खात्याचे मंत्री केलेय हे तरी माहिती असेल की नाही याची शंका वाटते.
िहदू धर्मात मांसाहाराला विरोध नाही. वेदांतही अनेक पशूंच्या मांसभक्षणाचे अगदी गोमांस भक्षणाचेही उल्लेख आहेत. मांसाहाराला विरोध हा जैनांनी सुरू केला. जैन धर्मशास्त्रात मांसाहाराला विरोध आहे. जैन समाज हा अनेक मोक्याच्या जागी आíथक नाडय़ा आपल्या हातात असणारा वर्ग आहे. त्यांच्या प्रभावामुळे किंवा दबावामुळे कारण नसताना िहदुत्ववाद्यांनी तो विरोध दत्तक घेतला. जैन लोक मांस खात नाहीत म्हणून िहदूंनीही खायचे नाही, असा हा खाक्या आहे. ही अप्रत्यक्ष बळजबरी िहदू सहन करतात. कारण जैन हे आíथकदृष्टय़ा जबरी ताकदवान आहेत. शिवाय कित्येक िहदू सरंजामशहांचे, पुढाऱ्यांचे फंड मॅनेजर्स म्हणून हे जैन लोक काम पाहतात. साहजिकच खास िहदूंची किंवा िहदुत्ववादी म्हणून जी राजकीय धोरणे ओळखली जातात त्यावर िहदूंचा नसून जैनांचा प्रभाव असतो. गोमांस भक्षणाला विरोध करणे हे िहदूंपेक्षाही जैनांच्या धर्मधोरणाला अधिक सुसंगत आहे. िहदूंनी विनाकारण वाईटपणा घेऊन जैनांचे चोचले पुरवणे यापलीकडे या मांसाहारविरोधाला काहीही अर्थ नाही. मोदींचा गुजरातेतला इतिहास आणि कार्यपद्धती ज्यांना माहिती आहे त्यांना मोदींची गो-रक्षण समिती आणि तिच्या माध्यमातून त्यांच्या गुप्तहेरांचे अन् दंडुकेबाजांचे नेटवर्क कसे चालते याची कल्पना असणारच. महाराष्ट्रातले नेते जशा गुंडपुंडांच्या टोळ्या पोसतात तशीच गुजरातेतली ही मोदी-बिग्रेड! याचीच बिहारी आवृत्ती म्हणजे दादरीतले बजरंगी.
ही झाली बजरंग्यांची गोष्ट. याच्या उलट आपले भाईजान.
हे भाईजान म्हणजे उंडगे तृतीयपृष्ठी पुरोगामी. यातल्या अनेकांनी पुरस्कार मिळवून जेवढी प्रसिद्धी मिळवली नसेल त्याच्यापेक्षा जास्त पुरस्कार परत करून मिळवली. यातल्या कित्येकांना तर पुरस्कार मिळालेले होते हे त्यांनी तो परत केल्यावर उघडकीला आले! या सगळ्यात तत्त्वापेक्षा भावनेचा, भावनेपेक्षा आवेशाचा आणि आवेशाइतकाच व्यावहारिक गुंतवणुकीचा भाग जास्त आहे. शेअर बाजारातले सटोडिये जसे एखाद्या शेअरची किंमत कमी झाल्यावर विकत घेतात अन् वाढलेली दिसल्यावर तो विकतात तसे हे पुरस्कारार्थी आता स्टॉपलॉस लावून पुरस्कार परत करत आहेत. पुरस्कार परत करणे ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. कारण पुढे-मागे मोदीराज्य जाऊन आपले रामराज्य येईल तेव्हा हे पॉइंन्ट्स वापरता येतील अशी स्टंटोत्सुक अटकळ त्यामागे आहे. शिवाय सध्या मोदीराज्यात आपल्या पुरोगामीपणाची प्रतिमा तडकेदार करता येईल हा वरकड फायदा आहेच. या पुरस्कारार्थी बिलंदरांनी एक तर पुरस्काराचे सर्व फायदे उपभोगलेले तरी आहेत किंवा ते इतके खुडूक आहेत की पुरस्कार मिळूनही त्यांना काही फायदा झालेला नाही. त्यामुळे आता परत करून तरी काही होतोय का फायदा बघू, असा विचार यामागे आहे. या भाईजानांपकी काही भाईजान मात्र अगदीच पोचलेले आहेत. कारण त्यांना पुरस्कार, पदे असे व्यवस्थेतले फायदे मिळवण्यासाठी किती हिकमती कराव्या लागल्या आहेत हे ते विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांची भूमिका ही मागच्या मालकाशी प्रामाणिक राहणाऱ्या प्राण्याची आहे. मागच्या मालकाने मला टाकलेला तुकडा मालक बदलला म्हणून मी तोंडचा का टाकू? असा निरागस सवाल त्या लोकांचा आहे आणि तो त्यांच्या ध्येयधोरणांना सुसंगतच आहे.
यावर उपाय म्हणजे सरकारने एक अधिनियम करून किंवा वटहुकूम काढून सर्वाचे सर्वच्या सर्व पुरस्कार परत घ्यावेत आणि रीतसर टेंडरे मागवून पुरस्कारांची बोली आणि पुरस्काराच्या रकमेवर दोनशे टक्के उत्पन्न-कर लावून सरकारी पातळीवरच अधिकृतपणे पुरस्कार विकावेत म्हणजे निदान थेट सरकारच्या पदरी तरी चार पसे पडतील आणि एखादी जनधनकल्याणाची भपकेबाज योजना सुरू करता येईल. याच्याने ज्याला परवडेल तोच पुरस्काराच्या वाटेला जाईल, बाकीचे निदान कान पाडून आपली आपली साहित्यनिर्मिती करतील आणि साहित्याला जरा तरी बरे दिवस येतील!
– सलील वाघ

विवेकबुद्धीची थट्टा

पुरस्कार परत करू पाहणाऱ्या विचारवंतांकडे नतिक अधिष्ठान नाही आणि त्यांची लगीनघाई हा दिखाऊ उथळपणा आहे. तसेच ते सर्व जण काँग्रेस या पराभूत राजकीय पक्षाचे (वैधव्य प्राप्त झालेले) निष्ठावान समर्थक आहेत, असा आरोप करणारे ‘विधवा विचारवंत’ या संपादकीयातले प्रतिपादन हे, त्या व्यक्तींच्या सरकारला जाब विचारण्याचे कर्तव्य पार पडू इच्छिण्याच्या विवेकबुद्धीची थट्टा करणारे आहे. प्रभावी आणि अधिक परिणामकारक ठरू शकणाऱ्या या मार्गाचा अवलंब त्यांनी केला, याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे.
आज विवेकाचा आवाज बुलंद करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी अशा घटना घडल्यावर जाहीर नापसंती व्यक्त न करणाऱ्यांना आताही तसे करण्याचा हक्क नाही, असे म्हणणे म्हणजे गुन्हेगाराने ‘माझ्या यापूर्वीच्या गुन्ह्यांचा शोध पोलीसयंत्रणा लावू शकली नाही, त्यामुळे आता केलेल्या गुन्ह्याबद्दल मला शिक्षा करण्याचा अधिकार नाही,’ असे म्हणण्यासारखेच नव्हे काय? किंवा काँग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून आम्हीही करणार, असे भाजपने म्हणण्यासारखेच आहे.
‘आपण समाजवादी असून आयुष्यभर काँग्रेसविरोधक राहिलो, परंतु आजच्या काळात बिगरभाजपाई असणे हे बिगरकाँग्रेसी असण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. मी इंदिरा गांधी यांचा कठोर टीकाकार होतो, मी त्यांच्याविरोधात प्रचारही केला आहे. परंतु भाजपचे समर्थक आता ज्याप्रमाणे मला शिवीगाळ करताहेत, तशा प्रकारची शिवीगाळ काँग्रेसवाल्यांनी कधीही केली नाही,’ असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांनी म्हटल्याचे स्मरते.
– प्रमोद तावडे, डोंबिवली

हास्यास्पद समज

‘आणीबाणीनंतर पहिल्यांदाच साहित्यिकांनी आवाज नोंदवला’ हे पत्र (लोकमानस, १३ ऑक्टो.) वाचले. १९७४ पासून मी अभिव्यक्ती व व्यक्ती यांच्या प्रतिष्ठापनेसाठी लढत होतो, वृत्तपत्रांतून लिहीत होतो. त्या वेळी नागपूरस्थित साहित्यिक माझी टिंगल करीत. आणीबाणीत मी अभिव्यक्ती व व्यक्ती यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना तर महाराष्ट्रातले बाकीचे लेखक हे वीस कलमीला पािठबा देत होते. तसे त्यांनी भेकडपणाचे पत्रकही काढले होते. दुर्गा भागवत व पु.ल. देशपांडे हे नंतर उतरले. आणीबाणीत एकूण लेखक हे सरकारविरुद्ध होते, हा भयानक हास्यास्पद समज आहे. उलट अनेकांनी पाठिंबाच दिला होता.
– प्रा. शिरीष गोपाळ देशपांडे ,
सेवानिवृत्त विद्यापीठ पदव्युत्तर विभागप्रमुख

खरा विचारवंत हा नेहमीच राजसत्तेच्या शत्रुपक्षात हवा!

देशातील तथाकथित पुरोगाम्यांच्या निवडक निषेधाचा इतिहासच ‘विधवा विचारवंत’ या अग्रलेखात (१२ ऑक्टो.) मांडला गेला. महत्त्वाचे म्हणजे ‘विचारस्वातंत्र्यावर अव्यभिचारी निष्ठा असेल तर सत्ताधीश कोणीही असो, तिचे रक्षण करणे हे विचारांना मानणाऱ्यांचे कर्तव्य ठरते,’ ‘कडव्या िहदुत्ववादी राजकारणाचा उदय झाला तो या आणि अशांच्या निवडक निषेध सवयींमुळेच,’ अशी अत्यंत महत्त्वाची मीमांसा या अग्रलेखात आहे.
नरहर कुरुंदकर देशातील समाजवाद्यांना व पुरोगाम्यांना हे सातत्याने सांगत राहिले की, ‘माझ्या लेखणीमुळे प्रतिगाम्यांचे हात बळकट होत नसून ते का बळकट होतात याची कारणमीमांसा मी करीत आहे,’ िहदू-मुस्लीम असा भेदाभेद न करता त्यांनी दोन्ही धर्माची सारखीच चिकित्सा केली. पण अनेकांना ते प्रतिगामी वाटत राहिले. पुरोगाम्यांनी गंभीरपणे बदलत्या परिस्थितीचा विचार करावा की, दिवस-रात्र पुरोगामित्वाचा धोशा लावूनही या झाडाला विषारी प्रतिगामी फळे कशी लगडली?
हमीद दलवाई, अ. भि. शाह, नरहर कुरुंदकर या विचारवंतांनी हातचे काहीही राखून न ठेवता सर्व प्रतिगाम्यांची चिकित्सा केली. पण त्यांचा वारसा सांगण्याचीही लाज आजच्या पुरोगाम्यांना वाटते. ६० वष्रे राजकारण्यांनी जे सत्तापीठात बसून केले तेच आपापल्या कंपूत बसून सिलेक्टिव्ह विचारवंतांनी केले, परिणामी या पोकळ व निवडक निषेधलहरींची नोंद विचारवंताच्या दृष्टीने ‘सामान्य’, ‘अज्ञानी’ असलेल्या ‘प्रौढ’ मतदारांनी घेतली आणि मतपेटीतून सणसणीत चपराक लगावली.
विचारांवर निष्ठा असल्यास जे जे सडके, प्रतिगामी, जुनाट, मानवतेला काळिमा लावणारे, निषेधार्ह, सामाजिक ऐक्याचा बळी देणारे त्या सगळ्यांचाच एकमुखाने धिक्कार करायला पाहिजे. भाजप असो की मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन, यांना का बळ मिळत आहे हे समजून घेतले पाहिजे. खरा विचारवंत हा नेहमीच राजसत्तेच्या शत्रुपक्षात असतो, त्यामुळे कोणत्याही राजसत्तेच्या वळचणीचा आश्रय न घेता निर्भीडपणे अभिव्यक्त झाले पाहिजे. आम्ही सांगतो तोच विचार खरा मानणाऱ्या ‘विधवा’ विचारवंतांचे असे कोणी तरी वैचारिक ‘केशवपन’ करण्याची आवश्यकता होती, ते काम या अग्रलेखाने केले.
– डॉ. बालाजी चिरडे, नांदेड
‘विधवा’ हा शब्द अस्थानीच
अग्रलेखातील ‘विधवा’ शब्द खटकला. अशा प्रकारे स्त्रीचं वर्णन करणारे ठरावीक साच्यातले शब्द वापरण्याला आमचा आक्षेप आहे. जिचा नवरा वारलेला आहे त्या स्त्रीला ‘विधवा’ म्हणतात. नवरा जिवंत असेपर्यंत स्त्रीला मिळणारं सामाजिक सुरक्षेचं कवच तो वारल्यानंतर नाहीसं होतं. त्यामुळे स्त्रीच्या वाटय़ाला असहाय, असुरक्षित आयुष्य येतं अशी समजूत आहे. पण वास्तवात मात्र नवरा वारल्यानंतर असंख्य स्त्रिया खंबीरपणे स्वत:चं, मुलांचं आयुष्य सावरतात, यशस्वी होतात असं दिसतं. एखाद्या व्यक्तीच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कृतीबद्दल बोलताना तिच्या वैवाहिक स्थितीचा उल्लेख करणंच गर वाटतं. त्यामुळे अग्रलेखातला ‘विधवा’ हा शब्द अस्थानीच आहे.
– वंदना खरे, मेधा कुळकर्णी, मृण्मयी रानडे, परिणिता दांडेकर, सायली राजाध्यक्ष, अमिता दरेकर, वसुधा कुळकर्णी आणि शर्मिला फडके

(अपर्णा विनायक बडे, पुणे, रामचंद्र महाडिक, सातारा, कल्याणी मांगले, पुणे, विशाल मंगला वराडे, राहुल एस. वारे – मुंबई, यांनीही अन्य मुद्दय़ांसोबत, ‘विधवा’ या शब्दावर नापसंती व्यक्त करणारी पत्रे पाठविली आहेत. )

एका ‘कॉन्टिनेन्टल’ची दुर्दैवी कथा

$
0
0

‘कॉन्टिनेन्टल’ हा विजेता अश्व आजपर्यंत आपल्या धन्यासाठी जीव तोडून धावत असतानाच मरण पावल्याची बातमी (लोकसत्ता, १३ ऑक्टो.) वाचून सुन्न झालो. बिचाऱ्याला आपला शेवटही असा होईल याची पुसटशी कल्पनाही आली नसेल. मानव हा सर्वात घातकी प्राणी आहे, असे जंगलकथेत प्राण्यांच्या तोंडी असणारी मानवाबद्दलची उपेक्षितपणाची वाक्ये आम्ही अशा वागण्याने सार्थ ठरवत आहोत का, अशी परिस्थिती वरील घटनेने निर्माण झाली आहे. अनेक लोक भाकड गाई, म्हशी, म्हातारे घोडे, कुत्रे केवळ वयस्कर झाले म्हणून रस्त्यावर बेवारस सोडून देतात. अशा वेळी त्या मुक्या जिवावर काय परिस्थिती ओढवेल याचा पुसटसा विचारसुद्धा जर मनात येत नसेल, तर आम्ही खरोखर माणूस म्हणायला पात्र आहोत काय?

अशा वेळी स्मरण होते ते वाळवंटात गाढवाला पाणी पाजणाऱ्या एकनाथ महाराजांचे आणि लोक बिरादरी प्रकल्पात अनाथ प्राण्यांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या प्रकाशभाऊ आमटे यांच्यासारख्यांचे. ‘कॉन्टिनेन्टल’चा शेवट चटका लावून गेला, तसेच प्राणिमात्रांबद्दलचे हे विचार समाजात रुजत नाहीत याची खंतही बळावली.
– बाळासाहेब बेकनाळकर, कोल्हापूर
कोकणकडय़ाला वाचवा!

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाला पडलेल्या भेगेबाबतचे वृत्त (२ ऑक्टो.) वाचले. या विषयाकडे लक्ष वेधले याबद्दल सर्वप्रथम ‘लोकसत्ता’चे धन्यवाद. हरिश्चंद्रगडच्या कोकणकडय़ास साहसवीरांच्या जगात खूप महत्त्व आहे. हा कडा म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले एक अद्भुत रसायन आहे. हा कडा गिर्यारोहणामध्ये खूप वरच्या श्रेणीमध्ये पकडला जातो.अंतर्वक्र स्वरूपाच्या या कडय़ावर क्लायम्बिंग (प्रस्तरारोहण करणे), रॅपलिंग (दोरीच्या साहाय्याने कडा उतरणे), व्हॅली क्रॉसिंग (दोरीच्या साहाय्याने दरी ओलांडणे) आदी साहसी प्रकार सतत सुरू असतात. हे सर्व प्रकार इथे गिर्यारोहकांसाठी सतत आव्हान देणारे असतात. अशा या कडय़ाला भेग पडल्याचे वृत्त वाचल्यानंतर संभाव्य धोक्याची भीती चाटून गेली. काही वर्षांपूर्वी या कडय़ाचा काही भाग कोसळला होता. त्या वेळी काही गिर्यारोहक थोडक्यात बचावले होते. या कडय़ावर रोज अनेक पर्यटक, दुर्गप्रेमी, गिर्यारोहक येत असतात. अशा वेळी या भेगेकडे दुर्लक्ष करणे भविष्यात एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. शासनाने तातडीने या विषयांतील अभ्यासकांच्या मदतीने या कडय़ाला वाचविण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे वाटते.
– उमेश झिरपे, पुणे
हा राष्ट्रीय गुन्हाच

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाला पडलेल्या भेगेबाबतचे वृत्त व त्यावरील पत्रव्यवहार (लोकमानस, ९ व १० ऑक्टो.) वाचले. हा गड आणि त्याच्या या कडय़ास महाराष्ट्राच्या दुर्गसंपत्तीमध्ये खूप मानाचे स्थान आहे.
शासनाने तातडीने या कडय़ाला निर्माण झालेल्या या धोक्याचा अभ्यास करून त्यावर उपाय योजणे गरजेचे वाटते; परंतु या जोडीनेच या वृत्तातील अन्य एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. या कडय़ावर सुरक्षेसाठी लावलेले कठडे काहींनी परस्पर खाली दरीत टाकून दिल्याचेही समजले. ही वृत्ती खूप गंभीर आहे. हे कठडे सगळ्यांच्याच सुरक्षेसाठी लावलेले असतात. तसेच त्यांची उभारणी ही जनतेच्या पैशातून होत असते. असे कठडे कुणाला तरी वाटले म्हणून त्यांनी फेकून देणे हा राष्ट्रीय गुन्हा आहे. या घटनेचाही शोध घेतला जाणे गरजेचे वाटते.
– चंद्रशेखर शेळके
सदस्य, राज्य शासन दुर्ग संवर्धन समिती

जिज्ञासा दाबून टाकणे म्हणजेच खरी गुरुभक्ती?

