Quantcast
Channel: Lokmanas Marathi News, Lokmanas Latest Marathi News, Lokmanas News Headlines & Updates | लोकमानस मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta
Viewing all articles
Browse latest Browse all 2339

लोकमानस : चैत्यभूमी, संसद-प्रांगणातील पुतळा यांचे श्रेय कर्मवीर गायकवाड यांचे नव्हे…

$
0
0

‘आंबेडकरी चळवळीचे सरसेनापती ‘ हा चंद्रकांत बच्छाव यांचा रिपब्लिकन  नेते  दादासाहेब गायकवाड  यांच्या ५० व्या  स्मृतिदिनानिमित्त  लिहिलेला लेख  (लोकसत्ता, २९ डिसेंबर) वाचला. त्यांचे लेखन शैलीदार असून, त्यातून दादासाहेबांचे शब्दचित्रच आपल्या  डोळ्यापुढे  उभे राहते. असे असले तरी लेखात  काही  खटकणाऱ्या व चुकीच्या  गोष्टीही आहेत-

‘१९५७ च्या  संयुक्त  महाराष्ट्र चळवळीचा रिपब्लिकन पक्ष  म्हणजे दादासाहेब  कणा होते’ असे विधान  लेखात आहे, पण पक्ष नेहमीच व्यक्तीपेक्षा मोठा  असतो. शिवाय  त्याकाळी एन. शिवराज,  आर.  डी. भंडारे, बी.सी. कांबळे, बॅ. खोब्रागडे आणि बी. पी. मौर्य  आदी  इतरही मोठे नेते पक्षात होते  व बाबासाहेबांचा आदेश  असल्यामुळे  संयुक्त महाराष्ट्रासाठी  हे सर्वच नेते झटत होते.

बच्छाव यांनी दादासाहेबांना ‘चैत्यभूमीचे शिल्पकार’ही म्हटले आहे. परंतु ते खरे नाही. रिपब्लिकन  नेते  व खासदार  म्हणून दादासाहेबांनी चैत्यभूमीची जमीन  मिळवून  दिलीही असेल! परंतु  तेवढ्याने ते काही शिल्पकार ठरत नाहीत. चैत्यभूमीचे खरे शिल्पकार हे भैयासाहेब  आंबेडकर  होते. त्यांनीच महू ते मुंबई ‘भीमज्योत यात्रा’ काढून  कोणाकडेही भीक न मागता लोकवर्गणीतून आंबेडकरी जनतेच्या  अस्मितेचे  व स्वाभिमानाचे प्रतीक असलेली चैत्यभूमी उभारली. ज्याप्रमाणे नागपूरच्या दीक्षाभूमीचे निर्विवाद  शिल्पकार रिपब्लिकन नेते अॅड.  हरिदासबाबू आवळे हे आहेत, त्याचप्रमाणे चैत्यभूमीचे निर्विवाद शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  चिरंजीव  भैयासाहेब  आंबेडकर  हे आहेत. दादासाहेब  वा  अन्य कोणाचे नाव पुढे करून त्यांचे श्रेय हिरावून घेणे योग्य  नाही.