१५ ऑक्टोबरच्या ‘अभंगधारा’मध्ये शिष्याने सद्गुरूच्या आज्ञेबाहेर जराही असू नये, स्वत:ची वकिली किंवा युक्तिवादही करू नये, असा उपदेश सांगितला आहे. हे सर्व आत्मोन्नतीकडे नेणारे आहे की बौद्धिक गुलामीकडे? यंत्रवत आज्ञा पाळा (तेही कधी कधी आज्ञा पाळत नाही.) हा उपदेश मुळात माणुसकीत बसतो काय?
शंका विचारताना, युक्तिवाद करताना अत्युच्च नम्रतेचा आग्रह रास्त ठरेल, पण स्वत:ची जिज्ञासाच दाबून टाकणे म्हणजेच खरी गुरुभक्ती हे कसे मान्य व्हावे? खुद्द भगवद्गीताही ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्। संशयात्मा विनश्यति।’ असे म्हणत असेल तर त्यास काय म्हणावे? याउलट ‘शंकावान लभते ज्ञानम’ असे म्हणायला हवे, कारण प्रश्न विचारल्याशिवाय नव्याने ज्ञान प्राप्त कसे होणार?
याउलट भगवान बुद्ध यांचा ‘मी जे काही सांगितले म्हणून केवळ विश्वास ठेवू नकोस, कोणी प्रसिद्ध व्यक्ती म्हणते, म्हणून तू ऐकू नकोस. तुझ्या सदसद्विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल त्यावरच विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण कर’ हा उपदेश आजच्या विज्ञानयुगाला साजेसा वाटतो. अर्थात कुठल्या धर्मातील उपदेश सरस हे दाखवून देण्याचा अजिबात उद्देश नाही.
– अनिल मुसळे, ठाणे

बाहुल्यांचे आकर्षण

सध्या वृत्तपत्रांत दुर्गा, काली अशा मूर्तीचे सुंदर फोटो येतात. विशाल नेत्र, उंचावलेल्या भुवया, रौद्रमुद्रा अशा भव्य अष्टभुजा मूर्ती चौका-चौकांत दिसतील.
दर्शनाला माणसांच्या झुंबडी लोटतील. महिन्यापूर्वी विविध रूपांतील गणेशमूर्ती, लोभसवाण्या गौरी, हिरवी साडी, नाकात नथ, गळ्यात हार, सस्मित मुखावर सात्त्विक भाव. सजावटीत आणखी मूर्ती. या बाहुल्याच बाहुल्या पाहायला अलोट गर्दी झाली. माणसांना मूर्तीचे इतके विलक्षण आकर्षण का? नुसते आकर्षण नव्हे, तर ही देवी आहे.
ती दुष्टांचा नि:पात करील. आमचे रक्षण करील, अशी अनेकांची श्रद्धा असते. याविषयी वैज्ञानिक कार्ल सेगन लिहितात, ‘‘जन्मलेले अर्भक जेव्हा डोळे उघडते तेव्हा त्याला सर्वप्रथम दिसतो आईचा (अथवा दाईचा) सस्मित चेहरा. या अपरिचित जगात ही आपले रक्षण करील असे त्याला वाटते. मानवी चेहरा-कपाळ, कान, नाक, डोळे, तोंड- ही प्रतिमा त्या चिमुकल्या मेंदूत ठसून राहते.’’
मूल मोठे झाल्यावर त्याला माणसाच्या मर्यादा समजतात. आई सदैव माझे रक्षण करू शकणार नाही हे कळते. पण सर्वप्रथम उमटलेली ती आश्वासक प्रतिमा विसरली जात नाही. मग माणूस मूर्ती घडवतो. देवळात स्थापतो. ती शक्तिमान आहे असे मानतो. तिची पूजाअर्चा, प्रार्थना करतो. दुर्गामातेच्या उत्सवाची प्रथा पडते.
-प्रा. य. ना. वालावलकर, पुणे


जखमेवर मीठ चोळू नका

$
0
0

‘तेल आले, पण डाळ गेली’ हा अग्रलेख (१६ ऑक्टो.) वाचला. ज्या दरिद्रीनारायणाचे आणि शेतकऱ्याचे उठताबसता नाव घेत मोदींनी निवडणूक जिंकली त्याच गरिबाला सत्तेवर येऊन दीड वष्रे होण्याच्या आतच महागाईच्या गत्रेत लोटण्याचा उद्दामपणा त्यांच्या सरकारने केला. यासारखी कृतघ्नता दुसरी कुठलीही नसेल. सरकारला हे माहीत नाही का, की देशाला अवर्षणाचा जबरदस्त फटका बसला आहे? त्यांना माहीत नाही का, देशावर नापिकीची अवकळा पसरली आहे? त्यांना माहीत नाही का, शेतकरी डाळींचे पीक घेण्यास उत्सुक नाही? हे माहीत नसेल, तर त्यांना देशात काय चालले आहे हेच माहीत नसावे. बरे हे माहीत असूनही पुरेशी डाळ आयात न करता डाळींसारख्या रोजच्या खाद्यान्नाचे भाव गगनाला भिडू देण्याचे पातक ज्या अर्थी हे सरकार करते त्या अर्थी सामान्य जनतेच्या जगण्या-मरण्याचे त्यांना थोडेही सोयरसुतक नसावे. एकीकडे शेतकऱ्याला डाळीचे किलोला ३० रुपये मिळतात आणि बाजारात जनतेला २०० रुपये मोजावे लागतात. या बेपर्वा धोरणामुळे साठेबाजांशी या सरकारचे साटेलोटे असावे, असा संशय निश्चितच बळावतो. ‘आता आम्ही हजारो टन डाळ आयात करणार आहोत’ ही घोषणा म्हणजे रोगी मरून गेल्यावर उपचार सुरू करण्यासारखे आहे. तेल आले ते तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव कोसळल्यामुळे, पण डाळ गेली ती सरकारच्या बेफिकिरीमुळे असेच म्हणावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या एक जोक फिरतोय – डाळीचे भाव पाहून एका माणसाचा जीव गेला. डॉक्टरने डेथ सर्टिफिकेटमध्ये मृत्यूचे कारण लिहिले ‘नो पल्स’!

– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)

 

पुस्तकांसाठी निधीच नसल्याने मुले वाचणार काय?

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यासाठी मुलांना पुस्तक वाचनाची सक्ती शासनाने केली खरी; परंतु गेल्या आठ वर्षांत पुस्तक खरेदीसाठी अनुदानच दिले नाही. आणि गेल्या दोन वर्षांत जे वेतनेतर अनुदान दिले, ते घटविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत पुस्तकांची खरेदीच झाली नाही, तर मुलांना नवनवीन पुस्तकांच्या वाचनाचा आनंद कसा देणार, असा प्रश्न शाळांपुढे पडला आहे.
बहुतांशी शाळांमध्ये ग्रंथालयांची अवस्था गेल्या काही वर्षांत खालावली आहे. खासगी अनुदानित शाळांना पूर्वी त्या शाळेचे जेवढे वेतन अनुदान असेल आणि शाळा किती वर्षांची आहे, याचा विचार करून अनुदान दिले जाई. २००४ पासून राज्य शासनाने वेतनेतर अनुदानच थांबवले. त्यामुळे शाळांमध्ये पुस्तकांची खरेदीच बंद झाली आणि कोणी दाता मिळाला तर पुस्तकांची मागणी केली जाऊ लागली. त्यातही बहुतांशी संस्थाचालकांच्या दृष्टीने पुस्तके आणि ग्रंथालय हा दुय्यम विषय असल्याने संस्थाचालकांनी पदरचे खर्च करून फार मोठय़ा प्रमाणात पुस्तक खरेदी केली असे होत नाही.
राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर वेतनेतर अनुदानाच्या निकषात बदल केला असून २००८ मध्ये जितके वेतनेतर अनुदान मिळत होते, त्याच्या केवळ चार टक्के अनुदान त्या शाळेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच अगोदर मिळणाऱ्या अनुदानात मोठी कपात करण्यात आली. २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षांचे वेतनेतर अनुदान चार टक्के या हिशेबानेच देण्यात आले आहे. या रकमेत फíनचर तयार करणे, रंगरंगोटी, स्टेशनरी, दिवाबत्तीची देयके देणे, टेलिफोन बिल असाखर्च करावा लागत असल्याने पुस्तकांसाठी निधीच शिल्लक राहत नाही. पुस्तके खरेदी होत नसल्याने मुलांना तीच ती पुस्तके किती वेळा वाचायला लावणार, असा प्रश्न आहे.
– विकास नागरकर, हिंगणघाट
तेव्हा गूळ कोण आणि मुंगळा कोण होते?

‘शिवसेना गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यासारखी’ ही बातमी (१५ ऑक्टो.) वाचली. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य वाचता क्षणीच मला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ वर्षांचे सरकार आठवले. शेवटी शेवटी तर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांचे नावसुद्धा घेत नव्हते. म्हणजे एकूणच काय, तर तेव्हाही आघाडीचे सरकार होते आणि आता युतीचे सरकार आहे. तेव्हाही आपापसात बेबनाव होता आणि आताही आहे. राष्ट्रवादीचेच अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत अडकू लागल्याने मग कुरघोडी करण्यासाठी कॉँग्रेस नेत्यांच्या भानगडी पत्रकारांना पुरवण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करत नव्हते का? फायलींवर सह्य़ा होत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लकवा मारला की काय, अशीही विधाने तेव्हा केली गेली. आता शिवसेना गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यासारखी असेल, तर यांची सत्ता असताना १५ वष्रे गूळ कोण आणि मुंगळा कोण होते यावरही साहेबांनी भाष्य केले असते तर आनंद वाटला असता.
– राजीव नागरे, ठाणे

‘ विधवा’ शब्दाला विरोध नको!

‘विधवा’ या शब्दाबद्दल अनेकांनी आक्षेप घेत ‘लोकसत्ता’चा धिक्कार केला (लोकमानस, १६ ऑक्टो.) आहे. मला मात्र यात काहीच गर वाटत नाही. त्याचे कारण असे की, मराठी भाषा त्यातील उपमा, संदर्भ हे आपल्या समाजजीवनाचा प्रातिनिधिक आरसा म्हणून समोर येतात. त्यात समाजातील बदलत्या पर्यावरणानुसार बदल करावा असे सांगणे उचित होणार नाही. आजही अनेक बुद्धिवादी लोक दुर्दैव हा शब्द वापरताना दिसतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वातावरणात असा शब्द वापरल्यामुळे कोणी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.
‘आम्ही काय बांगडय़ा भरल्या आहेत का?’ असेही वाक्य वापरतात आणि एखादा मुद्दा परिणामकारकपणे व्यक्त करण्यासाठी तो एखाद्याने वापरला तर भाषा म्हणून तो स्वीकारायला काय हरकत आहे? आपण आपल्या आधुनिकतेचा बाज टिकवण्यासाठी भाषेचे सामथ्र्य आणि सौष्ठव बिघडून टाकता कामा नये. स्त्री कुठे आज अबला आहे, हे परिसंवादात मांडणे ठीक आहे, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आजही घटस्फोट झाला तर स्त्रीला पोटगी मिळते (काही अपवादात्मक प्रकरणे सोडून), नवऱ्याला नाही. आपल्यासाठी बसपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आजही आरक्षणे आहेत. करिअर करणाऱ्या महिलांना प्राप्तिकरात विशेष सूट आहे आणि ती आम्हाला नको असा कोणताही बुलंद आवाज आपण अजूनपर्यंत तरी काढला नाही. मग अबला, विधवा, परित्यक्ता या शब्दांनाही विरोध करू या नको. हा शब्द वापरल्यामुळे आलेली संतापाची लाट पाहता हा शब्द किती चपखलपणे त्या ठिकाणी बसला आहे हेच सिद्ध करीत नाही काय?
– शुभा परांजपे, पुणे

नतद्रष्ट शिवसेना नेतृत्व

‘शिव-शाईचा स्वार्थवाद!’ हा अग्रलेख परखड व शिवसेनेची ढोंगबाजी उघड करणारा आहे. उद्धव ठाकरे यांची वागणूक त्यांनी सारासार विवेक पूर्णपणे गमावल्याची निदर्शक आहे. आपण भाजपवर निवडणुकीत केलेली सभ्यताविहीन टीका ठाकरे विसरले आहेत. तरीही त्यांना भाजपकडून सन्मानपूर्ण वागणूक हवी आहे. एवढी तक्रार आहे तर सरकारमध्ये शिवसेना कशासाठी सामील आहे? त्याचे उत्तर सोपे आहे. ज्याक्षणी उद्धव ठाकरे हा निर्णय घेतील त्याक्षणी शिवसेनेत उघड फूट पडेल. सुभाष देसाई, अनिल देसाई, अनंत गीते यांच्यासारखे समजूतदार नेते बंड करतील, ही उद्धव ठाकरेंची भीती आहे. सेना नेतृत्व स्वत:च्या पक्षासाठी खड्डा खणत आहे, हे स्पष्ट आहे.
– विजय प्रभू, पुणे

हा नवा प्रादेशिकवाद न्यायालयात टिकेल?

$
0
0

‘नोकरभरतीतून नव्या प्रादेशिकवादाची ठिणगी?’ या शीर्षकाची बातमी (लोकसत्ता, १९ ऑक्टो.) वाचली.
सगळे काही सुरळीत सुरू असताना सरकारला ही बुद्धी झाली आहे! विदर्भ व मराठवाडा, जळगाव या भागांतील मुले पश्चिम महाराष्ट्राच्या मुलांबरोबर पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यासिकेत एकत्र अभ्यास करतात. एकमेकांना सहकार्यदेखील करतात आणि पुणे केंद्र निवडून लोकसेवा आयोगाची परीक्षाही पुण्यातच देतात. असे असताना सरकारने पश्चिम महाराष्ट्र व कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्राला जास्त प्रमाणात नोकरीची भाषा करणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागातील मुलांच्या घटनेतील मूलभूत हक्काची (कलम १५- जन्मस्थानावरून भेदभाव) पायमल्ली आहे.
आम्ही असे होऊ देणार नाही. न्यायालयात याचिका दाखल करणार. मुळात राज्य सरकार ज्या ३७१व्या अधिकाराचे समर्थन करतेय यासाठी त्या कलमातदेखील राज्य सरकारला अधिकार नाही, त्यामुळे कोर्टात टिकण्याची शक्यताही अत्यंत कमी आहे.
– डॉ. स्वप्निल यादव, पुणे

स्वार्थ साधणारे वेगळेच!
नवी मुंबईजवळ दिघा येथील अवैध इमारतीवर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. तशीच कारवाई आता वसई-विरार येथील बेकायदा इमारतीवरदेखील सुरू झाली आहे. दुसरीकडे, बेकायदा इमारती कायदेशीर कशा करून घेता येतील याचा विचार शासन पातळीवर होत आहे. त्याचा निर्णय होईपर्यंत आणखी काही इमारती जमीनदोस्त होतील, मग अचानक एक दिवस उरलेल्या इमारतींवर पडणारा हातोडा थांबवला जाईल. म्हणजे ज्यांच्यावर आधीच कारवाई पूर्ण झाली आहे आणि ना पाडलेल्या इमारतींतील रहिवासी अशा दोन तऱ्हेच्या रहिवाशांचा गुंता अधिकच विचित्र होऊन बसेल. ज्यांनी या इमारती उभारल्या त्यांच्यावरविरुद्ध कारवाई होईलदेखील. तो खटला न्यायालयात किती काळ चालेल आणि त्याचा निकाल काय असेल हे सांगणे कठीण आहे. गरजू, गरीब आणि पापभीरूमाणसे मात्र त्यात भरडली जातील.
हे पाहून, देमार सिनेमांमध्ये हमखास बघायला मिळणारा एक प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही. खलनायक पकडला गेल्यावर नायक किंवा नायिकेच्या कुठल्या तरी जवळच्या नातेवाईकाची ढाल पुढे करून त्याच्यासमोर पिस्तूल रोखून उभा असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला बंदूक खाली टाकायला भाग पाडतो! कुठल्याही कायदेशीर कारवाईचा त्रास नेहमीच गरीब माणसाला भोगावा लागतो, कारण समाजात त्यांचीच संख्या बेसुमार आहे. त्यांची ढाल पुढे करून आपला स्वार्थ साधणारे वेगळेच असतात. बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या वेळीही बहुधा असेच घडत असावे.
– मोहन गद्रे, कांदिवली पूर्व (मुंबई)

म्हणे, भाषेचे सौष्ठव पाहा!
‘विधवा शब्दाला विरोध नको’ या पत्रातील (लोकमानस, १९ ऑक्टो.) चारही मुद्दय़ांवर माझा आक्षेप आहे. एखाद्या शब्दाविरुद्ध खूप तीव्र प्रतिक्रिया उमटली म्हणजे तो शब्द चपखल आहे ही समजूतच चुकीची आहे. तसे असेल तर मुलायमसिंह यांनी महिलांबाबत केलेल्या अनेक वक्तव्यांबद्दल आणि त्यांतील शब्दांबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्याचे समर्थन करणार का? तसेच न्यायालयानेही ‘ठेवलेली बाई’ यातील ‘ठेवलेली’ या शब्दाबद्दल आक्षेप घेतला होता. मग रूढीप्रमाणे तो शब्दही ‘भाषासौष्ठवासाठी’ चालू ठेवायचा का? पुरुषांमध्ये भांडणे होत असताना आयाबहिणींचा उद्धार होतो तेव्हा समोरच्याची प्रतिक्रिया तीव्र असते; मग शिव्या देणे योग्य ठरते का? ‘विधवा’ शब्दाचे समर्थन ‘बांगडय़ा भरल्या नाहीत’ अशा उदाहरणावरून करणे म्हणजे एका वाईट कृतीच्या समर्थनासाठी दुसऱ्या वाईट कृतीचे उदाहरण देण्यासारखे आहे. जे काम खरे तर आताचे राजकीय पक्ष चांगल्या प्रकारे करतच आहेत!
तिसरा मुद्दा म्हणजे एका महिलेनेच ‘विधवा’ शब्दाला समर्थन देणे, यात आश्चर्यकारक काहीही नाही. ही आपल्या तथाकथित पुरोगामी समाजाची खरी बाजू आहे, कारण विधवांचा प्रत्येक स्थानी अपमान करण्यात तथाकथित पतिव्रता, सौभाग्यवती, घराची लक्ष्मी, सुवासिनी याच महिला अग्रेसर असतात आणि यांच्यासाठी आताचा नवरात्रोत्सव म्हणजे विधवांना त्यांची ‘योग्य जागा’ दाखवण्याचा सर्वात मोठा उत्सव. या तथाकथित पतिव्रतांनी ‘विधवांचे जीवन नरकासमान’ बनवले आहे. पत्रातील चौथा मुद्दा आरक्षण, पोटगी, प्राप्तिकरात सवलत यांबद्दल आहे. या तरतुदी महिलांच्या विकासासाठी तसेच हजारो वर्षांपासून स्त्रियांना घरात डांबून ठेवल्याबद्दल आहेत. महिला ‘दुर्बल’ किंवा ‘अबला’ आहेत म्हणून दिलेल्या नाहीत. तशा त्या दिल्या, तर घटनाविरोधीच ठरतील.
भाषेचे सौष्ठव टिकविण्यासाठी निषेधार्ह शब्द वापरणे योग्य असेल, तर ब्राह्मण्यवादी लोक दलित/बहुजन समाजासाठी तसेच पुरुषवर्चस्ववादी लोक स्त्रियांसाठी ज्या शब्दांचे प्रयोग करतात त्यांचेही ‘सौष्ठव’ पाहात बसायचे का? एकंदरीत, आधुनिकतेचे नाव घेत समाजास पुन्हा मनुवादी बनवू पाहण्याचा ते पत्र म्हणजे एक नमुना आहे.
– विशाल मंगला वराडे, नाशिक

‘शक्ती’ आहेच, मग काथ्याकूट कशाला?
‘मानव-विजय’मधील ‘ईश्वरचिकित्सा व सत्यशोध’ (१९ ऑक्टो) हा लेख वाचला. आस्तिकांमध्ये ईश्वराबद्दल ज्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार अनेक धार्मिक गट पडले आहेत. मात्र सगळ्या धर्माची मूळ तत्त्वे सत्य, प्रेम आणि अिहसा हीच आहेत. ही तत्त्वे पाळणे नास्तिकांनाही मान्य असणारच. म्हणजे मग प्रश्न उरतो तो एवढाच की, या जगाच्या निर्मितीचे व कल्याणाचे श्रेय कोणाचे- ईश्वराचे का विज्ञानाचे? नास्तिक लोक हे श्रेय विज्ञानाला देता देता अनवधानाने मनुष्यालासुद्धा देतात व त्याला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ ठरवून मोकळे होतात. जगामध्ये अशा अनेक गोष्टी, घटना घडत असतात, की ज्या मानवी आकलनशक्तींच्या, मर्यादेच्या व सामर्थ्यांच्या बाहेर असतात.
मानवापेक्षा सामथ्र्यवान अशी एक शक्ती असते हे आपल्याला नाकारता येणार नाही. आस्तिक लोक त्याला ईश्वर म्हणतात. नास्तिक लोक जरी त्याला ईश्वरशक्ती म्हणत नसतील तरी त्या शक्तीचे (जी शास्त्रीय आकलनाच्याही बाहेर आहे) ते अस्तित्व नाकारू शकत नाहीत. जीवनाचा सखोल अभ्यास मनुष्यास आस्तिकतेच्या वळणावर नेऊन सोडतो. जगातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ यांचे असेच मत आहे. आपण मात्र त्यावर काथ्याकूट करण्यात वेळेचा अपव्यय करत आहोत.
– जयंत रा. कोकंडाकर, नांदेड

अशाने पाठिंबा मावळेल!
‘जगजीत सिंग यांच्या पाकिस्तान भेटीत गुप्तचरांची पाळत’ ही बातमी (लोकसत्ता, १९ ऑक्टोबर) वाचली. पाकिस्तानच्या गुप्तचरांच्या या ‘कारनाम्या’च्या पाश्र्वभूमीवर भारताने त्यांच्या कलाकारांना थारा द्यावा की न द्यावा, या सध्या चच्रेत असलेल्या प्रश्नावर थारा न देण्याच्या भूमिकेकडेच पारडे झुकते. गुलाम अली कलाकार असल्यामुळे ते मान्य, पण कसुरी राजकारणी (आणि त्यातही पाकचे परराष्ट्रमंत्री राहिलेले), म्हणून ते अमान्य, असाही एक मध्यममार्गी प्रवाह आहे. पण या मध्यममार्गीयांचा पाकिस्तानी कलाकारांना असलेला पािठबा जगजीत सिंग यांच्यावरील पाळतीमुळे मावळण्याची रास्त शक्यता वाटते. अर्थात, या बातमीचा ‘साइड इफेक्ट’ म्हणून शिवसेनेने केलेल्या आक्रस्ताळी विरोधाला समर्थन मिळणे सुरू होईल की काय, अशी भीतीही आहेच!
दीपा भुसार, दादर (पश्चिम), मुंबई

सोक्षमोक्ष लावाच!
राज्य सरकारी नोकऱ्यांत प्रादेशिकवाद निर्माण केला जात आहे, दुसरीकडे, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चे (एमपीएससी) २०१५चे वेळापत्रक पूर्ण कोलमडले आहे. या गोष्टी जाणूनबुजून केल्या जात आहेत की काय, ही शंका अनेकांना यावी अशी परिस्थिती आहे. अखंड महाराष्ट्रवादी पक्षाचे याविषयी काय मत असणार? याचा सोक्षमोक्ष एकदाचा जनतेसमोरच झाला पाहिजे.
 राहुल बागडे, नाशिक

तेव्हा त्यांनी काय केले?

$
0
0

‘सामुदायिक विवेकाला आवाहन’ हा पी. चिदम्बरम यांचा लेख (२० ऑक्टो.) वाचला. लेखकांच्या हत्या व गोमांस घरी ठेवल्याचा संशय घेऊन हत्या करणे हे खरोखरच निषेधार्ह आहे. लेखकांनी पुरस्कार परत करून जो निषेध सुरू केला आहे, त्यावर ‘याआधी कधी निषेध केला नाही’ अशी जी टीका केली जात आहे ती अप्रस्तुत आहे हेही खरे. निषेध करण्याचा लेखकांचा अथवा कुणाचाही हक्क अशा युक्तिवादाने हिरावून घेतला जाऊ शकत नाही; कारण तो त्याचा घटनात्मक अधिकार आहे.
हे सत्यकथन चिदम्बरम करतात. पुढे हेही लिहिण्याचा प्रामाणिकपणा दाखवतात की मणिपूरची इरोम शर्मिला गेली १५ वर्षे सत्याग्रह (उपोषण) करीत आहे, पण मग चिदम्बरम यांच्या हे लक्षात नाही का, की यापैकी काही काळ ते स्वत: केंद्रीय गृहमंत्रीदेखील होते? ‘तेव्हा त्यांनी काय केले,’ हा प्रश्न या बाबतीत चिदम्बरम यांना नक्कीच विचारला जाऊ शकेल!
– मेघनाथ भारत चौधरे, चौसाळा (जि. बीड)

हा कसला ‘रोजगार’?
गरिबी, असहायता किंवा फसवणूक यामुळे एखाद्या स्त्रीला देहविक्रय करावयास भाग पडणे हे एक वेळ समजू शकते; पण बारमधील नाच-गाणी हे अत्यंत कमी कालावधीत भरपूर पसा मिळवून देणारे साधन बनले आहे. मुळात बारमध्ये नाचणे हा बारबालांच्या कलेचा आविष्कार नाहीच. मुलींच्या नाच-गाण्यावर पसा उडविला जाणे आणि तो त्यांच्या ‘रोजगाराचा हक्क’ ठरविणे याच्याइतका क्लेशकारी विचार असू शकत नाही. स्त्रियांना त्यातून मोठा रोजगार मिळतो, हा दृष्टिकोनही विकृती दर्शवितो. समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा विचार करता डान्सबार बंदी ही जशी काळाची गरज आहे, तद्वतच बारबालांचे पुनर्वसन ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.
– अनिल रा. तोरणे, तळेगाव-दाभाडे

मग विश्वातले प्रत्येक अस्तित्व स्वयंभूच?
‘ईश्वरचिकित्सा व सत्यशोध’ (१९ ऑक्टो.) हा लेख आणि ‘शक्ती आहेच, मग काथ्याकूट कशाला?’ (२० ऑक्टो.) हे पत्र वाचले. ईश्वरनामक शक्तीवर विश्वास ठेवणारे, ‘हे सर्व (विश्व) कोणी निर्माण केले?’ याचे उत्तर ‘ईश्वर’ असे देतात. पण ईश्वराला कोणी निर्माण केले याचे उत्तर त्यांच्याकडे नसल्याने ते ईश्वर स्वयंभू आहे असे म्हणतात. तसे असेल तर कुठल्याही रूपातले विश्वातले प्रत्येक अस्तित्वच स्वयंभू आहे असे समजायला काय हरकत आहे? स्वेच्छेने अस्तित्वात येण्याची प्रक्रिया आज आपल्याला कळत नसेल, पण अभ्यासाने ते कळू शकेल. यावर ईश्वरवादी म्हणतात की मानवी बुद्धीला मर्यादा आहे. पण हा भ्रम आहे. माणसाची बुद्धी वापरातून विकसित होणारी गोष्ट आहे. नाही तरी आपला मेंदू १० ते १५ टक्केच वापरतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
– शरद कोर्डे, ठाणे

‘निवडून न आलेल्यांची’ सद्दी!
‘न्यायिक आयोगाबाबतच्या निर्णयावर जेटली नाराज’ या वृत्तात (लोकसत्ता, १९ ऑक्टो.) ‘निवडून न आलेल्यांची जुलूमशाही’ सुरू होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. न्यायपालिका संसदेच्या नियंत्रणात राहू शकत नाही असे लक्षात आल्यावर अर्थमंत्र्यांना लोकशाही धोक्यात येत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यांना लोकनियुक्तप्रतिनिधींचे महत्त्व सांगावे लागले आहे. मात्र अरुण जेटली यांनी स्वत: कधी आणि कोणती लोकसभा निवडणूक जिंकली आहे ते आधी जनतेला सांगावे. आज राजकारणात ते जे काही आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बोट धरून ठेवल्यामुळेच, हे त्यांनी विसरू नये.
– प्रमोद शिवगण, डोंबिवली

डान्सबार बंदी आवश्यकच; पण..
डान्सबार बंदीवरील स्थगिती मागे घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सामाजिकदृष्टय़ा अयोग्य वाटतो. तसे आता राज्य सरकारनेही सूचित केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचे देखील काय चुकले? न्यायालयाला केवळ सबळ पुराव्याची भाषा कळते, सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू कमकुवत पडल्यामुळे सरकारनेच आपल्या पदरी संकट ओढवून घेतले आहे. डान्सबारमुळे समाजात विकृती व अश्लीलता पसरते. डान्सबारमधील ‘छमछम’मुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील तरुण पिढीला डान्सबार व अमली पदार्थासारख्या अयोग्य दिशा मिळाल्यास, महाराष्ट्राचे पुढील भवितव्य अंधारात आहे. आता जनतेनेच एकत्र येऊन कायमस्वरूपी डान्सबार बंदीसाठी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे!
– नितीन प्रकाश पडते, ठाणे (प.)

‘समन्यायी पाणीवाटपा’चा फेरविचार हवा
ऊध्र्व गोदावरी खोऱ्यातून मराठवाडय़ासाठी १२.८४ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, औरंगाबाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिले आहेत. राज्यातील प्रतिकूल पर्जन्यमानामुळे उद्भवलेली पाणीटंचाई लक्षात घेता जरी हे निर्देश योग्य असले तरी नाशिक, नगर भागातील धरणांतील पाण्याची सध्याची स्थिती पाहता याचा फेरविचार करणे गरजेचे आहे. मुळात १५ ऑक्टोबरचा पाणीसाठय़ाचा आढावा लक्षात घेऊन ऑक्टोबरअखेर धरण समूहातील पाणी सोडण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते, असे जलसंपदामंत्री महाजन यांनाही मान्य आहे. गंगापूर धरण समूहातील धरणे सुमारे ६० टक्के भरली असताना १०० टक्के धरणे भरल्यावर मराठवाडय़ासाठी पाणी सोडायचा आग्रह व हिशेब चुकीचा वाटतो. मुळात जायकवाडी समूहातील धरणे ५० टक्के विश्वासार्हता लक्षात घेऊन संकल्पित करणे आवश्यक असताना तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आग्रहास्तव ७५ टक्के विश्वासार्हता धरून मोठी बांधली गेली. जलसंपत्ती विकास आराखडय़ानुसार गेल्या ३५ वर्षांत ही धरणे ४६ टक्केच भरली आहेत. ऊध्र्व गोदावरी खोऱ्यात नार-पार, वैनगंगा या नद्यांचे पाणी वळविणे, नद्याजोड प्रकल्प राबवणे ही कामे प्राधान्याने घेऊन व चितळे यांच्यासारख्या अभियंत्यांचा सल्ला घेऊन हे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. अन्यथा पाण्यासाठी लोकक्षोभाला शासनाला सामोरे जावे लागेल.
– हरीश भंडारी, नाशिक

मराठवाडय़ाने सहकार्याची अपेक्षा का ठेवू नये?
मराठवाडय़ाला पाणी देण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांनी विरोध केल्याची बातमी (लोकसत्ता, २० ऑक्टो.) वाचली. राज्य सरकारने १४७०८ गावांत दुष्काळ जाहीर केला, त्यात सर्वाधिक म्हणजे ८५२२ गावे ही मराठवाडय़ातील आहेत. जायकवाडीत फक्त सहा टक्के पाणीसाठा शिल्लकआहे. जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी आदी जिल्हय़ांत तर महिन्यातून फक्त एक ते दोन वेळा पाणीपुरवठा होतो. शेतकऱ्यांचे हाल तर शेतकऱ्यांनाच माहीत, अशा भयानक परिस्थितीत ज्या धरणात ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे अशांनी थोडे पाणी सोडले तर काय फरक पडेल?
मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा या धरणांत ५५ ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे व या चारही धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश हे मेंढेगिरी समितीने ठरवून दिलेल्या समन्वयी पाणीवाटपाच्या सूत्रानुसारच आहेत. त्यामुळे नाशिक आणि नगर जिल्हय़ांना विरोध करण्यास काही कारण नाही. ते पाणी मराठवाडय़ाच्या हक्काचे आहे. बागायती शेती, मद्यनिर्मितीपेक्षा लोकांची तहान महत्त्वाची आहे.
या भयानक दुष्काळी परिस्थितीत या जिल्ह्यांकडून सहकार्याची अपेक्षा मराठवाडय़ाने का ठेवू नये?
रेल्वे रुंदीकरणाचा प्रश्न असो की इतर कोणताही, मराठवाडय़ाला संघर्षांशिवाय काहीच मिळाले नाही, हक्काच्या पाण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागला तर तेसुद्धा आम्ही करू; पण अशामुळे विदर्भासारखी उद्या जर वेगळ्या मराठवाडय़ाची मागणी जर समोर आली तर आश्चर्य वाटायला नको.
– योगेश रत्नाळीकर, नांदेड.

भाबडय़ा प्रश्नांची मालिका

$
0
0

‘मॅगीचे प्रश्नजंजाळ’ हा अन्वयार्थ (२१ ऑक्टो.) वाचला. ‘एखादा पदार्थ हानिकारक आहे असे अनेक प्रयोगशाळा सांगत असताना आता तोच सुरक्षित आहे असे इतर अनेक प्रयोगशाळा कसे सांगतात,’ असा भाबडा प्रश्न भारतीयांना पडल्याचे त्यात म्हटले आहे. अशा भाबडय़ा प्रश्नांची मालिकाच विचारी भारतीयांच्या मनात आहे. न्यायालयाने आदेश देऊनही प्रार्थनास्थळांवरील बेकायदा भोंग्यांवर कारवाई होत नाही, पण भटक्या कुत्र्यांनी फाडून खाल्ल्यामुळे काही जीव गेले तरी ‘न्यायालयाच्या आदेशामुळे’ त्यावर कारवाई करता येत नाही हे कसे?
‘गाव तेथे वीज’ आणि ‘रस्ता तेथे एस.टी.’ अशा घोषणा ऐकता ऐकता ‘इमारत तेथे जनरेटर’ आणि ‘वसाहत तेथे टँकर’ अशी स्थिती कशी आली? आणि तरीही प्रगतीचे आकडे मोठे कसे?
डाळ, कांदे, अशा जीवनावश्यक गोष्टी शेअर बाजाराला लाज वाटावी असे भावातील चढउतार कशा काय दाखवतात? (िहदी चित्रपटात गुन्हा घडून गेल्यावर वेगाने येणाऱ्या पोलिसांप्रमाणे) भाववाढीने जनतेचे कंबरडे मोडून झाले की मग साठेबाजीवर कारवाई का सुरू होते? टोल नक्की सुरू कोणी केला, त्याविरुद्ध आंदोलने नक्की कोणी कोणी केली, नक्की कोणी कोणाला फसवले? ‘पालिकेने करायचे मारल्यासारखे आणि फेरीवाल्यांनी करायचे रडल्यासारखे’ असे आणखी किती काळ चालणार?
आणि शेवटी प्रत्येक विजयादशमीला पडणारा भाबडा प्रश्न.. वाईटावर चांगल्याचा विजय आपण हजारो वष्रे न चुकता कसा काय साजरा करतो?
-प्रसाद दीक्षित, ठाणे
खर्च हवा, तो यासाठी!

‘आफ्रिकेशी नात्याचा कानोसा’ हा अनिकेत भावठाणकर यांचा लेख (२१ ऑक्टोबर) वाचून, परराष्ट्र व्यवहार व परराष्ट्र सेवेबद्दलचे अनेक पलू प्रकर्षांने जाणवले. भारत-आफ्रिका शिखर परिषदेचे आयोजन व त्यासाठी त्या खंडातील सर्व ५४ देशांना निमंत्रण ही नक्कीच कौतुकाची बाब आहे, पण त्यांना निमंत्रित करण्यासाठी होणारी दमछाक लक्षात घ्यावी लागेल.
अमेरिका, चीन व जपाननंतर भारत हा देश एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरील परिषदेचे आयोजन करत आहे; त्यामुळे भविष्यात अशा परिषदेचे नियोजन करण्यासाठी आजच्या समस्या आजच सोडवायला हव्यात. भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांची संख्या ही आता वाढवणे आवश्यक आहे, जेणेकरून जगातील राष्ट्राशी संबंध दृढ होतील; जे महासत्तेच्या दिशेने ‘स्मार्ट पाऊल’ ठरेल.
अर्थात त्यासाठी, महापुरुषांच्या पुतळय़ावर तीन हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर कार्य करणे आवश्यक आहे. पुतळे आदी प्रतीकांवर खर्च होणारा पैसा वाचवून तो कुपोषित बालकांसाठी किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे सभागार उभारण्यासाठी कामी आणणे आवश्यक आहे. मग, पसा नाही म्हणून कुपोषितांची जबाबदारी टाळता येणार नाही व परिषद भरवताना सभागारासाठी सरकारची दमछाकही होणार नाही.
ऋषभ हिरालाल बलदोटा, पुणे
हे विकासपुरुषाचे लक्षण नव्हे!

‘कुपोषितांचे खंतरंग’ हे संपादकीय (२१ ऑक्टो.) वाचले. आíथक पाहणीच्या अहवालातच हे स्पष्ट झाले होते की, देशात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना त्यासाठीच्या योजनांवर दिली जाणारी सबसिडी सरकार कमी करीत आहे. त्याचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम आणि सरकारचे याकडे होणारे दुर्लक्ष यावर या अग्रलेखात परखडपणे लिहिले आहे. आíथक विकासाच्या नावाखाली कल्याणकारी योजनांना कात्री लावणे कदापि योग्य नाही. केवळ ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा देऊन इथली परिस्थिती सुधारणार नाही. सरकारमध्ये सामान्यांविषयी कळवळा वाटणारे लोक आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो.
उपाययोजना काय करायच्या हे सरकारला, त्यांच्या सल्लागारांना माहीत आहे. देशात विद्वानांची कमतरता नाही. त्यांनी आजवर अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत, कुपोषणाला आळा घालण्यासाठी मांडलेले अहवाल पडून आहेत, पण बधिर राजकारणी याचा गंभीरपणे विचार करीत नाहीत. नुकतेच अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांना तर कुपोषणाचा, दारिद्रय़ाचा अभ्यास करण्यासाठी भारतभूमी जिवंत संदर्भ म्हणून मिळाली. जगात ही परिस्थिती आता ठाऊक होते आहे. परदेशांत जाऊन भाषणाचे फड गाजविणारे पंतप्रधान या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत, हे विकासपुरुषाचे लक्षण नव्हे.
भास्करराव म्हस्के, पुणे

प्रत्युत्तराऐवजी लाचारीच

देशाला विविध समस्यांनी ग्रासले असताना, शत्रुराष्ट्रे आपल्यावर सातत्याने कुरघोडी करीत असताना विविध राजकीय पक्षांचे नेते देशातील समस्या सोडवण्यात व शत्रुराष्ट्रांना प्रत्युत्तर देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. किंबहुना त्यांनी यासाठी केलेले अल्प प्रयत्न हे आपण अनुभवले आहेत. उलट विविध कार्यक्रम आणि अन्य माध्यमांतून पाकिस्तानी कलाकार व नेत्यांना बोलावून आमचे नेते लाचारीचे प्रदर्शन करीत आहेत. गेल्याच महिन्यात, सप्टेंबरमध्ये दिल्ली येथे झालेले ‘शान-ए-पाकिस्तान’ प्रदर्शन व नुकताच मुंबईला सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकच्या खुर्शिद कसुरींसोबत केलेला पुस्तक प्रकाशन सोहळा ही नजीकची दुर्दैवी उदाहरणे होत. हे दोन्ही कार्यक्रम होऊ देऊन राज्य व केंद्रातील भाजप शासन प्रतिदिन देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या सनिकांची काय किंमत ठेवते हे लक्षात आले.
प्रथमेश कुडव, मुंबई

राज्य शासनाला अधिकार नाही, हे म्हणणे चुकीचे

‘हा नवा प्रादेशिकवाद न्यायालयात टिकेल का?’ या शीर्षकाखालील पत्र (लोकमानस, २० ऑक्टो.) वाचले. ‘सर्व सुरळीत सुरू असताना (सरकारला) ही बुद्धी कशी सुचली,’ असा आक्षेप पत्रलेखकाने घेतला आहे. त्याचे स्पष्टीकरण- राज्याच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये वाटा मिळाला पाहिजे, हे सूत्र स्वीकारले गेले; परंतु आजपर्यंत मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांचे प्राबल्य असल्याने त्यांनी या तरतुदीकडे साफ दुर्लक्ष केले. याच पत्रात असा युक्तिवाद मांडला आहे की, अनुच्छेद ३७१ नुसार राज्य शासनाला अधिकार नाही. हे म्हणणे चुकीचे आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३७१(२)(उ) मध्ये स्पष्ट आहे की, राज्यपाल तांत्रिक शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण ‘तसेच राज्याच्या नियंत्रणाखालील सेवेत’ पुरेशा संधी उपलब्ध करून देऊ शकतात. विदर्भाची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार २१.३ टक्के व मराठवाडय़ाची १६.६ टक्के आहे; परंतु तेवढय़ा प्रमाणात त्यांची सरकारी नोकऱ्यांत भरती नाही. सुमारे ७० टक्के जागा उर्वरित महाराष्ट्राने गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे प्रादेशिक समतोल प्रस्थापित करण्यासाठी शासन निर्णय योग्य आहे, फक्त त्याची अंमलबजावणी व्हावयास हवी.
– समाधान आश्रोबा किरवले,
सिरसाळा (ता. परळी, जि. बीड)

अपेक्षाभंगाची नांदी..
सध्या देशात चालू असणाऱ्या घटना केंद्र सरकारमधील मजबूत ‘बाहुबली’मताचे ओंगळवाणे प्रदर्शन करणाऱ्या आहेत. दादरी प्रकरण असो, राज्यातील सत्तामित्रांच्या अनादराच्या घटना व ‘आपलेच म्हणणे खरे’ करून दाखविण्यासाठी कमावले जाणारे राज्यसभा सदस्यबळ व त्यापायी पंतप्रधानांनी हरएक विधानसभा निवडणुकीसाठी आपले बळ खर्च करणे, ही एका प्रकारे देशाच्या लाखो-कोटय़वधी लोकांच्या अपेक्षाभंगाची नांदीच होय. अवघ्या वर्षांनंतर या सरकारचा ‘विकासी’ मुखवटा गळून त्या जागी संविधानाच्या सेक्युलरपणाला छेद देणाऱ्या घटना घडत आहेत. अशा वेळी ‘आपण सरकार म्हणून धर्मनिरपेक्ष आहोत,’ या आरोळीला कितपत खरे मानावे? मुळात सत्तामदाचे हे रूप ससा-कासवाच्या गोष्टीतल्या चपळ सशाच्या गर्वाचे द्योतक. मात्र विद्यमान सरकारने ‘गर्वाचे घर खाली’ हेदेखील ध्यानात ठेवलेले बरे.
– सौरभ ग. कुंभारे, सांगली

छागलांनीही हेच केले होते..

$
0
0

न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी नेमलेला आयोग अवैध ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात नानी पालखीवाला यांनी त्यांच्या ‘वुइ द पीपल’ या पुस्तकात, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. मोहम्मद करीम छागला यांच्या १९५० मधील पत्राचा उल्लेख केला आहे. तो उतारा असा :

Chagla’s correspondence with Moraraji Desai in 1950 deserves to live in history as the high-water mark of sturdy judicial independence. Refusing to be docile and tractable Chief Justice, and resenting the executive’s attempt to make him toe the government line, Chagla wrote to the then Chief Minister, “I Love my country with the same intensity and fervor as anyone else. And I am seeing tendencies which if not checked will lead us to unbridled dictatorship. You and I don’t count. Our vanity, our amour-propure, our sensitiveness, are nothing compared to the future destiny of our people. In Heaven’s name let us not do anything which may deflect that destiny into channels unworthy of great nation.
असे स्वतंत्र निरपेक्ष बुद्धीने करणारे न्यायाधीश होते आणि आहेत म्हणून आपल्या देशातील लोकशाही टिकून आहे. नानी पालखीवाला यांनी उद्धृत केलेले पत्र छागला यांच्या ‘रोझेस इन डिसेंबर’ या आत्मवृत्तातही नमूद आहे.
– अशोक वासुदेव बक्षी, सातारा

या विषयांना अवाजवी महत्त्व
देऊन कोण काय साधते आहे?

विकासाचा मुद्दा हाती घेऊन मोदी सरकार सत्तेवर आले त्याला आता दीड वर्ष होते आहे. सत्तेवर आल्यापासून सुरुवातीला धीम्या गतीने पण आता जवळ जवळ रोज एका नव्या विषयाला जन्म घालणे , त्यावर चित्रवाणीच्या सर्व िहदी, मराठी चानेल्स वरून तासन तास कर्कश चर्चा करणे, वृत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने लिहावे लागणे हे नित्य होते आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या समाजमाध्यमांवर तर या विषयांचा निव्वळ हैदोस चालू आहे. त्या धर्मातून या धर्मात घरवापसी, िहदू स्त्रियांनी किती मुलांना जन्म द्यावा, लव्हजिहाद, आरक्षण असावे की नसावे, राष्ट्रगीत कोणते असावे, राष्ट्रग्रंथ म्हणून भगवद्गीता की आणखी कोणता ग्रंथ, कुंभमेळ्यासाठी पाणी, पाकिस्तान आणि क्रिकेट, गोमांसबंदी इत्यादी.
या एकेका विषयाच्या चच्रेमध्ये बुद्धिजीवी, लेखक मंडळी, सामाजिक कार्यकत्रे आणि सामान्य माणसेही प्रचंड गुंतून पडली आहेत. या विषयांचे प्रमाण अलीकडच्या काळात प्रचंड वाढले आहे. हेच विषय जीवनमरणाचे आहेत असे अनेकांना वाटू लागले.
एका वेगळ्या अर्थाने हे विषय जीवनमरणाचे झाले आहेत. यातल्या गोमांस बंदीच्या विषयाच्या निमित्ताने सत्ताधारी पक्ष आणि त्याच्या आसपास वावरणारया लोकांचा भेसूर चेहरा समोर आला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आलेली आहे. िहसेच्या उघड समर्थनाची कोणतीही लाज वाटेनाशी झाली आहे. प्रत्येक मतभिन्नतेमुळे कोण कधी आणि कसे मारले जाईल असे भयद्रूप वातावरण तयार झाले आहे. तशी उदाहरणेही अलीकडे घालून दिलेली आहेत. त्याचीच परिणती म्हणून लेखक निषेध म्हणून पुरस्कार परत करू लागले आहेत. त्यांचीही चेष्टा / टिंगल चालू आहे. राष्ट्रीय आणि प्रांतीय पातळीवरचे राज्यकत्रे म्हणू लागले की, श्री. अखलाक हे आमच्या पक्षाच्या राज्यात मेले नाहीत, आमचा काय संबंध? किंवा ‘त्यांना मारले हे चांगलेच झाले. धर्माला धरून झाले सगळे !’ हे एकूण भयावह आहे.
देशाच्या एकूण विकासामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विकास येत नाही का? आधीच्या राज्यकर्त्यांना विकास करता आला नाही, तर आताच्या राज्यकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विकास अधिक नको का करायला?
शिक्षण आणि आरोग्य यांबद्दलचा सरकारी खर्च कमी करून विकास कोणता आणि कसा होणार आहे? त्यातही शिक्षण म्हणजे मुलांना अशास्त्रीय आणि धार्मिक धडे देणे, आणि सामाजिक द्वेष शिकवणे म्हणजे विकास आहे का? कुपोषणासारख्या शरमेच्या प्रश्नावर खर्च कमी करून विकास कसा होणार आहे?
लोकांच्या जमिनी घेऊन त्यांचे प्रचंड प्रमाणात विस्थापन करणे आणि पाणी, माती, हवा यांचे प्रदूषण करणे म्हणजे विकास आहे का? येन केन प्रकारे जी डी पी वाढवणे म्हणजे खरा विकास ? महागाई वाढवणे विकासात कसे बसते? सफाईचे दिखाऊदेखणे कार्यक्रम करणे आणि त्याच्या जाहिराती करणे याला विकास कसे म्हणावे? मनांच्या सफाईचे काय ? की ते विकासात बसत नाही? परकीय भांडवलदारांची मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक बोलावणे म्हणजे विकास आहे का? चकचकीत मॉल्स, फ्लायओव्हर, मेट्रोरेल्वे, स्मार्ट सिटी , अत्याधुनिक विमानतळे म्हणजे विकास?
या प्रश्नांवर जितक्या खोलवर चर्चा व्हायला हव्या आहेत तेवढ्या होत नाहीयेत. होत असतील तर त्या सामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीयेत.
आपल्या खात्यातून पसे काढून बँकेच्या बाहेर आल्यावर लबाड माणसे ‘दादा, तुमच्या अंगावर घाण पडली, घाण पडली’ असे म्हणत पसे लंपास करतात तसे काहीसे आपले होते आहे (असे अर्थात आधीचे सरकारही करत असायचेच. पण ‘घाण पडली, घाण पडली’ चा घोष मात्र आज वाढला आहे. आपले सगळे लक्ष तिकडेच गेले आहे.) आता मूलभूत प्रश्न विचारायची वेळ आली आहे,
‘तू इधर उधर की बात मत कर !
बोलो, काफिला लूटा कैसे ?’
– डॉ. मोहन देशपांडे , पुणे

फरीदाबादच्या घटनेवर गप्प का ?

तुर्कस्तानच्या किनारी तीन वर्षीय अयलान कुíच या चिमुकल्याच्या निपचित पडलेल्या मृतदेहाचा फोटो जगासमोर आला आणि माणुसकी वाहून गेल्याचं उघड झालं, भारतातीयांच्याही भावना अनावर झाल्या होत्या.. मग देशातच फरीदाबाद जळितकांडात दिव्या (९ महिने ) आणि वैभव (३ वर्ष ) हे दोन चिमुकले जातिभेदवादय़ांनी घेतलेल्या सुडात जळून खाक झाले. अयलानच्या मृत्यूने हळहळणारे आता गप्प कसे? आता त्यांच्या भावना मेल्या आहेत का?
– संदीप संसारे, ठाणे
वैचारिक साहस करण्याची गरज

गिरीश कुबेर यांचा ‘विज्ञानवादाचा विदिता व्याघात..’ हा लेख (अन्यथा, १७ ऑक्टो.) वाचला. सर्वप्रथम शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, नोबेल पुरस्कार व बुकर विजेत्यांना ठळकपणे प्रसिद्धी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन. तसेच विदिता वैद्य यांचा ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रम ही कल्पना अतिशय ग्रेट; परंतु मुंबईतील इतरही भटनागर पुरस्कार विजेत्यांना त्यात सहभागी केले असते तर अजून छान झाले असते असे वाटते.
भारतीय विज्ञान क्षेत्रातील सामाजिक मागासलेपणाचे मूळ हे प्रामुख्याने राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आहे. तुलनाच करायची झाल्यास- रिचर्ड फाइनमन, कार्ल सेगनसारख्या विज्ञानवेडय़ा शास्त्रज्ञांच्या कार्यापायी व सोव्हिएत रशियाच्या अंतराळ कार्यक्रमावर कुरघोडी करायची या जॉन केनेडी यांच्या ‘अपोलो मिशन’च्या हट्टापायी प्रचंड मोठी अमेरिकन शिक्षणक्रांती चालू झाली. तसेच २० व्या शतकाच्या सुरुवातीला युद्धखोरीसाठी का होईना, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड मोठी गुंतवणूक केली गेली. बिल िक्लटन यांनी विख्यात जीवशास्त्रज्ञ क्रेग व्हेटर यांना ‘वुमन जिनोम प्रोजेक्ट’साठी निधी उपलब्ध करून दिला. (परंतु, पुराणमतवादी बुश यांनी ‘स्टेम सेल्स’ संशोधन बंद पाडले!) ओबामांनी ब्रेन रिसर्चसाठी १० कोटी डॉलर उपलब्ध करून दिले. कावली, गेट्स, केनेथ ग्रिफिन वगरे अब्जाधीशांनी अक्षरश: कोटय़वधी रुपये विद्यापीठे, संस्था यांच्या संशोधनांत ओतला. इतका की, हार्वर्डसारख्या विद्यापीठांत निधी पडून आहे. त्यात गुगल, टेस्ला वगरे कंपन्यांचे स्वत:चे संशोधन चालू आहेच. नील टायसन, बिल नाय, ब्रायन कॉक्स, ब्रायन ग्रीन, रिचर्ड डॉकिन्स वगरे शास्त्रज्ञ नित्यनेमाने पुराणमतवाद्यांना िशगावर घेत आहेत. आधुनिक फूटपट्टीत मोजायचे तर या सर्वाना काही कोटी ट्विटर पाठीराखे आहेत, हे नवलच.
आपल्याकडे नेहरूंनी जेआरडी टाटा वगरेंच्या मदतीने एकाहून एक सरस शास्त्रज्ञांची मांदियाळी जमवली. त्यांना परिपूर्ण स्वातंत्र्य दिले. हरितक्रांती, अणुशक्ती, इस्रो वगरेंच्या रूपात आपण त्याची फळे चाखत आहोत.. परंतु आजची शिक्षणव्यवस्था पूर्णपणे सडलेली तर आहेच; पण थातुरमातुर सुधारणा, निधीची कमतरता, प्रवेशपरीक्षा घोटाळे, कुलगुरूंचे घोटाळे, निकृष्ट दर्जाचे शिक्षण व संशोधन, काही मूठभर उच्च संस्थांपुरता मर्यादित फोकस, राजकीय ढवळाढवळ, पुराणमतवादी लोकांचा वाढणारा जोर वगरेंत उरलेसुरले सर्व वाहून जाते आहे. आजही देश-विदेशांतील संधींवर लाथ मारून आलेले कैक शास्त्रज्ञ इथे आहेतच. डॉ. नारळीकर, डॉ. कलाम यांच्यासारखे हिरिरीने विज्ञानप्रसार करणारे काही सन्माननीय अपवाद वगळता मूठभर चमकोगिरी करणारे व राजकीय ऊठबस करणारे, धर्म-विज्ञान यांची नतद्रष्ट मोट बांधणारे प्रशासक-शास्त्रज्ञ भाव खाऊन जातात. त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया तर मुळीच विज्ञानाला भाव देत नाही. एखाद्या भ्रष्ट राजकारण्यालाही बोलावून चर्चेचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या वाहिन्या विज्ञानावर गंभीर चर्चा करायला अर्धा ताससुद्धा देत नाहीत. भरीस भर म्हणजे सनातनी धर्मश्रेष्ठता व पुराणमतवाद हा आधुनिक भारताच्या विकासाचा फंडा असल्याप्रमाणे मूळ राजकीय व सामाजिक प्रवाहांत नुसता अर्धवटरावांचा अक्षरश: धुमाकूळ चालला आहे. कुणाला ना खेद ना खंत. कसे रुजणार विज्ञान? आपली वैचारिक विश्वे जर टिनपाट सीरियल्स, ब्रेकिंग न्यूज, राजकीय कलगीतुरा व धार्मिक उलटय़ा काढायला राखून ठेवली, तर विज्ञान रुजणे केवळ अशक्यच आहे. जगातील विज्ञानाची वेगवान वाटचाल पाहता पुढील २०-३० वर्षांची शैक्षणिक ब्लू-िपट्र जेव्हा तयार असेल व पुराणमतवाद्यांना झुगारून ती कठोरपणे राबवायची राजकीय धमक असेल तर विज्ञानच नव्हे, तर कला, साहित्य यात ‘नवयुगा’ची सुरुवात होईल. नाही तर महासत्ता तर दूरची गोष्ट, भारताला साध्या साध्या ज्ञान-तंत्रज्ञानासाठी चीन, अमेरिका वगरे आधुनिक राष्ट्रांसमोर करवंटी घेऊन भीक मागावी लागेल, हेच कठोर सत्य आहे. जगातील सगळे काय ग्रेट ते आम्ही आधीच शोधलेय आणि सगळ्या राजकीय-सामाजिक समस्यांवर सनातनी धर्माचा प्रसार हाच काय तो रामबाण उपाय, हा दुर्दैवी अट्टहास देशाला रसातळाला नेणारा आहे, यात तिळमात्रही शंका नाही. आधुनिक विज्ञान आपल्या उंबरठय़ावर दार ठोठावत उभे असताना कूपमंडूक वृत्ती सोडून वैचारिक साहस करण्याची गरज आज आहे, हे समाजाला केव्हा कळणार?
– नीलेश तेंडुलकर, नाचणे (रत्नागिरी)

शेतकऱ्यांना बसणाऱ्या फटक्याकडे कोणाचेही लक्ष नाही!

शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी डाळींची खरेदी करण्याचा हंगाम नुकताच सुरू झाला असताना डाळी व खाद्यतेल साठय़ांवर मंत्रिमंडळाने र्निबध घातले. यामुळे कडधान्ये व तेलबियांचे दर कमी होऊन शेतकऱ्याला फटका बसेल. अर्थात, शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे कोणाचेही लक्ष नसते..
उदाहरणार्थ, नागपूरच्या घाऊक बाजारात १५ ऑक्टो. रोजी सोयाबीनचा दर होता ४००० रु. प्रति क्विंटल. हाच दर १९ ऑक्टोबरला ३७२५ रु. प्रति क्विंटल झाला. म्हणजे दोनच दिवसांत ७% घट. एवढेच नुकसान मुंबई शेअर बाजारात झाले असते, तर ७% म्हणजे १९०० अंकाने बाजार कोसळला म्हणून माध्यमे व सरकार खडबडून जागे झाले असते.
किंवा यंदा तुरीचा हमीदर आहे ४४२५ रु. प्रति क्विंटल. केंद्रीय कृषी मूल्य आयोगानुसार महाराष्ट्रात तुरीचा उत्पादन खर्च आहे क्विंटलला ५००० रु. हा खर्च पाऊस व्यवस्थित आला असता तर, अशा प्रकारे मोजला आहे. प्रत्यक्षात यंदा पाऊस नीट झाला नाही. त्यामुळे तूर उत्पादन खर्च दहा हजार रु. प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तो मागील वर्षीही दुष्काळामुळेच दुपटीने वाढला होता. मग, तुरीच्या उत्पादन खर्चाइतकेही हमीदर न देणाऱ्या शासनाविरुद्ध कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदवायचा?
– मिलिंद दामले , यवतमाळ.

नवे संशोधक घडवण्याच्या कामात मराठी विज्ञान परिषदेचे योगदान

विज्ञानवादाचा ‘विदिता’ व्याघात हा लेख (१७ ऑक्टो.) वाचला. त्यात डॉ.विदिता वैद्य यांनी असे विधान केले आहे की,‘पुण्या-मुंबईतील मुलांना अमेरिकेत जाण्यात रस असतो. ते भारतातील विज्ञान संशोधनात रस घेत नाहीत. पण ग्रामीण भागातील मुलांना भारतातील विज्ञान संशोधनात रस असतो.’
याबाबत मराठी विज्ञान परिषदेने गेल्या ३० वर्षांत खूप प्रयत्न केले. परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.भा.मा.उदगावकर यांच्या प्रेरणेने १९८४ मुंबईत दहावी-बारावीत उत्तम गुण मिळवलेल्या मुला-मुलींना आणि त्यांच्या पालकांना बोलावले होते. त्यांच्यापुढे तत्कालीन अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष राजा रामण्णा, टीआयएफआरचे संचालक प्रा. श्रीकांतन, शास्त्रज्ञ प्रा.ओबेद सिद्दिकी, आयआयटीचे संचालक प्रा. सुहास सुखात्मे, डॉ.जयंत नारळीकर व स्वत: प्रा.उदगावकर यांनी भाषणे करून आपापल्या विषयातील संशोधन म्हणजे काय हे समजावून सांगितले. नंतर विद्यार्थी/पालकांना प्रश्नोत्तरेही झाली. पुढे असेच कार्यक्रम विभिन्न ठिकाणी केले गेले.नंतर मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधील पीएचडीच्या विद्यार्थ्यांनाही यात सहभागी करून घेतले. त्यांनीही राज्यभर भाषणे देऊन, विज्ञान संशोधनात काम करावे असे आवाहन मुलांना केले. याचा परिणामही दिसून आला. इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे तेव्हाचे संचालक प्रा. जे. बी. जोशी यांनी सांगितले होते की, तेव्हा संस्थेकडे पीएचडीसाठी २५० अर्ज येत व त्यातील १०० मुलांना प्रवेश देत असू. पण २००६ नंतर आमच्याकडे हजाराहून अधिक येऊ लागले व आम्ही २५० मुलांना प्रवेश देऊ लागलो. ही मुले बव्हंशी ग्रामीण भागातील असतात. हा प्रतिसाद एका संस्थेतील आहे. मराठी विज्ञान परिषदेने केलेल्या कामाचा हा परिणाम आहे. नंतर डॉ.रघुनाथ माशेलकर यांनीही आपल्या सर्व फेलोजना आपापल्या विभागात भाषणे द्यायला सांगून मुलांना विज्ञान संशोधनाकडे प्रवृत्त व्हायला सांगितले. एका प्रादेशिक संस्थेचा अनुभव राष्ट्रीय स्तरावर वापरला गेला.
– अ. पां. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, मुंबई

मानवी कल्याण, मूल्ये केंद्रस्थानी मानून ईश्वरचिकित्सा

‘मानव विजय’ या लेखमालेतील ‘ईश्वर चिकित्सा व सत्यशोध’ हा लेख (१९ ऑक्टो.) मानवासमोरील एका मूलभूत प्रश्नाबद्दल गंभीर चिंतन प्रकट करणारा आहे. जे लोक चिकित्सा करतात तेच लोक सत्याचा शोध घेऊ शकतात. जे सत्याला भिडतात तेच सर्वागीण प्रगती करू शकतात. जे आंधळेपणाने विविध कल्पित घटकांवर श्रद्धा ठेवतात ते अधांतरी राहतात. शरद बेडेकर यंची ईश्वरचिकित्सेची भूमिका ईश्वरनिष्ठांना खिजवणारी नाही तर मानवी प्रगतीची चिंता वाहणारी आहे असे वाटते.
ईश्वर ही वस्तुस्थिती नसून मानवाने निर्मिलेली ती एक संस्कृतिक संकल्पना आहे. या संकल्पनेचा आधार घेऊन काही लोक सेवाभावी स्वरूपाचे काम निश्चितच करतात. त्यांची कल्पना रंजल्यागांजलेल्यांमध्ये ईश्वर पाहण्याची असते. ती काही प्रमाणात कल्याणकारी व मूल्यनिष्ठ स्वरुपाची असते.
जगातील ऐतखाऊ, शोषक व विषमतावादी लोकांनी स्वतचा स्वार्थ साधण्यासाठी आजवर ईश्वर कल्पनेचा वापर फार मोठय़ा प्रमाणात केलेला आहे व आजही तो होतो आहे. वास्तवात ईश्वर रंजल्यागांजलेल्यांच्या मदतीला कधीही धावून येत नाही. शोषक, श्रीमंत व प्रस्थापित लोकांसाठी मात्र तो नेहमीच पूरक राहिलेला आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी व न्यायी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव कधीच येत नाही. मंदिरांमध्ये भक्तांची सतत लुबाडणूक करणारांना तो कधीच रोखत नाही. (हा माझा अनेक मंदिरातील प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तो पुरेसा प्रातिनिधिक आहे) यावरून तो अस्तित्वात नाही हेच सिद्ध होते. ईश्वर कल्पना ही एक मूलभूत अंधश्रद्धा आहे. ती मानवाची बौद्धिक प्रगती थांबवते. शोषकांना आश्रय देते, दांभिकांच्या दुष्कर्मावर पांघरुण घालते. काळा पसा बाळगणाऱ्यांना प्रतिष्ठा देते म्हणून मानवी कल्याणाच्या, मूल्यांच्या व प्रगतीच्या भूमिकेतून ईश्वर चिकित्सा केलीच पाहिजे. बेडेकरांनी ती केली आहे.
– डॉ. अनंत राऊत, (पीपल्स कॅलेज) नांदेड

इतिहासकारांनी सत्यनिष्ठ असावे!

‘इतिहासाची साक्ष जाणावी’(३० सप्टेंबर) या देवेंद्र इंगळे यांच्या लेखावरील ‘छद्मइतिहास लेखनाचे वास्तव’ ही प्रतिक्रिया (९ ऑक्टोबर) वाचली. मुख्यत: इंगळे यांचा लेख ‘प्रवृत्ती’विषयी आहे. त्यामुळे लेखात कोणाची नावे घेतली नाहीत हे योग्यच वाटते आणि छद्मइतिहासकारांची नावे घेतली असती तर कदाचित लेखाची इष्टमर्यादा ओलांडावी लागली असती आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला असता. इंगळे यांनी कोणत्याही द्वंद्वात्मक वादात अडकून न पडता ‘शास्त्रीय इतिहासाची’ बाजू मांडण्याचा प्रभावी प्रयत्न केलेला आहे. इंगळे यांनी इतिहास लेखनाचा अधिकार फक्त इतिहासाच्या प्राध्यापक मंडळींनाच असतो असे कुठेही सूचित केलेले नाही. उलट इतिहास लेखकांनी इतिहासाची पद्धती- शास्त्रीय शिस्त – पाळली जावी एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्वेषण प्रक्रियेत इतिहासकारांच्या मतमतांतरांना वाव असतो हे एकदा मान्य केल्यानंतर आणि विविध दृष्टिकोनांचे स्वातंत्र्य मान्य केल्यानंतरही, इतिहासाच्या वस्तुनिष्ठतेचा मुद्दा शिल्लक राहतोच. ‘साधनांची व प्रमाणसिद्ध तथ्यांची मोडतोड करण्याचे स्वातंत्र्य जर कोणी घेणार असेल तर, तो इतिहास आणि इतिहासकार छद्मइतिहासाच्या वर्गवारीत मोडतो’ एवढेच मूळ लेखातून म्हणायचे होते असे वाटते. चिरडेंनी इंगळेंच्या कोणत्याही मुद्दय़ांना साधा स्पर्शही न करता केवळ आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
आरोप करणे म्हणजेच कदाचित प्रतिवादासाठी पत्रलेखकाकडे मुद्दाच नाही, याची जाहीररीत्या त्यांनी कबुलीच दिली आहे. इतिहासकारांची नावे न देण्याचा संबंध पत्रलेखकाने, मूळ लेखकाच्या ‘धाडसा’शी जोडला आहे. मुळात इंगळे यांनी आपल्या लेखात ‘प्रवृत्ती’वर आघात करून धाडस दाखविले आहेच. संपूर्ण लेखात इंगळेंनी वस्तुनिष्ठतेविषयी कुठेही शब्ददेखील लिहिलेला नाही. अंगभूतपणे इतिहास व्यक्तिनिष्ठच असतो पण तो ‘व्यक्तिनिष्ठ असतो म्हणून तथ्यांच्या पातळीवर असत्य’ असणे समर्थनीय ठरत नाही, असे मूळ लेखातून सुचवायचे आहे, हे लक्षात येते.
इतिहास विषय घेऊन प्राध्यापक न झालेल्या लेखकांच्या प्रवृत्तीवर शंका घेण्याचा मुद्दाच नाही, मुद्दा छद्मइतिहास लेखकांचा आहे. मग तो प्राध्यापक असो अथवा नसो. अनेक मोठे इतिहासकार असे आहेत जे इतिहासाच्या प्राध्यापकी क्षेत्रात नव्हते आणि इतिहासाची प्राध्यापकी करूनही छद्मइतिहासाची मांडणी करणारेही भरपूर लेखक आहेत. अस्मिता कोणतीही असो अस्मिताकेंद्री लेखन छद्मइतिहासाचीच वाट चोखाळणारे असते. इतिहासाच्या गंभीर ज्ञानव्यवहाराशी कुणाचा संबंध आहे, कुणाचा नाही याविषयी तपशील सांगणे हा हेतू इंगळे यांचा दिसत नाही आणि तो अधिकार कोणीही हाती घेण्याचा प्रयत्नही करूनये हेच इष्ट, असे मला वाटते.
कुणाला पात्र-अपात्र ठरविण्याचा मुद्दा नसून आपआपलेच निकष लादण्याचा मुद्दा आहे. इतिहासलेखन करणाऱ्यांनी आणि इतिहासाच्या ज्ञानव्यवहारांच्या संबंधित असणाऱ्यांनी पदव्या दाखवाव्यात असा आग्रह कुठेही केलेला नसताना तसा आरोप पत्रलेखक का करत आहेत, हे कळत नाही. सत्याप्रति निष्ठा दाखवून इतिहासाचे विकृतीकरण करू नये, इतिहासकारांनी सत्यनिष्ठ असावे एवढीच अपेक्षा!
– प्रा. दिनकर रा. मुरकुटे, पुणे

डाळ जप्त केली; बाजारात कधी?

$
0
0

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केवळ १२ टक्क्यांनी तुरीचे उत्पादन कमी झालेले असताना डाळीचे भाव १०० टक्के कसे वाढले? या प्रश्नाचे उत्तर ‘साठेबाजीमुळे’ असे देण्यास ना कोण्या ज्योतिषाची गरज आहे, ना अर्थशास्त्राचा विशेष अभ्यास असण्याची; परंतु ‘साठेबाजी’ची व्याख्याच केलेली नसल्याने व्यापाऱ्यांनी मनसोक्त साठा केला, खूप पसे कमवून घेतले व नंतर शासनाने विशेष अध्यादेश काढून साठेबाजीची व्याख्या जाहीर केली. नंतर लगेचच धडाधड छापे टाकून ठिकठिकाणी तुरीची डाळ जप्त केली. आपण जेवढी डाळ आयात करणार होतो त्याच्या दहा पटीहून अधिक डाळ जप्त केल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या.
आता भरपूर तुरीची डाळ बाजारात येईल व स्वस्त होईल, अशा भाबडय़ा समजुतीने सामान्य मध्यमवर्गीय व गरीब जनता खूश झाली. तेव्हा, आता ही जप्त केलेली तूरडाळ बाजारात केव्हा येते याकडे जनता डोळे लावून बसली आहे. कायदेशीर अडचणींचे सव्यापसव्य करता करता जप्त केलेली महाप्रचंड तूरडाळ गोदामातच सडून न जावो, अशी जनतेची अपेक्षा आहे. शासनाने याबाबतचे धोरण जाहीर करावे.
– प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक
उशिराचे शहाणपण..

‘सरकारची डाळ शिजेना..’ हा ‘अन्वयार्थ’ (२२ ऑक्टोबर) वाचला. तसेच प्रशांत कुलकर्णी यांनी ‘काय चाललंय काय’खाली काढलेलं ‘साठेबाज हातावर ‘तुरी’ देऊन पळाले’ हे व्यंगचित्र त्याला अगदी पूरक आहे.
मुळात उद्योगधंदे, व्यापारी, बिल्डर, रस्ते-पूल बांधणारे कंत्राटदार यांच्या बाबतीत त्या त्या लोकांचं उखळ पांढरं होऊ देण्यात आपले आíथक हितसंबंध जपण्याची परंपरा मोडून काढली, तर जनतेला आपण सरकार बदलल्याचं सार्थक झालं असं वाटेल, हे भाजपनं कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं वाटतं.
पावसामुळे सर्वच प्रकारच्या डाळींचं उत्पादन सर्वच ठिकाणी कमी झालेलं आहे हे उघड दिसत असताना, साठेबाजीचा प्रयत्न होणार हे सरकारला वेळीच लक्षात आलं नाही का आणि आलं असेल तरी ‘मूग गिळून गप्प’ बसण्यात कोणाला फायदा आहे, असे प्रश्न पडतात. साठेबाजीमुळे वाढलेल्या दरात माल घेण्यास किरकोळ विक्रेतेही अनुत्सुक होतात आणि नागरिकही ते पदार्थ नित्याच्या आहारात वापरण्याचं कमी करतात; पण हे किती दिवस चालणार अन् याच मानसिकतेचा फायदा काही जण घेतात, ही खेदजनक बाब आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याची सरकारची मनोवृत्ती’ बदलणं आवश्यक आहे. स्मार्ट शहरं बनवण्याच्या खटाटोपात जीवनावश्यक अन्नपदार्थ सर्वसामान्यांच्या आमदनीच्या आवाक्याबाहेर जाणे याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. त्यासाठी पिकं घेतली जातात तेव्हापासूनच, त्यांच्या उत्पादनाची आकडेवारी जमवणं आणि ठिकठिकाणी योग्य वेळी योग्य भावात वितरण होण्याची जबाबदारी निश्चित करणं, उत्पादकांना खेडी-शहरं इथपर्यंत माल वाहतुकीची सोय रास्त दरांत करून देणं, किरकोळ विक्रेत्यांकडे तसेच रास्त भाव दुकानांतही सर्वसामान्यांना परवडतील अशा भावात धान्य-डाळी उपलब्ध होत आहेत ना हे पाहणं यासाठीचं व्यवस्थापन हातात घेतलं गेलं पाहिजे.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

चटका लावणारी निवृत्ती

काही दिवसांपूर्वी झहीर खान निवृत्त झाला. पाठोपाठ ‘वीरू’ने निवृत्ती जाहीर केली आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. राहून राहून वाटते, जशी सचिनला मानाने निवृत्ती मिळाली तशी ‘वीरू’लासुद्धा मिळाली असती तर किती बरं वाटलं असतं, कारण त्या मानाचा तो हक्कदार आहे. आऊट झालो तरी किंवा कितीही काहीही झालं ‘तरी मी माझा आक्रमक खेळ सोडणार नाही’ या त्याच्या वृत्तीने त्याने आपला एक चाहता वर्ग तयार केला होता. शिवाय असं भाग्य सर्वानाच लाभत नाही, जसं सचिन आऊट झाल्याबरोबर त्याचे चाहते दूरदर्शन संच बंद करून आपल्या दुसऱ्या कामाला लागायचे. सामना फििक्सग प्रकरण किंवा प्रसिद्धीने डोक्यात हवा जाणे अशा गोष्टींपासून तो चार हात दूरच असायचा. त्याचं खेळणं जरी आक्रमक असलं तरी खिलाडूवृत्तीला कधी त्याने धक्का लागू दिला नाही. म्हणूनच तो चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बनला होता. म्हणून त्याची उणीव भरून काढणे टीम इंडियाला शक्य नाही. ‘वीरू’सारखा खेळाडू होणे नाही.
– रवींद्र गुरव, विरार

दसरा मेळाव्याचे फलित

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर काल पार पडला. शिवसेना केंद्रात आणि राज्यातही भाजपबरोबर सत्तेत आहे; परंतु शिवसेनेला एका गोष्टीची खंत नेहमीच वाटत आलेली आहे, ती म्हणजे भाजपने सत्तेवर येताच आपले पूर्वी वेळोवेळी जाहीर केलेले परराष्ट्रीय आणि पाकिस्तानबद्दलचे धोरण आता पूर्णपणे बदललेले आहे. तसेच िहदू-मुस्लीम विषयात भाजप आता काय आणि कशी भूमिका घेतो हेदेखील त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. त्यातल्या त्यात भारत हे िहदू राष्ट्र म्हणून जाहीर करणे आणि समान नागरी कायदा अमलात आणणे आणि घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करणे या प्रमुख भूमिकांवर आता त्यांनी सपशेल यू टर्न घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांबद्दलची भाजपची भूमिकाही पूर्वीपेक्षा अचंबित करणारी ठरत आहे. पूर्वी उद्धवनी टीका केली की, वर्तमानपत्रातील टीकेला आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही, अशी भूमिका जाहीर करून भाजप नेते अनुल्लेखाने मारायचे ठरविले होते. आता पक्षप्रमुखांची भूमिका तर जगजाहीर झाली आहे. आता यासाठी भाजपकडे काय उत्तर असणार? भाजपला आपल्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून देणे हे या वर्षीच्या दसरा मेळाव्याचे फलित आहे. राजकीय फायदे-तोटे होत राहतील तरीही महाराष्ट्रात राजकीय अस्थर्य आणून राज्याचे नुकसान आम्ही करू इच्छित नाही, हादेखील संदेश त्यातून मिळाला आहे.
– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)
सकारात्मक उन्माद का नाही वाढत?

मोदी सरकार आल्यापासून धार्मिक उन्माद, विशेषत: िहदुत्ववाद्यांचा उन्माद खूप वाढत आहे. पूर्वी समाजमाध्यमांमधून कुणी धार्मिक अथवा सामाजिक सुधारणेबाबत बोलले, तर त्याला धर्मद्रोही, देशद्रोही म्हणण्यापासून त्याला पाकिस्तानचा हस्तक ठरवण्यापर्यंत कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया दिली जायची. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ‘चालते व्हा’चा नारा सुरू झाला. तुम्हाला आमचे म्हणणे ऐकायचे नसेल, तर पाकिस्तानला जा, अशा स्वरूपाची दमबाजी सुरू झाली. गणेशोत्सवाच्या काळात ‘ज्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो त्यांनी पाकिस्तानला जावे’ अशा पोस्ट फिरत होत्या. अलीकडे अमक्या रस्त्यावरून गाईंनी भरलेला ट्रक निघाला आहे. त्या भागातील लोकांना सतर्क करण्यासाठी हा मेसेज पुढे पाठवा, अशा पोस्ट फिरत आहेत. आता तर उघडपणे माणसे मारणे सुरू झाले आहे आणि त्याचे समर्थनही केले जात आहे. हा सगळा वाढत्या धार्मिक उन्मादाचा परिणाम आहे. खरे तर हा उन्माद मोदी सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान, गॅस अनुदान परत करण्याची मोहीम अशा सकारात्मक बाबतींत दिसायला पाहिजे होता; पण इथे मात्र अंधभक्तांनी आपली भक्ती दाखवली नाही. इथे कोणाचाही द्वेष करायला मिळत नाही, हे तर त्याचे कारण नसावे?
– वाघेश साळुंखे, वेजेगाव, ता. खानापूर (सांगली)

‘दिलवाले’चा शेवट..

$
0
0

‘विशीतले दिलवाले’ हे शनिवारचे संपादकीय (२४ ऑक्टोबर) वाचले. इतक्या वर्षांनंतर त्या चित्रपटाबद्दल विचार करताना असे जाणवले की, जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर फुलणाऱ्या कथानकाचा भारतीय परंपरेत शेवट करताना वेगळीच उंची गाठण्याच्या दोन संधी घेता आल्या असत्या. सिमरनचे वडील भारतीय मूल्यांवर खूप निष्ठा असणारे दाखवले आहेत. त्यांनी तिचे लग्न भारतात वाढलेल्या मुलाशीच हट्टाने ठरवले होते. लंडनमध्ये वाढलेला नायक हा भारतात वाढलेल्या मुलापेक्षा जास्त ‘भारतीय’ आहे हे वेळोवेळी जाणवत गेल्यामुळेच त्यांचा विरोध मावळला, अशा अंगाचा शेवट कथानकाशी जास्त मिळताजुळता ठरला असता. ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’मध्ये केवळ आपली इच्छा मुलांवर न लादणे (प्रेमाची जीत) इतकेच सूचित होते. दुसरे म्हणजे स्वत:चे सुरक्षित बालपण भारतात लाडाकोडात घालवून मग ‘करिअर’करिता परदेशी गेलेली बरीच मंडळी परदेशात जन्मलेल्या आपल्या मुलांना हट्टाने भारतीय बनवू पाहतात. बाहेर पाश्चिमात्य संस्कृतीला साजेसे वागणे आणि घरात पूर्णपणे वेगळे वागणे अशी घुसमट आपणही सिमरनची करत होतो याची जाणीव तिच्या पित्याला झालेली दाखवता आली असती.
ज्या काळावर आणि पाश्र्वभूमीवर कथानक बेतले आहे त्यात या गोष्टी चपखल बसल्या असत्या आणि एका उत्कृष्ट व्यावसायिक चित्रपटाला सखोल कलात्मक चित्रपटाचे परिमाणही सहज देऊन गेल्या असत्या असे वाटले.
-विनिता दीक्षित, ठाणे

धर्मगुरूंशी चर्चा निष्फळ ठरेल
‘‘काळानुसार धर्मातील परंपरांचे पुनíनरीक्षण आवश्यक वाटत असेल तर ते व्हायला हवे. मात्र त्यासाठी धर्मगुरूंशी चर्चा करायला हवी,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी केल्याची बातमी (२४ ऑक्टो.) वाचली. िहदू धर्मात अनेक सुधारणा झाल्या. त्या काळच्या समाजसुधारकांनी समाजजागृती त्या घडवून आणल्या, धर्मगुरूंशी चर्चा करून नव्हे. सती प्रथा बंदी, विधवा केशवपन बंदी, बालविवाह बंदी, संमती वयाचा कायदा अशा सर्व सुधारणांना प्रत्येक वेळी धर्मगुरूंनी आणि सनातनी विचारांच्या धार्मिकांनी विरोधच केला होता. हजारो वष्रे रूढ असलेली चातुर्वण्र्य समाजपद्धती बंद झाली ती आपल्या संविधानातील तत्त्वांमुळे. शंकराचार्य अजूनही चातुर्वण्र्याचे समर्थन करतात. धर्मगुरूंच्या मते धर्मतत्त्वे अपरिवर्तनीय असतात. त्यामुळे सुधारणांसाठी धर्मगुरूंशी चर्चा करणे निष्फळ ठरेल; किंबहुना धर्मगुरूंची संमती घेऊन धर्मसुधारणा करायचे ठरविले, तर कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही.
– प्रा. य. ना. वालावलकर

मोदींनी पदाचे भान ठेवावे
‘केळीचे सुकले बाग’ हा अग्रलेख (२२ ऑक्टो.) वाचला. लोकशाही मार्गाने निवडून यायचे आणि सर्व अधिकार आपल्याकडे ठेवायचे, हा सत्ता राबविण्याचा मोदींचा आवडता फॉम्र्युला आहे. यासाठी त्यांनी सोम्यागोम्यांची हेतूपूर्वक निवड केली आहे. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याकडे जनतेने दुर्लक्ष करावे, असे सांगणारे मोदी अप्रत्यक्षपणे त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यासाठीच दादरी हत्याकांडास तीन आठवडे झाल्यानंतर राष्ट्रपतींचे विधान पुढे करीत त्या घटनेचा थेट निषेध न करता त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदविली होती. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोदींनी आपण एका पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून न वागता या देशाचे पंतप्रधान आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
– श्रीकांत मिठबावकर, कल्याण

मृत्यूची किंमत २६० रुपये!
मागील तीन वर्षांपासून मराठवाडय़ात पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. आतापावेतो विविध कारणांमुळे वडीलधारी मंडळी आत्महत्या करीत होते. मात्र आता दुष्काळामुळेच शाळकरी मुलेही आत्महत्या करू लागली आहेत. लातूर जिल्हय़ातील घटना मन सुन्न करणारी आहे. जढाळा गावातील स्वाती विठ्ठल पिटले या अकरावीतील मुलीने एसटी पासचे २६० रुपये वडिलांकडे नाहीत, तसेच भविष्यात त्यांना आपल्या लग्नाचा त्रास होऊ नये म्हणून आत्महत्या केली.
शासनाने किमान मुलींच्या शिक्षणातील लहान लहान अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. खेडय़ातील गरीब, होतकरू मुली शिक्षणासाठी शहरात दररोज बसने जात असतात. ँपण पाससाठी आईने किंवा वडिलांनी कुणाकडेच हात पसरवू नयेत म्हणून स्वातीने जी आत्महत्या केलीय ती संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारी आहे. अशा घटना घडल्यावर समाजातील काही लोक स्वातीच्या घरी जाऊन पसे देतील, मात्र तिच्या मरणाची किंमत फक्त २६० रुपयेच राहील, हे अच्छे दिन आणणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे.
 संतोष मुसळे, जालना

सामीला नागरिकत्व नकोच
पाकिस्तानी गायक अदनान सामी यास भारताचे नागरिकत्व देण्यात येऊ नये. नागरिकत्व बदलल्याने सामीमध्ये अचानक भारताबद्दल प्रेम, आदर निर्माण होणार आहे का? शेवटी पाकिस्तानी ते पाकिस्तानीच. त्यांचे वाकडे शेपूट कधीच सरळ होणार नाही. फक्तस्वत:ची आíथक प्रगती, नावाचा गाजावाजा होण्यासाठी पाकिस्तानी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अदनान सामी याला भारताचे नागरिकत्व देऊन देशाचे काय कल्याण होणार आहे? अनेक इस्लामी राष्ट्रे असताना याचे येथेच काय अडले आहे?
जयेश राणे, भांडुप (मुंबई)

मानव धर्माची संहिता तयार करावी
देव व ईश्वर यासंबंधातील शरद बेडेकर यांचा लेख (१९ ऑक्टो.) नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व विचार प्रवर्तक आहे. आपली सृष्टी (व्यष्टी, समष्टी व परमेष्टीसहित) व त्याचे गतिमान आणि सतत बदलणारे स्वरूप इतके अद्भुत आहे की त्याचे शब्दात वर्णन करणे मानवी आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. मी कोण आहे, परमेश्वराचे स्वरूप काय, माझा व परमेश्वराचा कोणता संबंध आहे, हे व इतर अनुषंगिक सर्व प्रश्न याबाबत प्रचंड साहित्य उपलब्ध असले, तरी समग्र घटनांचे शास्त्रीय व तर्कदृष्टय़ा समाधानपूर्वक उत्तर सापडले नाही. आस्तिक्य, अज्ञेय, नास्तिक्य याबाबत कितीही वितंडवाद झाले तरी एकंदर ब्रह्मांडाचा (आपल्या सूर्यमालेच्या संदर्भात) व्यापार इतका अनपेक्षित आहे की, अंतिम सूत्रसंचालन करणारी जी शक्ती आहे, त्याचे आकलनाप्रमाणे स्वरूप मानण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला द्यावे लागेल. निसर्ग, देवदेवता, अवतार कार्य, प्रेषित, परमेश्वर याबाबत कोण बरोबर/चूक, कोणाचे योग्य /अयोग्य याबाबत कायदा करणे तर दूरच कोणतीही सक्ती करणे समाजाची घडी विस्कटणारे ठरेल. एक गोष्ट नक्की की अंतिम शक्तीला मानण्यामुळे मानवी अहंकार मर्यादित राहील व समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. सर्व धर्माचार्यानी व विवकेवाद्यांनी एकत्र येऊन मानव धर्माची संहिता तयार करणे व आपली सृष्टी भविष्यातील पिढय़ांकरिता आरोग्यदायी करणे एवढे आपण निश्चित करू शकतो.
श्रीकृष्ण नारायण फडणीस, दादर (मुंबई)

पारदर्शकता हवी
‘आत्महत्येपूर्वी परमार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र’ ही बातमी (२३ ऑक्टो.) वाचली. नियम-कायद्याची ढाल पुढे करत नागरिकांना हेलपाटे मारायला लावून घायाळ करावयाचे, हा आपल्या प्रशासनाचा ‘नियमच’ झाला आहे. यासाठी नागरिकांनी दाखल केलेल्या फाइलच्या संपूर्ण प्रवासाचा ‘ट्रॅक’ ठेवण्याची पद्धत शासनाने सुरू करावी. नस्तीच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस फाइलचा संपूर्ण प्रवास नोंदविण्यासाठी ‘अनुक्रमांक, आवक तारीख, अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा, अधिकाऱ्याचा शेरा, सही आणि जावक दिनांक’ यांची नोंद केली जावी. नस्तीच्या प्रवासात पारदर्शकता आणली जात नाही तोपर्यंत नोकरशाहीच्या ‘फििक्सग’ला आळा घालणे अशक्य दिसते.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई


‘सहिष्णुं’ची कटुता नको

$
0
0

‘सामीला नागरिकत्व नकोच’ (लोकसत्ता, २६ ऑक्टो.) हे पत्र वाचले. पत्रलेखक पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व देण्यास विरोध करतात. अर्थात असे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे; परंतु सामीच्या नागरिकत्वाला विरोध करताना सर्वसामान्य पाक नागरिकांबद्दल आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. ‘शेवटी पाकिस्तानी ते पाकिस्तानी’, ‘वाकडे शेपूट सरळ होणार नाही’, ‘कोणत्याही थराला जाऊ शकतात’ अशा प्रकारचे शब्दप्रयोग पाक कलावंत किंवा सामान्य पाक नागरिक यांच्याबद्दल वापरण्यात काय अर्थ आहे?

भारत-पाक या दोन राष्ट्रांत सतत संघर्ष चालू असतो. आत्तापर्यंत भारताची पाकसोबत तीन युद्धे झाली आहेत. एकमेकांचा द्वेष करण्यासाठी आयतीच धर्माची फोडणी हमखास देता येते. भारतीयांचा पाकला जो विरोध आहे तो तेथील सामान्य नागरिक किंवा कलावंत यांना नसून पाकमधील धर्माध राजकीय नेतृत्व आणि लष्कराने पाळलेल्या दहशतवादी संघटना यांना आहे, हे वास्तव आपण प्रथम मान्य केले पाहिजे. काश्मीर प्रश्नावरून तर दोन्ही देशांतील वातावरण नेहमीच तापलेले असते. असे असूनही भारताने पाकसोबतचे किंवा पाकने भारतासोबतचे संबंध कधीही पूर्णत: तोडलेले नाहीत. ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांची अधिकृत शत्रुराष्ट्रे नाहीत. या दोन्ही राष्ट्रांत व्यापार सुरळीत चालू असून तो आणखी वाढवण्यासाठी भारत-पाक दोघेही प्रयत्नशील आहेत. दोन्ही देशांत क्रिकेटचे सामने होण्यासाठी ‘बीसीसीआय’ व ‘पीसीबी’ यांच्यात चर्चा चालू आहे. सांस्कृतिक पातळीवर देवाणघेवाण चालू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष थांबावा, अशीच दोन्हीकडच्या सामान्य नागरिकांची इच्छा असेल. त्यामुळे पाक कलावंतांचे कार्यक्रम उधळणे, पाकिस्तानी नागरिकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे अशा गोष्टींमुळे द्वेष वाढतच जाईल. एकीकडे आपण भारतीय संस्कृती सहिष्णू आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे असहिष्णुतेचे दर्शन घडवायचे, यामुळे आपल्या देशाचेच नाव खराब होईल.
– प्रकाश पोळ, कराड (सातारा)

प्रतिकात्मक तरी बदल हवा!

‘प्रतिभेचा प्रक्षोभ हवा’ हा अग्रलेख (२६ ऑक्टोबर) वाचला. या सरकारच्या बाबतीत प्रतीकात्मक असला तरी काही तरी ठोस दृश्य फरक सर्व जनतेला रोज दिसत राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि नेमके त्याकडेच दुर्लक्ष होत आहे असे वाटते. दूरगामी आणि चांगला परिणाम साधणारे निर्णय जितके महत्त्वाचे तितकेच (किंबहुना थोडे अधिकच) हेही महत्त्वाचे आहे. नाही तर घराबाहेर पडल्यावर सगळे मागच्या पानावरून तसेच पुढे चालू आहे, अशी भावना सामान्य नागरिकांत लगेच निर्माण होते.
हाती आलेली रिकामी तिजोरी, दुष्काळी परिस्थिती, भाववाढ, अशा नकारात्मक वातावरणात तर याची नितांत गरज आहे. मनोहर जोशींच्या काळात स्थिर भावांची पाटी मंत्रालयावर सतत दिसत होती. नवीन तेलंगणा राज्यात लगेच पोलिसांच्या नव्याकोऱ्या देखण्या गाडय़ा व त्यांचा बदललेला आत्मविश्वासपूर्ण वावर रोज नजरेत भरत होता. फडणवीस सरकारने यातून योग्य ते शिकावे. व्यवस्थापन आणि विपणन शास्त्रातले धडे राजकारणात गिरवण्यात भाजप निष्णात समजला जातो. अशा पक्षाच्या सरकारला ‘्रल्ल२३ंल्ल३ ॠ१ं३्रऋ्रूं३्रल्ल’चे महत्त्व उमगू नये याचे आश्चर्य वाटते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे

सेवा-परीक्षांची चिंता कुणाला?

सुमारे ७५हजार बारबालांच्या उदरनिर्वाहाची चिंता असणाऱ्या फडणवीस सरकारला राज्यातील लाखो होतकरू व पदवीधर बेरोजगार तरुणांच्या उदरनिर्वाहाची काहीच चिंता नसल्याचे या सरकारच्या धोरणांतून दिसत आहे. सरकारी तिजोरीचे कारण देत या सरकारने नोकरभरती बंद केली आहे. त्यामुळे २०१५ सालचे ‘एमपीएससी’चे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. तसेच २०१६च्या राज्यसेवा परीक्षेची वाट पाहात पाचपाच वष्रे बेरोजगार राहून ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यात या परीक्षांच्या भरतीला ‘प्रादेशिक समतोला’चा मापदंड जोडत, समित्या नेमत विद्यमान सरकार आपल्याच मनमर्जीने निव्वळ वेळकाढूपणा करत असल्याने, या सरकारने एक प्रकारे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळवादच मांडला आहे. सहायक विक्रीकर निरीक्षक (एसटीए) परीक्षेनंतर आठ महिने उलटूनही निकाल प्रलंबित आहेत. आयोग म्हणतो, सरकारचे आदेश नाहीत. हे कधी थांबणार? केंद्रात व राज्यात भाजप सरकार निवडून येण्यामध्ये या तरुण पिढीचा मोलाचा वाटा होता, पण निवडून येताच या सरकारने काय केले हे दिसतेच आहे.
– समीर बाबासाहेब काळे, इंदापूर (पुणे)

‘असते’पाशी उत्तरे का थांबतात ?

शरद बेडेकर यांचा ‘नास्तिक म्हणजे दुर्जन?’ हा लेख (२६ ऑक्टो.) वाचून असे वाटते की, जो कर्मकांड करतो तो आस्तिक आणि जो देवाला मानत नाही तो नास्तिक. पण या व्याख्या तोकडय़ा आहेत. प्रत्येक घटना अनुकूल का घडत नाही? आपल्या कर्माला नेहमीच अपेक्षित फळ का मिळत नाही? आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय? एखादी शक्य असणारी गोष्ट अशक्य होते वा अशक्य गोष्ट सहज का होते? या व अशा अनेक प्रश्नांवर माणसाने बरेच तर्क केले, खूप विचार केला व असा निष्कर्ष लावला की या जगात अशी एक शक्ती आहे की ज्यावर आपले नियंत्रण चालत नाही, तीच शक्ती हे सर्व जग चालवते.
आजही माणूस जेव्हा विज्ञानाच्या दृष्टीने विचार करताना त्याची बुद्धी जेथे थांबते त्या ठिकाणी तो एक ‘नियम’ किंवा ‘सिद्धांत’ तयार करून रिकामा होतो. आणि त्याच नियमानुसार इतर नवीन गोष्टींचा शोध घेतो. झाडावरचे फळ खालीच का पडते? याचे उत्तर देताना माणूस म्हणतो, पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. या ‘असते’पाशी आमची तर्कबुद्धी थांबते. अरे पण का असते? ही शक्ती निर्माण कोण करतो? धन आणि ऋण प्रभारामध्ये आकर्षण का असते? ऊर्जा निर्माण किंवा नष्ट का होत नाही? एकदा बंद पडलेले हृदय पुन्हा चालू का करता येत नाही? उष्णतेमुळे द्रवावस्था वायू व शीतलतेमुळे वायू अवस्था द्रव का होते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘हे असेच असते’ या ठिकाणी संपतात. जेथे नियम व सिद्धांत असतात तेथे ते नियम व सिद्धांत ठरवणारा व बनवणारा कोणी तरी असतो. आणि हा जो ‘कोणी तरी’ आहे त्यालाच मानवाने देव, गॉड, अल्लाह अशी वेगवेगळी नावे दिली. या शक्तीला फक्त माणूसच ओळखू शकतो पशू नाही. यामुळे असा प्रश्न पडू शकतो की, देवाने माणूस निर्माण केला की, माणसाने देव निर्माण केला? याचे उत्तर अगदी सोपे आहे, आई मुलाला जन्म देते का मूल आईला जन्म देते? तर दोघेही एकमेकांना जन्म देतात, कारण मुलामुळेच ती ‘आई’ होते. पूर्वी ती एक फक्त स्त्री असते. तसेच देवाचेही आहे.
माणसातील एक गुण त्याला पशूपासून वेगळे ठरवतो तो म्हणजे ‘कृतज्ञता’. याच कृतज्ञतेतून माणूस देवाची पूजाअर्चना करत असतो. पण आज भक्ती करण्याच्या पद्धती व हेतू पूर्णपणे बदलले आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आस्तिक हा फक्तमाणूसच असू शकतो. याचा अर्थ नास्तिक लोक पशू आहेत असे नाही.
– डॉ. हृषीकेश कवचट (बीड)

मनसे कोणत्या आक्रमकतेचा पुरस्कार करते आणि कसा?

राज ठाकरे यांची विकासाबाबतची तळमळ आणि भ्रष्टाचारविषयीची चीड मला स्वत:ला प्रामाणिक वाटते, पण रविवारी त्यांनी कल्याणच्या प्रचारसभेत शिवसेनेला ‘डरपोक’ ठरवणारी तिच्या बालिशपणाची जी उदाहरणे दिली ती मान्य असली तरी त्यांनी ज्या स्वरूपाच्या आक्रमकतेचा पुरस्कार केला तो मात्र मान्य नाही.
वास्तविक मनसेची आजवरची आक्रमकता ही ‘ गिऱ्हाईक बघून पुडी बांधणे’ असाच प्रकार होता. साहित्यिक, विचारवंत, फेरीवाले, थिएटर मालक यांच्या कानफटात मारणे अगदीच सोप्पे! पण त्यांच्यापकी कोणी सन्यात दाखल होण्याचे सोडाच, पण मुंबईच्या ‘भाईं’पर्यंत पोहोचण्याचे धाडस दाखवले आहे काय? कुळकर्णी यांच्या कानफटात मारण्याऐवजी अशा कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या मंत्र्यांच्या कानफटात मारण्याचे धाडस आहे काय? – असे धाडस दाखवावे असे येथे अजिबात सुचवायचे नाही.
किंबहुना त्यांच्या िहसक आंदोलनाविरोधात खटला दाखल केला गेल्यावर ‘ते आमचे कार्यकत्रे नव्हते, पक्षनेतृत्वाचा तसा आदेश नव्हता,’ अशी कातडी बचाऊ भूमिकाच न्यायालयांत कित्येकदा मांडण्यात आली आहे.
– अनिल मुसळे, ठाणे

शिवसेनेची अमेरिकेबाबत काय भूमिका आहे?

$
0
0

‘आमचे सनिक मारले जात असताना पाकडय़ांना पायघडय़ा कशाला?’ असे म्हणत पाकिस्तानी कलाकार, खेळाडू यांच्याविरोधात शिवसेना ‘सध्या’ भलतीच आक्रमक झालीय. पण सेनेची व सेनेच्या या देशाभिमानी विचारांवर फिदा असणारांची अमेरिकेबाबत काय भूमिका आहे?

१४ लढाऊ, तर ५९ प्रशिक्षण विमाने आणि ३७४ रणगाडे या वर्षी अमेरिकेने पाकिस्तानला विकल्याची बातमी ताजी आहे. एफ १६ ही विमाने अद्याप विकलेली नाहीत, असे अमेरिका म्हणते (पण विकणारच नाहीत असेही नाही). ही खरेदी संग्रहालयात ठेवण्यासाठी पाकिस्तान करते आहे का? नुसते पुस्तक प्रसिद्ध करताहेत म्हणून शाई फेकलीत. इथे तर शस्त्रेच विकलीत. आणि हे वर्षांनुवष्रे चालले आहे. काय म्हणणे आहे यावर या देशभक्तांचे?
नथुरामची जयंती साजरी करणारे यावर म्हणतील, यात अमेरिकेचा काय दोष? त्यांनी फक्त व्यवहार केला- त्या शस्त्रांचे पाकने काय करावे हे अमेरिका कसे काय ठरवील? अमेरिका-गांधी ही तुलना अस्थानी आहे, पण ५५ कोटी पाकला द्या म्हणणारे गांधी (‘त्या पैशांचे त्यांनी काय करावे हे ते ठरवतील’, यापेक्षा) वेगळे काय सांगत होते? तरीही ‘५५ कोटींचे बळी’ म्हणत गांधी खुनाचे आजही समर्थन नथुरामसमर्थक करतात ना? मग जो न्याय गांधींना लावलात तोच बराक ओबामांना लावणार का?
तिकडे पाकला हाताशी धरून चीनची अरेरावीही सुरूच आहे आणि केंद्र सरकारने एक सेझ प्रकल्पच चीनला देऊन टाकलाय! सेना सत्तेत आहे ना, विचारले आहे कधी?
– आनंद भंडारे, वरळी

‘आम्ही म्हणतो, नको’ हे
समांतर सत्तास्थानाचे लक्षण

गुलाम अली नकोत! कसुरी नकोत! पाक क्रिकेट नको! कारण काय, तर म्हणे ते सर्व दहशतवादी राष्ट्रातून येणार म्हणून! खरे तर ही सर्व देशातील लोकांनी, लोकांसाठी लोकनियुक्त सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायची बाब. राजकारण वेगळे, कला वेगळी, मैत्री वेगळी. पण एखादे समांतर सत्तास्थान निर्माण होते; तेव्हा ‘असं का हो? असं कसं हो?’ प्रश्न केला, तर उत्तर येते- ‘आम्ही म्हणतो म्हणून!’ नाझींचा उदय असाच झाला होता हे आपण सोयीस्कर विसरतो.
– रवी कुलकर्णी, पुणे

दाऊद आला असता, तर?

‘छोटा राजनला अटक’ (लोकसत्ता, २७ ऑक्टो.) या बातमीत पुढे म्हटले आहे की, दाऊदलाही भारतात परतायचे होते, पण त्याच्या काही अटी सरकारला मान्य झाल्या नाहीत. झाले ते एका अर्थाने बरेच! अन्यथा दाऊद भारतात आला असता व त्याच्यावर वर्षांनुवष्रे खटला चालला असता. शिवाय ‘मी चुकलो, मला क्षमा करा’, अशी याचना त्याने केली असती, तर येथील यच्चयावत बुद्धिवंत, माध्यम-पंडित, पुरोगामी मंडळी आणि िहदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्याला फाशी न देण्याबद्दल साकडे घातले असते व बॉम्बस्फोटात जी शेकडो माणसे मेली, त्यांचे कुटुंबीय मूकपणे बघत बसले असते.
– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)
मग देशद्रोहाची नेमकी व्याख्या काय..?

‘दादरीची जखम खोलच..’ या योगेंद्र यादवांच्या लेखात (‘देशकाल, २१ ऑक्टो.) स्पष्टपणे लिहिलेले आहे की, ‘संघ परिवार या देशाच्या राज्यघटनेलाच मानायला तयार नाही.. त्यांचे स्वप्न भारताला पाकिस्तानसारखे एककल्ली बनवण्याचे आहे. बहुसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या ‘िहदू पाकिस्तान’ची निर्मिती त्यांना करायची आहे’.
राज्यघटनेला न मानणे हा देशद्रोह नसेल, तर देशद्रोहाची नेमकी व्याख्या काय? योगेंद्र यादवांच्या त्या वाक्याला संघाने विरोध केल्याचे वाचण्यात आलेले नाही. आठवडा उलटला तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही; म्हणजे काय समजायचे..?
राज्यघटनेला न मानणे तर सोडाच, भ्रष्टाचारी अधिकारी व राजकारण्यांनासुद्धा देशद्रोहीच समजले पाहिजे. राष्ट्रध्वजाला सलामी देणे ‘एवढीच’ देशभक्ती हा जो विचार आहे तो बदलला पाहिजे. नंतरही भ्रष्ट व्यवहार सुरूच राहात असतील तर तो राष्ट्रध्वजाचा खरा अपमान आहे, हा विचार या देशात जोपर्यंत रुजत नाही तोवर न्याय प्रस्थापित होणार नाही.
– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

महाराष्ट्रीय एकमेकांचा विचार करतात?

गोढाळा (चाकूर, जि. लातूर) या गावातील, ११वीत शिकणाऱ्या स्वाती विठ्ठल पिटले या विद्यार्थिनीने महाविद्यालयात जाण्यासाठी एस.टी. पासाला पसे नसल्याने व गरिबीला कंटाळून आत्महत्या केली ही घटना मनाला वेदना देणारीच होय. एकीकडे शहरे वा काही गावातीलही महाविद्यालयीन विद्यार्थी दहा-वीस हजाराचे मोबाइल, तीस-चाळीस हजारांचे लॅपटॉप, स्वतचे वाहन वापरतात, तर खेडय़ात एक विद्यार्थिनी दोन-अडीचशे रुपये मिळत नसल्याने मृत्यूला कवटाळते, याला काय म्हणावे?
आपल्या महाराष्ट्रात जनतेकडून एकमेकांच्या परिस्थितीचा, भावभावनांचा विचार होत नाही, असे दिसते. एकीकडे दुष्काळ आणि शहरात पाण्याचा अपव्यय, एकीकडे गरिबी तर दुसरीकडे श्रीमंती बेजबाबदारपणा! आठ-दहा दिवस होऊनही कुणीही लोकप्रतिनिधी गोढाळा गावापर्यंत पोहोचले नाहीत, यावरून आमच्या नेत्यांची तत्परताही दिसून येते.
– मनमोहन रो. रोगे, ठाणे.
‘असते’पाशी उत्तरे थांबत नाहीत..

‘‘असते’पाशी उत्तरे का थांबतात?’ या शीर्षकाचे आणि हा प्रश्न विज्ञानाबाबतही उपस्थित करणारे पत्र (लोकमानस, २७ ऑक्टो.) गुरुत्वाकर्षणासह अनेक बाबींमध्ये ‘असते’पाशी मानवी तर्कबुद्धी थांबते, असे पत्रलेखकाने म्हटले आहे. या मताच्या समर्थनार्थ त्यांनी काही प्रश्नरूपी उदाहरणेही दिली आहेत.
पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते, या ‘असते’पाशी माणसाची तर्कबुद्धी कधीच थांबलेली नाही. आइन्स्टाइनसह अनेकांनी गुरुत्वाकर्षण शक्तीची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी वेगवेगळे तर्क मांडले आहेत. गुरुत्वाकर्षण शक्तीला कारणीभूत ठरणारे अतिसूक्ष्म कण असावेत, असाही तर्क केला गेला आहे. स्वित्र्झलड येथील ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ या अवाढव्य यंत्राद्वारे अशाच काही अतिसूक्ष्म कणांचा शोध घेतला जात आहे. तो तर्क खरा ठरला तरीही गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल विचार करणे, तर्क करणे संपेल असे मात्र नाही.
हे अतिसूक्ष्म कण अस्तित्वात कसे आले, ते ठरावीक पद्धतीने का वागतात, वगरे कुतूहले माणसाच्या मनात उद्भवतीलच. अशा शंकांवर उत्तरे शोधण्यासाठी नवीन तर्क केले जातील. त्यांचा पडताळा घेण्यासाठी नवीन प्रयोग केले जातील. याच अनुषंगाने पत्रलेखकाने उदाहरणादाखल मांडलेल्या इतर प्रश्नांबाबत विचार करता येईल.
मुळात तर्क करण्याच्या प्रक्रियेला कधीही पूर्णविराम नसतो. एखादा तर्क एक तर बरोबर ठरू शकतो किंवा चुकीचा ठरू शकतो. तर्क चुकीचा ठरला तरी तो पर्यायी तर्क मांडण्यासाठी प्रवृत्त करतो. यातून अचूक तर्कापर्यंत किंवा सत्यापर्यंत पोहोचण्यास मदतच होते.
समस्येचे उत्तर तथाकथित ‘कुठल्या तरी शक्तीच्या नियंत्रणात’ आहे, असे म्हटले तर असा तर्क शेवटचा असेल. मग माणूस समस्या मुळापासून सोडविण्याच्या दृष्टीने इतर तर्क करणेच सोडून देईल. समस्या सुटण्यासाठी पुढे तो प्रयत्नच करणार नाही. यातून नुकसान शेवटी माणसाचेच होईल.
थोडक्यात, तर्कबुद्धी आपले काम कधीही थांबवत नाही. तिचे काम अविरत चालत राहणारे आहे. यातूनच पुंजभौतिकीसारख्या नवनवीन विज्ञानशाखा निर्माण होतात.
यामुळेच ‘अनेक प्रश्नांची उत्तरे ‘हे असेच असते’ या ठिकाणी संपतात,’ म्हणण्याऐवजी; ‘अनेक प्रश्नांची उत्तरे ‘हे असेच का असते?’ असा प्रतिप्रश्न विचारून मिळवता आलेली आहेत आणि येतात,’ असे म्हणायला हवे.
– सुशील चव्हाण, कुर्ला पूर्व (मुंबई)

या दोघांना युद्धगुन्हेगार का ठरवू नये?

$
0
0

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना उशिराने झालेल्या उपरतीचा अचूक परामर्श ‘बारा वर्षांनंतरची कबुली’ या संपादकीयाने (२७ ऑक्टो.) घेतला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश व ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या सत्तासंचालनाचा काळ जवळपास सारखाच. त्यात धाकटे जॉर्ज बुश त्यांच्या तीर्थरूपांसारखे जन्मजात युद्धप्रेमी अन् हेकेखोर. इराक युद्धाचा निर्णय हा अमेरिकी सुरक्षा धोरणाचा भाग असण्यापेक्षा धाकटे बुश यांचे जुने कौटुंबिक हिशेब फेडण्याचा निर्णय होता, हे काळानेच सिद्ध केले. त्यात ‘तेलाचे राजकारण’ हा सर्वसामान्य लोकांच्या आकलनापलीकडचा विषय. बुश यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्रिटनच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाचा बारकाईने अभ्यास केल्यास ब्रिटनने स्वत:चे असे स्वतंत्र परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण राबविण्यापेक्षा अमेरिकेच्या आहारी जाऊन अमेरिकेचे परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण जसेच्या तसे राबवण्यात धन्यता मानली असे दिसते. यात अनेक वेळेला पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी आपल्या मंत्रिमंडळाला आणि पार्लमेंटलासुद्धा अंधारात ठेवले, अशी माहिती पुढे येत असल्याचा उल्लेख अग्रलेखातही आहे.

अशा परावलंबी धोरणामुळे एके काळी ज्याच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, त्या ब्रिटनला आज तोंडावर आपटण्याची वेळ आली असून देशांतर्गत आणि जगाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. सद्दाम हुसेन जरी धुतल्या तांदळासारखा नसला तरी इराकसारख्या एका सार्वभौम राष्ट्रावर आक्रमण करून त्या राष्ट्राला अराजकतेच्या खाईत लोटल्याचे महापाप बुश-ब्लेअर या युद्धखोर दुकलीला नक्कीच स्वीकारावे लागेल. खरे तर इराकी जनतेला १२ वर्षांच्या वनवासात होरपळत ठेवणाऱ्या बुश-ब्लेअर या युद्धखोरांवर मानवी संहाराचा आरोप ठेवून जागतिक न्यायालयात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा आज अमेरिका आणि ब्रिटन ही राष्ट्रे कितीही बलाढय़ असली तरीही येणाऱ्या काळात या देशांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या युद्धखोरांच्या पापांचा हिशेब जगापुढे द्यावा लागेल. भारतानेही दीर्घकालीन अमेरिकास्नेही धोरण बनवण्याअगोदर या घटनेतून धडा घेणे गरजेचे आहे.
– सचिन मेंडिस, वसई

जेआरडींचा इशारा आजही खरा ठरतो!

‘किती काळ अधांतरी?’ हा एअर इंडियाची दुरवस्था विशद करणारा ‘अन्वयार्थ’ (२८ ऑक्टो.) वाचला आणि गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकातील एक परिच्छेद आठवला. तो असा :
‘जेआरडी टाटांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन कोणत्याही क्षेत्राचं राष्ट्रीयीकरण हा कसा मार्ग नाही, हे सविस्तरपणे विशद केलं. त्यांचं म्हणणं होतं की, एकदा का राष्ट्रीयीकरण केलं की त्यातून प्रस्थापित सरकारकडून त्या क्षेत्राचं राजकीयीकरण होणं अटळ असतं.. हवाई सेवा क्षेत्र हे बऱ्याच गुंतागुंतीचं क्षेत्र आहे. तेव्हा या क्षेत्रात अडकवून सरकारने आपलं भागभांडवल वाया घालवू नये. पशापरी पसे आणि ऊर्जा दोन्ही वाया जाईल.’ (पृष्ठ १४६) जेआरडी यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीचे विचार हे निव्वळ एका भांडवलदाराचे विचार नसतात.
सरकारी कंपन्या हा उगाचंच राष्ट्रीय गौरवाचा विषय बनविला गेला आहे. त्यामुळे या कंपन्या अकार्यक्षमतेपायी कितीही तोटय़ात गेल्या तरी त्यांना जगवणे, म्हणजे तेथील व्यवस्थापन आणि कर्मचारी यांना जनतेच्या पशावर पोसणे हेच कित्येक वर्षे चालू आहे.
खासगीकरण हा रामबाण उपाय नसला तरी एक प्रभावी उपाय ठरू शकतो. अकार्यक्षमता आणि बेफिकिरी यांना अटकाव बसू शकतो. सरकारी तिजोरीवरचा भार तात्काळ कमी होणे हा आपल्यासारख्या तुटीच्या अर्थव्यवस्थेस मिळणारा फार मोठा दिलासा असतो.
‘काही खासगी विमान कंपन्याही तोटय़ात आहेत त्याचे काय?’ असा युक्तिवाद काही जण करतील. पण तेथे अकार्यक्षमता नव्हे तर अन्य कारणे आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना जगवण्यासाठी जनतेचा पसा ओतला जात नाही, तर त्यांचे त्यांनाच जगण्याचे मार्ग शोधायचे असतात.
– अनिल मुसळे, ठाणे पश्चिम.

तांत्रिक, मांत्रिक आणि गंडेदोरेसुद्धा..

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी एका तांत्रिकाकडे धाव घेतल्याचा तथाकथित व्हीडिओ प्रसिद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘बिहारला तांत्रिकांची, काळ्या जादूची नव्हे, तर विकासाची गरज आहे,’ असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी रविवारी प्रचार सभेत केले. याच प्रचार सभेत हातवारे करून बोलतानाचे मोदींचे छायाचित्र ‘द इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये (२६ ऑक्टोबर, पृष्ठ क्र. १०) प्रसिद्ध झाले आहे. त्या छायाचिात मोदींच्या उजव्या हाताला गंडा / दोरा बांधल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा गंडा-दोरा त्यांना निश्चितच कोणा वैज्ञानिकाने किंवा अंधश्रध्दा निर्मूलन समितीने दिलेला नसावा. त्यामुळे, तांत्रिक-मांत्रिकांवरून मोदींनी नितीश कुमार यांना लक्ष्य करणे, यासारखा दांभिकपणा नाही. ‘काचेच्या घरात रहाणारयाने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत,’ हा व्यावहारिक संकेतही प्रचारादरम्यान बेभान झालेले मोदी विसरलेले दिसतात. असले गंडे-दोरे बांधणे काय किंवा तांत्रिक-मांत्रिकांकडे जाणे काय, यांत गुणात्मक फरक नाही, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. पण मोदींना याचे भान राहिलेले नाही.. पंतप्रधान होऊन १७ महिन्यांचा कालावधी लोटला, तरी मोदींचा तोंडाळपणा जात नाही; हे ‘जित्याच्या खोडी’ सारखे आहे. पंतप्रधानपद भूषविणाऱ्या व्यक्तीने किती भंपकपणा करावा, यालाही काही मर्यादा हवी. वास्तविक, गंडे-दोरे हातात बांधणे किंवा गळ्यात घालणे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण नीतिश कुमार यांच्या संबंधीच्या ‘व्हीडिओ’च्या अनुषंगाने आपल्या पदाची प्रतिष्ठा विसरून जाहीरपणे टिंगल- टवाळी करण्याचा जो विधिनिषेधशून्य मार्ग मोदींनी अवलंबिला आहे, त्यामुळेच त्यांच्या गंडेदोऱ्यांचीही जाहीरपणे दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
– संजय चिटणीस, मुंबई

दुष्काळातही कुरघोडय़ांचाच खेळ!

‘सह्याद्रीचे वारे’ या सदरातील ‘सत्तेतही आणि विरोधातही’ (२७ ऑक्टोबर) हा लेख वाचला. राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच शिवसेना कुरघोडय़ा करायचे सोडत नाही. येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन सत्ताधारी पक्षच एकमेकांचे पाय ओढण्याचे काम करतील, हेही खरेच आहे.
वास्तविक, राज्यात आणि देशात दुष्काळ, असहिष्णुता असे वातावरण असतानाही सत्ताधारी पक्षांना जनतेसाठी काही करण्यापेक्षा त्यामध्ये आपली पोळी भाजून सत्तेत कसे राहता येईल याचाच प्रश्न आहे!
– वंदन बळवंत थिटे, उस्मानाबाद

आपले मात्र पुराणे ‘मारक वाद’!

$
0
0

अग्रलेखात (२९ ऑक्टो.) वर्णिलेला ‘नवा ‘मार्क’वाद’ भारतीयांच्या अंगवळणी पडणे तर दूरच; त्यास तत्त्व म्हणून प्राथमिक स्वीकारार्हता मिळणे हेच दुरापास्त आहे. एखादा कल्पक आहे, बुद्धिमान आहे की त्याही पुढे हे सर्व व्यावसायिक रूपात आणण्याचे गुण व वकूब त्याच्यात आहे या कशाचेही मोल, मूल्यांकन करण्याची आवश्यकताच आपल्या समाजाला वाटत नाही. त्यात एखाद्याने या पुंजीवर मोठय़ा उद्योगाचा पाया घातला जाईल असे म्हटल्यास, राहत्या भवनांपासून संसद भवनापर्यंत त्याला वेडय़ातच काढले जाते. उद्योग उभारण्यासाठी जी ‘पुंजी व गुण’ लागतात ती ही नव्हे, असेही व्यावहारिक डोस पाजले जातात. स्वत:च्या क्षमतांवर केलेले संशोधन बाजारात प्राथमिक चाचणीकरिता द्यायचे म्हटले तरी त्यास ‘संधी मिळाली’ असे म्हणण्याचे धाडस कोणी शहाणा करणार नाही. कारण त्यामागे कोण छगनभाई-मगनभाई टपून बसले असतील हे वेगळे सांगावयास नको! अशा समाजात पेटंट वगरे गोष्टी या केवळ तोंडदेखल्या कौतुकाचा भाग तरी असतात किंवा अनुल्लेखाने मारण्याच्या! न्यायदेवता ‘डोळ्यांवर पट्टी बांधून’ तुमच्या पाठीशी आहेच. ‘फेसबुक’ किंवा ‘अ‍ॅपल’ यांसारख्या संकल्पना कोणी भारतात प्राथमिक चाचणीसाठी देऊन बघण्याची िहमत करूनच पाहावी! त्यातही कुठे उच्च संस्थांतून कौतुकाची फुले झेलून कोणा ‘व्हेंचर कॅपिटलिस्ट’ किंवा गुंतवणूकदाराचे उंबरठे झिजवून पाहावेत, बँकांकडे प्रस्ताव देऊन ‘झापडबंद’ प्रबंधकाची किंवा संचालकाची मधाळ मात्रा चाखावी. त्यातून काही उरलेच तर जगण्याची उमेद शोधावी, जवळच्या लोकांत स्वत:ची ओळख शोधावी.
गंमत म्हणजे, ज्या संशोधकांना केंद्र शासनाने अनुदान देऊन जी तंत्रज्ञाने प्रत्यक्षात आली, त्यावर पुढे उद्योग उभारावा यासाठी ठोस कार्यक्रम काही नाही. ‘एक कोटी रुपयांत नवे तंत्रज्ञान बाजारात आणा’ म्हणतात, तेही अर्धी गुंतवणूक संशोधकाची! शासन ५० लाख देईल, बाकी बँका देतात का, ते तुमचे तुम्ही पाहा! संबंधित अधिकारी खुशाल याच फेसबुक, अ‍ॅपलची नावे घेऊन असे काही प्रस्ताव असतील तर सांगा म्हणतात. इतर देशांतील कोणाशी संपर्क आल्यावर अगदी सहज प्रश्न विचारला जातो, मग तुमचे शासन यासाठी पुढे मदत करीत नाही काय? आता, यांना काय रामकहाण्या ऐकवायच्या!
अमेरिकेतील विद्यापीठे व संबंधित संस्था, कंपन्या आता बाहेरील देशांतील संशोधकाने कुटुंब-कबिल्यासह तेथे येऊन कंपन्या उभाराव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. तेथे प्राथमिक चाचणीसाठी उत्पादने वापरावयास देणे, पेटंटचा मान राखणे या सामाजिक जाणिवेचा भाग आहेत व त्याचा अर्थव्यवस्थेशी, जागतिक व्यापाराशी संबंध आहे, हेदेखील तिथला सामान्य माणूस जाणतो. मुख्य म्हणजे सदर संशोधक निर्धास्तपणे आपला चमू बनवू शकतो व त्याला एकूण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असते. आपल्याकडचा अनुभव म्हणजे, हे संशोधन विकसित करायला तुम्हाला किती खर्च आला, तुम्ही स्वत: पुढे किती गुंतवणूक करणार व त्याही पुढे ‘आय नो, व्हेअर डु यू कम फ्रॉम..’ म्हणत ‘ज्ञानेश्वरी’सुद्धा किलोच्या भावात काढतात. आपल्यासाठी पारंपरिक साठेबाजी, करबुडवेगिरी, हाताशी धरून करावयाचे ‘धवलचौर्य’, ठेकेदारी, बांधकाम व्यवसाय अशी ‘नगदी’ पिके असताना हे तोंडाला ‘फेस’ आणणारे नस्ते उद्योग कोण करणार? हे असले पुराणे ‘मारक वाद’ जोवर आपल्याकडे आहेत तोवर हे नवे ‘मार्क वाद’ म्हणजे, लंकेत सोन्याच्या विटा..!
– सतीश पाठक, पुणे

कंत्राटीकरणाबद्दल सारेच गप्प कसे?

कामगारांच्या प्रश्नाबद्दल आजची वृत्तपत्रे लिहीत नाहीत, असे डॉ. पां. रा. किनरे यांनी त्यांच्या लेखात (लोकसत्ता, २९ ऑक्टो.) लिहिले आहे, ते खरे आहे. परंतु आजच्या दुरवस्थेला आमचा कामगारही जबाबदार आहे. कामगारांनी त्यांच्या संघटना दहाही बोटांत सोन्याच्या अंगठय़ा घालणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. कायद्याचे ज्ञान नसलेले हे असे नेते मालकाशी हातमिळवणी करून कामचलाऊ करार करतात व अनेकदा मालकांच्या वकिलांनी केलेल्या कागदावर सह्या ठोकतात. विरोध करणाऱ्यांना धमक्या ठरलेल्याच.
कंत्राटी कायदा १९८० च्या सुमारास अमलात आला. अधूनमधून असणारे काम करण्यासाठी हा कायदा. नियमित कामासाठी कंत्राटी कामगार ठेवता येत नाहीत, असा कायदा आजही आहे. त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. कामगार आयुक्त कार्यालये आता नावापुरतीच आहेत. ठाणे येथील व्होल्टास कंपनीत दोन दशकांपूर्वी जवळपास चार हजार कायम कामगार होते. आजही तेच उत्पादन घेतले जाते, मात्र कायम कामगार जेमतेम २००. शेकडो कामगार कंत्राटी म्हणून काम करतात. राज्यातील महापालिका, सरकारी रुग्णालये येथे नियमित कामासाठी कंत्राटी कामगार राबवले जातात हे सरकारला दिसते; मग ते गप्प का? कामगार नेते रस्त्यावर का येत नाहीत? राज्य/ केंद्र सरकार कामगार कायद्यात बदल करणार आहे. हे सर्व बदल मालकधार्जणिे असणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची जरुरी नाही. आजही असा कायदा आहे की नियमित कामासाठी कारखान्यात काम करणाऱ्याला १८० व ऑफिसमध्ये कारकुनी करणाऱ्याला ९० दिवसांत कायम केले जावे. या नियमाची अंमलबजावणी सरकारने करावी. शेवटी, जर कामगार रस्त्यावर येणार नसतील तर देवसुद्धा त्याना वाचवू शकणार नाही!
– मार्कुस डाबरे (माजी सरचिटणीस, अ. भा. व्होल्टास कामगार संघटना) पापडी, वसई

‘असहिष्णुतेचा प्रचंड उद्रेक’ की ‘किंचितशी संवेदनशीलता’ वा ‘अस्मितेचा हुंकार’ ?

‘संशयकल्लोळ’ हा अन्वयार्थ (२९ ऑक्टो.) वाचला. इथे ‘हे प्रकरण वाटते तेवढे सरळ व सोपे नाही’ हे अन्वयार्थमधलेच वाक्य वापरण्याचा मोह आवरत नाही. सध्या देशात एकूणच गाय, गोहत्या, गोमांसबंदी इत्यादीवरून जे काही चालले आहे, तेही प्रकरण खरे तर वाटते तेवढे सरळ व सोपे नाही. या संदर्भात काही मुद्दे असे :
१) खरे तर घटनाकारांना देशभरात गोहत्याबंदी अभिप्रेत होती, हे त्यांनी घटनेत त्यासंबंधी केलेल्या तरतुदींवरून स्पष्ट आहे. (भारताची राज्यघटना : भाग पाचवा : राज्यांसाठी दिशानिर्देश : अनुच्छेद ४८ : शेती आणि जनावरपालन). देशात अनेक राज्यांत बऱ्याच पूर्वीपासून गोहत्याबंदी लागू आहे. (उदा. अन्वयार्थमध्येच म्हटल्याप्रमाणे दिल्लीत १९९४ पासून) असे असूनही, आजवर या संदर्भात कधीही अशी अशांतता, संशयाचे वातावरण किंवा िहसेचा उद्रेक झाला नाही, याचे कारण देशभर या कायद्यांचे कटाक्षाने, तंतोतंत होणारे पालन हे नसून, देशातील बहुसंख्य िहदू समाजाची याबाबतीतली उदासीनता (इन्डिफरन्स) हेच होय. वास्तविक बहुसंख्य िहदू, अजूनही गाईला (धार्मिक कारणाने) पूज्य मानतात, गोमांसभक्षण निषिद्ध मानतात. पण हा बहुसंख्य समाज शतकानुशतके आपल्या धार्मिक भावना इतरांकडून राजरोस पायदळी तुडवल्या जाण्याविषयी कमालीचा उदासीन राहिला आहे. गेली दीड-दोन वष्रे भाजपच्या शासनकाळात या विषयासंदर्भात बहुसंख्य समाजात किंचितशी संवेदनशीलता दिसत आहे. आणि ती तेवढीशी संवेदनशीलता, हा जणू काही ‘असहिष्णुतेचा प्रचंड उद्रेक’ असावा, अशा थाटात माध्यमांकडून मांडली, प्रदíशत केली जात आहे – व टीकेचे लक्ष्य होत आहे. हा खरे तर असहिष्णुतेचा उद्रेक वगरे नसून, शतकानुशतकांच्या पराभूत, उदासीन मानसिकतेतून- बऱ्याच उशिराने का होईना- जाग्या झालेल्या अस्मितेचा हुंकार आहे.
२) इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की, गाय, गोमांसभक्षण, गोहत्या वगरे बाबतीत स्वा. सावरकरांची मते काय होती, हा मुद्दा इथे पूर्णपणे गरलागू आहे. बहुसंख्य िहदू समाज, स्वा. सावरकरांइतका प्रखर विज्ञाननिष्ठ होईल, अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे. बहुसंख्य िहदू धार्मिक बाबतीत पारंपरिकच आहेत. गाईला पूज्य मानणे, गोमांसभक्षण निषिद्ध मानणे, या जर त्यांच्या धार्मिक श्रद्धा असतील तर त्या तुच्छ लेखणे योग्य नाही. जर लोकशाही व्यवस्थेत बहुमताचा आदर अभिप्रेत आहे, तर बहुसंख्यांच्या धार्मिक भावनांचा आदर व्हावा, ही अपेक्षा रास्तच म्हटली पाहिजे. ‘कुठलीही स्त्री कधीही ‘कुमारीमाता’ असूच शकत नाही’ – हे वैज्ञानिक सत्य – कोणी कधी श्रद्धाळू ख्रिश्चनाला सांगायला जाईल का? जर नाही; तर – ‘गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे’ – हे वैज्ञानिक सत्य, िहदूंच्या गळी उतरवण्याचा अट्टहास कशासाठी?
३) दादरी घटनेनंतर देशातल्या पुरोगामी, निधर्मी, विचारवंतांकडून निषेधाची, कठोर टीकेची जी लाट उसळली आहे, तिचा एकूण सूर- ‘देशात असहिष्णुतेचा वणवा पेटलाय आणि त्यात (जणू काही) सारे संपून जाईल’ – असा आहे. हे सर्व फार एकतर्फी होत आहे. याला जी दुसरी बाजू आहे, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे (किंवा मुद्दाम केल्याचे) दिसून येते. दुसरी बाजू अशी की, तुम्ही जिला असहिष्णुतेचा उद्रेक म्हणताय, ती खरे तर सहनशीलतेच्या पराकाष्ठेतून, कडेलोटातून आलेली अगतिकता, वैफल्यग्रस्तता असू शकते! देशातला पुरोगामी, प्रज्ञावंत वर्ग, हा पारंपरिक बहुसंख्य समाजापासून वैचारिकदृष्टय़ा फार दुरावलेला आहे, हे उघड आहे. परंपरेच्या जोखडाखालून समाजाला बाहेर काढणे, त्याला आधुनिक, विज्ञाननिष्ठ बनवणे ही फार कष्टाची, दीर्घकाळ चालणारी किचकट कामे आहेत. ते न करता केवळ धार्मिक परंपरावादी समाजाला तुच्छ लेखून काहीच साध्य होणार नाही. समाजातील प्रथितयश धुरीणांनी ‘होय, मी खातो गोमांस- या मला मारायला’ – अशी भाषा वापरणे, हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही.
४) आपल्याला तुच्छ लेखले जाते, ही भावना माणसाला किंवा समाजाच्या एखाद्या वर्गाला केव्हा ना केव्हा तरी आक्रमक बनवल्यावाचून राहत नाही. त्यामुळे आज खरी गरज असेल, तर ही की समाजाच्या या दोन टोकांमधली एकीकडे आधुनिक, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरोगामी वर्ग नि दुसरीकडे धार्मिक परंपरावादी श्रद्धाळू वर्ग यांच्यामधली वैचारिक दरी भरून काढण्याची. निदान शक्य तितकी कमी करण्याची. त्याकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी केवळ परंपरावाद्यांना हीन, तुच्छ लेखत राहिल्याने काही साध्य होणार नाहीच, उलट ही दोन टोके अधिकाधिक दुरावत जाऊन परंपरावादी अधिकाधिक उग्र, आक्रमक होत जातील, जे अंतिमत: देशहिताचे नाही. कारण निदान सध्या तरी संख्याबळ परंपरावादी वर्गाकडेच आहे, असे दिसते.
– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)

आस्तिक/ नास्तिक हे प्रकार की पायऱ्या?

‘नास्तिक म्हणजे दुर्जन?’ या लेखात त्यात लेखकानी लोकांची आस्तिक आणि नास्तिक या दोन मुख्य प्रकारांत विभागणी केली आहे. नास्तिक या शब्दात बुद्धिप्रामाण्यवाद अभिप्रेत असेल तर आस्तिक व नास्तिक हे प्रकार नसून त्या माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीच्या पायऱ्या आहेत असं आपण म्हणू शकतो.
कोणीही माणूस जन्मल्यापासून बुद्धिप्रामाण्यवादी असू शकत नाही. कारण सुरुवातीच्या काही वर्षांत तो आपल्या बहुतेक गरजांसाठी इतरांवरच अवलंबून असतो. वैचारिकतेसाठी लागणारा स्वानुभव त्याच्याकडे नसतो. पुढे अनुभव वाढतो तसतसा तो नास्तिक (बुद्धिप्रामाण्यवादी) होण्याची शक्यता निर्माण होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर त्याचा आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे प्रवास सुरू होतो. हे सर्व तो आयुष्यातल्या अनुभवांकडे कसं पाहायला शिकतो त्यावर अवलंबून असतं. या प्रवासात कोणाची गती कमी तर कोणाची अधिक. अशा परिस्थितीत नास्तिकांनी आस्तिकांचा उपहास करणं म्हणजे वरच्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांनी खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना आपल्याइतकं येत नाही म्हणून नावं ठेवण्यासारखं आहे. आज स्वत:ला जे अभिमानाने नास्तिक म्हणवतात त्यांनी आपलं पूर्वायुष्य आठवून पहावं. सागायचा मुद्दा हा की नास्तिक्याचाही दुराभिमान नको.
शरद कोर्डे, ठाणे.
तो आहे तिथेच बरा!

मुंबईत खून, खंडण्या व अनेक बेकायदा व्यवहारांत हात असलेला व अनेक वष्रे बेपत्ताच असलेला गुंड टोळीप्रमुख छोटा राजन अखेर इंडोनेशियाच्या पोलिसांना सापडल्यानंतर, आता त्याला भारतात आणून त्याच्यावर खटले भरण्याची खटपट सुरू झाली आहे. पोर्तुगालहून अबू सालेमला आणून त्याच्यावर खटले चालवले गेले, त्यास अनेक वष्रे होऊनही त्याला शिक्षा झाली का? उलट त्याची तब्येत खूप सुधारलेली दिसते, त्याच्या बंदोबस्तावर तसेच खटल्यावर होत असलेला खर्च करदात्यांचा असतो, बनावट मुद्रांकांचा व्यवहार करून अब्जावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या तेलगीचा साथीदार सुरेश जैन आज तुरुंगात मजेत आहे, मग छोटा राजनला भारतात आणून आपली यंत्रणा, तिजोरी आणि सुसज्ज रुग्णालये यांवर अनावश्यक भार कशासाठी? तो आहे तिथेच बरा आहे!
– श्रीराम गुलगुंद, चारकोप (मुंबई)
हा निष्कर्ष निराधार!

ईश्वर व धर्म न मानणाऱ्यांची नीती ‘शुद्ध’ असते व धर्म आणि ईश्वर मानणाऱ्यांची नीती तुलनेने ‘हिणकस’ असते असे शरद बेडेकर (मानव विजय, २६ ऑक्टो.) कशाच्या आधारे म्हणतात? हे म्हणजे प्रत्येक सात्विक, सहृदय व सत्कर्म करणारा माणूस हा ‘निरीश्वरवादी’ असतो असे म्हणण्यासारखे होईल. प्रत्येक धार्मिक, ईश्वरवादी माणसाचे सत्कृत्य ‘पुण्यसंचयासाठी’ असते व प्रत्येक निरीश्वरवादी माणसाचे सत्कृत्य हे शुद्ध, जनहितार्थ व निरपेक्ष बुद्धीने असते असे म्हणणे हे निरपेक्षपणे सत्कृत्य करणाऱ्या ईश्वरवादींवर अन्याय करणारे आहे. अगदी ‘पुण्यसंचय हा हेतू’ आहे असे धरूले तरी फार तर असे सत्कृत्य दुय्यम दर्जाचे असे म्हणू शकतो, पण ‘हिणकस’ नक्की नाही. उलट धार्मिक व ईश्वरवादी मनुष्याचा सत्कृत्य करण्याकडे कल असण्याची शक्यता अधिक आहे.
परिचित व्यक्तीच्या वर्तनाचा किंवा सद्वर्तनाचा अंतस्थ हेतू असतो किंवा नसतो हे आपण फारफार तर पूर्वानुभवावरून म्हणू शकतो. पण, कुठल्याही दोन ईश्वरवादी व निरीश्वरवादी त्रयस्थ व्यक्तींच्या सद्वर्तनामागे अंतस्थ हेतू असेल किंवा नसेल हे आपण छातीठोकपणे कसे सांगू शकू? खेरीज, रोज ‘पाप’ करणारे, भ्रष्टाचार करणारे हे खरे ‘धार्मिक व ईश्वरवादी’ नसतातच.
– चिंतामणी भिडे, ठाणे
‘मानव-विजया’च्या साध्यासाठी लढा अटळ

‘नास्तिक म्हणजे दुर्जन?’ हा लेख (मानव विजय, २६ ऑक्टो.) व ‘‘असते’पाशी प्रश्न का थांबतात?’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, २७ ऑक्टो.) वाचली. पृथ्वीवरील सजीव सृष्टीत आढळणारे चतन्याचे आविष्कार पाहता या चतन्याचा स्रोत असणारी एक ऊर्जा अस्तित्वात आहे यात शंका नाही. मात्र ‘तीच शक्ती हे सर्व जग चालवते’ की ‘त्या शक्तीमुळे जग (आपोआप) चालते’ हा प्रश्न आहे. या शक्तीची जी अभिव्यक्ती आपल्याला दिसते त्या प्रक्रियेमागे काही विचारसरणी, विवेक, संवेदनशीलता अशा काही प्रेरणा आहेत काय? म्हणजे ही शक्ती माणसाप्रमाणे विचार करू शकते काय? की ही शक्ती केवळ निसर्गनियमांनुसार, अनियंत्रित प्रवाहाप्रमाणे वाहत असते? ही शक्ती घडणाऱ्या घटना, दुर्घटना, उलथापालथ यांचे उत्तरदायित्व आणि जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम आणि लायक आहे काय हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
जगाची आजची भरकटलेली अवस्था पाहता जगाच्या रहाटगाडग्याचे न्याय्य व्यवस्थापन करणारी अशी एखादी शक्ती एकतर अस्तित्वातच नाही किंवा त्या शक्तीने जगाचा कारभार माणसाच्या मनातल्या सद्विवेकाच्या (त्या शक्तीनेच योजलेल्या) गुणसूत्रावर सोपवून स्वत: इतरत्र दंग/व्यस्त असावी. सद्विवेकाच्या गुणसूत्राचे हे ‘अ‍ॅण्टिव्हायरस’ आता मुदत संपल्यामुळे कालबाह्य़ झाले आहे. ‘अ‍ॅण्टिव्हायरस’चे नूतनीकरण हे (िहदू धर्माच्या प्रतिपादनानुसार ईश्वराचाच अंश असलेल्या) स्वत मानवालाच स्वयंचिकित्सेच्या आधारे करणे प्राप्त आहे.
समाजातील विचारवंतांनी समाजात हे ‘अ‍ॅण्टिव्हायरस’ प्रस्थापित करण्याच्या कार्यास सुरुवात केलेलीच आहे. समाजविघातक विषाणूंचा कडवा प्रतिकार करताना त्यातले काही विचारवंत या विषाणूंच्या हल्ल्यास बळी देखील पडत आहेत. त्याच्यापुढील आव्हान कडवे आहे. मात्र ही लढाई मानवाच्या अस्तित्वासाठी अटळ आहे.
– प्रमोद तावडे, डोंबिवली
‘चर्चेतले’ अजित डोवल आणि आदर्श गुप्तचर काव

छोटा राजनच्या अटकेच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व माजी गुप्तवार्ता विभाग (आयबी) प्रमुख अजित डोवल यांचे नाव पुन्हा चच्रेत आले आहे. डोवल यांनी छोटा राजनच्या अटकेत मोलाची भूमिका निभावली असावी, असा कयास माध्यमांमध्ये बांधण्यात येत आहे. याबाबतच्या अनेक दंतकथाही प्रसृत करण्यात येत आहेत. याचा उल्लेख ‘अन्वयार्थ’मध्ये (२८ ऑक्टो.) अशा प्रकरणांमधील प्रमुखांच्या कथित सहभागाची चर्चा होणे व ती होऊ देणे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुचित व घातक आहे. गुप्तहेरांबद्दलच्या त्यांच्या भूतकाळातील घटना व भविष्यातील चाली व डावपेचांबाबत नेहमीच गुप्तता राखणे हे प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते. आपल्या देशात मात्र सर्वच गोष्टीचे श्रेय घेण्याची धडपड दिसून येते. प्रसिद्धीच्या हव्यासाने अतिसंवेदनशील अशा अधिकाऱ्यांनाही ग्रासले आहे असे वाटते. आजच डोवल यांनी जनरल मुशर्रफ यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया अनावश्यक असून आपल्या धोरणातील उथळपणा दर्शविते. असे बोलणे टाळता आले असते तर हितावह ठरले असते. याला एकमेव सन्माननीय अपवाद म्हणजे रॉ-चे प्रथम प्रमुख रामेश्वरनाथ काव हे आहेत हे आवर्जून सांगावेसे वाटते. म्हणूनच त्यांच्याबरोबर काम केलेले सर्व सहकारी त्यांची मुक्तकंठाने स्तुती करताना आढळतात.
या पाश्र्वभूमीवर अजित डोवल यांची वर्तणूकपदाला साजेशी आहे असे म्हणता येणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल पूर्ण आदर राखूनही दुर्दैवाने असे म्हणावे लागते. पुढे घेतल्या जाणाऱ्या कार्यवाहीच्या अनुषंगाने त्यांच्या नावाचा वापर होणे हे मारक असून आपले डावपेच उघडे होण्याची भीती त्यात सामावलेली आहे. ‘कोव्हर्ट अ‍ॅक्शन’ जर अशा प्रकारे ‘ओव्हर्ट’ होऊ लागली तर उद्दिष्ट गाठणे दुरापास्त होते हे गुप्तहेर जगतातील मूलतत्त्व आहे. म्यानमारमध्ये कार्यवाही केल्यावर ज्या प्रकारे नको तितका तपशील देण्यात आला व डोवल यांनी यात कधी कसे व काय केले या बातम्यांना पाय फुटले व फुटू दिले हे देशहिताचे नक्कीच नव्हते.
बांगलादेश मुक्त करण्यात रामेश्वरनाथ काव यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मात्र याचे श्रेय स्वत:कडे कधीच घेतले नाही. सार्वजनिक मंचावर त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न केला असता असे करणाऱ्यांना त्यांनी यापासून परावृत्त केले. ‘इदं न् मम’ या भूमिकेतूनच त्यांनी कर्तव्य पार पाडले. इतकेच नव्हे तर सर्व श्रेय बांगलादेशवासीयांनाच दिले. १९७७ साली जनता पक्ष सत्तेत आल्यावर मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी यांनी काव यांना अपमानास्पद वागणूक दिली. मात्र बराच काळ लोटल्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धानंतर आपल्या यंत्रणेचे कोठे चुकले व आपण कुठे कमी पडलो हे जाणून घेण्यासाठी वाजपेयींना याच रामनाथ काव यांचा सल्ला घ्यावासा वाटला. काव यांनीही आधीचा अपमान मनात न ठेवता वाजपेयी सरकारला मोलाचा सल्ला देऊन आपल्या देशनिष्ठेचे व सचोटीचे दर्शन घडविले. निकटचे सहकारी सोडल्यास कोणासही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत मागोवा लागणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. म्हणूनच ते आदर्श हेर मानले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुप्तहेर जगतात त्यांना मानाचे स्थान होते. १९५५ साली चिनी पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना विशेष पदक बहाल केले होते. असा सन्मान आपल्या देशातील इतर कोणत्याही गुप्तहेर अधिकाऱ्याला प्राप्त झाल्याचे स्मरत नाही. या ‘अनसंग हिरो’ने २० जानेवारी २००२ रोजी अनेक संवेदनशील गुपिते कवटाळत व गौरवशाली मोहिमांच्या स्मृती मागे ठेवत या जगाचा निरोप घेतला. काव यांच्या या तेजस्वी पाश्र्वभूमीवर डोवल यांचा माध्यमातील झगमगाट उथळ व अपरिपक्व वाटतो.
– सतीश भा. मराठे, नागपूर

पुराव्याशिवाय पुरस्कारवापसी?

$
0
0

‘वावदुकी वापसी’ या अग्रलेखात (३० ऑक्टो.) आपण पुरस्कारवापसीच्या षड्यंत्राचा खरपूस समाचार घेऊन मंत्र्यांच्या विदूषकी वक्तव्याला वेसण घालण्यात पंतप्रधान कमी पडत आहेत हेही निक्षून सांगितलेत ते बरे झाले. पुरस्कारवापसी ही एक बेजबाबदार आणि निष्क्रिय प्रतिक्रिया आहे. यातून असहिष्णुता कमी होत नसून उलट त्यात तेल ओतण्याचेच काम होत आहे. या मंडळींना हे वातावरण असेच तापत ठेवायचे आहे असे दिसते. शास्त्रज्ञ आणि इतिहासकार हे कोणत्याही निष्कर्षांला पोहोचण्यापूर्वी सबळ पुराव्याची मागणी करतात आणि मगच एखादा सिद्धान्त मांडतात किंवा इतिहास सांगतात. पण इथे मात्र थोडे काल्पनिक, थोडे अतिशयोक्तीपूर्ण असे पुरावे ग्राह्य़ मानून वातावरण फार दूषित झाले आहे, असे छातीठोकपणे सांगत आहेत ही त्यांच्या ज्ञानाशी आणि व्यासंगाशी त्यांनीच केलेली प्रतारणा ठरते (तेव्हा अशा भोंगळ इतिहासकारांनी आणि शास्त्रज्ञांनी पुरस्कार परत केले ते बरेच झाले.). एरवी अभिजन अल्पसंख्य असतात असा टेंभा मिरवणारी मंडळी १०० जणांनी पुरस्कार परत केले, १५० लोकांनी निषेध केला असे सांगतात तेव्हा या देशात सत्तेत आलेले सरकार हे बहुसंख्यांनी निवडून दिलेले सरकार आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरतात. विरोधी राजकीय पक्षाला आपला अजेंडा राबवण्याचे मोकळे रान मिळू नये, अशी राजनीती आखण्यात हे सरकार कमी पडते आहे. घाऊक पुरस्कारवापसीचा हाही अर्थ निघतो.

– गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)
आंदोलनातूनच शिक्षण

‘वावदुकी वापसी’ हा अग्रलेख खूप एकांगी वाटला. एफटीआयआय ही संस्था केंद्रात भाजप सत्तेत आली तेव्हाच त्यांच्या हाती गेली. भाजपमध्ये अनुपम खेर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखी अनुभवी मंडळी असताना गजेंद्र सिंग सारख्या दुय्यम दर्जाच्या माणसाची या संस्थेवर वर्णी लागते ही बाब तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला किंचितही स्पर्श करत नाही ?ही संस्था अप्रत्यक्षपणे सरकार म्हणजे लोकाश्रयावर चालते ना की कोणाच्या राजकीय भिकेवर! विद्यार्थीच्या गुणवत्तेवर आपण उठवलेला प्रश्न बिनबुडाचा आहे. कारण निवड परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यातून स्वतला सिद्ध करून त्यांना प्रवेश मिळाला आहे. राहिला प्रश्न तो आंदोलनाचे १४० दिवस व्यर्थ जाण्याचा. तर विद्यार्थीदशेतच कलेच्या वेगवेगळ्या माध्यमातून सरकापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचे तंत्र या दिवसांतच आत्मसात केले. आंदोलनालाच अभ्यासक्रम समजून या काळात चित्रपट, नाटके, कलाकृती, संगीत व अभिनयाद्वारे स्वत:मधील कलागुणही विकसित केले आहेत.

– अतुल पोठपोडे, नितीन सोनवणे
खेळता येईना,खेळपट्टी वाकडी..!

सध्या भारतीय क्रिकेट संघाची कृती ‘खेळता येईना..’ या धर्तीवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताला घरच्या मदानांवर पराभव स्वीकारावा लागला. त्यातील राजकोट व मुंबईतील खेळपट्टय़ा (जिथे भारताचा पराभव झाला) चच्रेत आल्या.
राजकोट येथील खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करताना खेळपट्टी नंतर संथ होत गेली. त्यामुळे विराटला व मला धावा काढता आल्या नाहीत, असे स्पष्टीकरण सामन्यानंतर धोनीने दिले. तर वानखेडेची खेळपट्टी खूपच पाटा होती. त्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाजांना कोणतीच मदत मिळत नव्हती. आफ्रिकेने धावांचा डोंगर उभारला व आपला पराभव झाला, असे स्पष्टीकरण दिले. तसेच अशी पाटा खेळपट्टी बनवल्यामुळे रवी शास्त्रीने सुधीर नाईक यांना अपशब्द वापरून नवीन वाद निर्माण केला. चेन्नईतील सामन्यात नाणेफेक जिंकावी म्हणून धोनीने (शकुन म्हणून) नाणेफेक उजव्या हाताने न उडवता डाव्या हाताने उडवली. या सर्व बाबींवरून असे लक्षात येते की, भारतीय संघ त्यांच्यातील खेळ-कौशल्याने सामने जिंकण्याऐवजी खेळपट्टी, नाणेफेक अशा गोष्टींवर जास्त अवलंबून आहे. या गोष्टींचा विचार पाहुण्या संघाने करणे एक वेळ समजू शकतो; परंतु स्वत:च्या घरात आयुष्यभर ज्या मदानांवर आपण खेळतो, तिथे अशा गोष्टींवर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही.
त्यात अजून एक बाब सांगाविशी वाटते की, धर्मशाला येथे झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पंचांचा निर्णय चुकल्याने भारताचा पराभव झाला, असे सांगून भारतीय संघाने पंचांची तक्रार बीसीसीआयकडे केली आहे. कितीही मोठा पंच असला तरी कधी तरी चुका होणारच. पंच चुकतात म्हणून डीआरएसएस तंत्रज्ञान आणले गेले. त्यालाही सर्वाधिक विरोध भारतीय संघाचाच आहे. डीआरएसएस तंत्रज्ञान हे १००% अचूक नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघाचा विरोध आहे. परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय त्यातील दोष कसे समजणार?
– गणेश मारुती तांबे, उरुळी कांचन (पुणे )

सहृदयी लेखिका

प्रसिद्ध लेखिका, मराठी-कन्नड अनुवादिका मीना वांगीकर यांच्या निधनाने मराठी-कानडी सारस्वतातील एक अतिशय संवेदनशील सहृदयी आणि भाषाहितैषी स्नेही गमाविल्याचे शल्य निश्चितच मनात कायम जाणवत राहील. समरसता साहित्य परिषदेच्या सुरुवातीच्या काळातल्या बैठका या मीनाताईंच्या जंगली महाराज रोडवरील घरी होत असत. दरमहा त्या न कंटाळता बैठकीसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करीत. साहित्यविषयक तसेच साहित्य वर्तुळातील चर्चेबरोबरच कर्नाटकी पद्धतीची पुरणपोळी, इडली-सांबर, आप्पे असे नवनवीन खाद्यपदार्थ उपस्थितांना खाऊ घालण्यासाठी त्यांची कायम लगबग चालत असे. त्या नेहमी आपल्या मतावर ठाम असत. परंतु कोणत्याही परिस्थितीत बैठकीतल्या चर्चा/निर्णयावर अधिक्षेप, अतिक्रमण होणार नाही, याचीही त्या काळजी घेत. त्यांची मातृभाषा कन्नड असूनही त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या कादंबऱ्या वाचताना ‘यें हृदयीचे ते हृदयी’ अशा भाव-भावनांचा मनस्वी प्रत्यय येतो. यातून त्यांचे मराठीवरले प्रभुत्व आणि प्रेमच दिसते. पुण्यात झालेल्या पाचव्या समरसता साहित्य संमेलनात ‘स्त्री साहित्य आणि समरसता’ या विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणही अजून स्मरते. मराठी-कन्नड या भाषा भगिनींविषयी प्रचंड आस्था असलेल्या मीनाताईंना, कन्नड-मराठी भाषा संवर्धनाचे पुरस्कर्ते आणि पु. ल. देशपांडे यांच्या सर्व साहित्याचे कन्नड अनुवादक डॉ. अ. रा. तोरो यांच्याबद्दलही विशेष आपुलकी होती.
– सुनील भंडगे, पुणे

Viewing all 2339 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>