नवबौद्धांना त्यांनी  केलेल्या  जनआंदोलनाच्या रेट्यामुळेच १९६३ सालीच यशवंतराव चव्हाण  मुख्यमंत्री  असताना महाराष्ट्र  सरकारने  सवलती दिल्या  होत्या. काँग्रेस- रिपब्लिकन  युती ही १९६७ साली  झाली. ‘युती केल्यामुळे  सवलती मिळाल्या’   हे लेखातील सूचन चुकीचे आहे. तसेच  संसदेच्या  प्रांगणात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी, १९६४ च्या  सत्याग्रहातील १४ मागण्यांपैकी एक  होती व हा पुतळा १९६६ साली  बसवण्यात  आला. त्यामुळे  या दोन्ही  गोष्टींचा १९६७ साली  झालेल्या  काँग्रेस-  रिपब्लिकन  युतीशी काही संबंध  नाही.  काँग्रेस- रिपब्लिकन  युतीचे समर्थन हे बच्छाव यांचे वैयक्तिक  मत आहे. ते म्हणतात त्या प्रमाणे  काही नेत्यांना पदे व नेमणुका, काही अधिकाऱ्यांना नोकऱ्या, बढत्या  मिळाल्याही असतील; परंतु आज जी रिपब्लिकन  पक्षाची अवस्था झाली तिला हीच  काँग्रेस- रिपब्लिकन  युती कारणीभूत आहे. सामाजिक  अभिसरणाच्या गोंडस नावाखाली  यशवंतराव चव्हाणांनी केलेली  ही युती प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे राजकीय  वस्त्रहरण   ठरली! – राजेंद्र भास्करराव भोसले, पुणे

‘अकादमी’-विजेत्या मराठी पुस्तकांच्या नावांत इंग्रजी शब्द!

‘साहित्य अकादमीकडून तरुण लेखकांचा सन्मान’ ही बातमी (लोकसत्ता-३१ डिसेंबर) वाचली. २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमीने युवा पुरस्कार घोषित केले. त्यात मराठीत किरण गुरव, प्रणव सखदेव, आणि संजय वाघ या तीन तरुण लेखकांना हा पुरस्कार मिळाला. त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. पण तिघांच्याही पुस्तकांची शीर्षके पाहा. दोन-तीनच शब्दांच्या त्यांच्या मराठी पुस्तकाच्या शीर्षकांत सुद्धा इंग्रजी शब्द का यावा?

 किरण गुरव यांच्या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे नाव ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’-आता डायरीला मराठी शब्द रोजनिशी आहे आणि तो पुरेसा प्रचलित आहे. प्रणव सखदेव यांच्या पुस्तकाचं नाव – ‘काळेकरडे स्ट्रोक्स’. स्ट्रोक्सला ‘फराटे’, ‘फटकारे’ वगैरे किती छान मराठी प्रतिशब्द आहेत! मग मराठी पुस्तकाला हेच नाव का? संजय वाघ यांच्या पुस्तकाचं नाव ‘जोकर बनला किंगमेकर’. यात मराठी शब्द तर शोधावेच लागतील. साहित्याच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश तरी ‘भाषेच्या सौंदर्याचे व  शुद्धीकरणाचे प्रबोधन’ हा असायलाच हवा. पूर्वी एकदा प्रसिद्ध लेखिका/दिग्दर्शिका सई परांजपे यांनी हाच मुद्दा मांडला होता की मराठी नाटकांची नावे इंग्रजीत कशासाठी?

अनिल फळणीकर, अंधेरी पश्चिम(मुंबई)

संगीत सामान्यजनांमुळे टिकते, बहरते हे पटले!

‘संगीतखुर्ची’ हे शनिवारचे संपादकीय (१ जानेवारी)वाचले. संगीत सामान्यजनांमुळे टिकते आणि बहरते हे त्यातील विधान पटले, याला मुद्दाम सांगण्याजोगे एक वैयक्तिक कारण आहे. रिक्षा किंवा टॅक्सीत जी गाणी किंवा संगीत वाजते ते सहसा लोकप्रिय गणले जाते. याचा अर्थ असा नव्हे की या वाहनांत केवळ कंठाळी संगीत वाजते. मागे एकदा मी एका रिक्षावाल्याला त्याने लावलेले कंठाळी संगीत बंद करायची विनंती केली तर त्याने मला माझी आवड विचारली. मी ‘मदन मोहन’ म्हणताच त्याने रिक्षा बाजूला उभी केली आणि मदन मोहनची गाणी शोधून लावली!

विमानात खरे तर  हेडफोनवर विविध चॅनल्सवर विविध प्रकारचे संगीत ऐकण्याची सोय असते पण अलिकडे जनतेने काय खायचे, कोणते कपडे परिधान करायचे , कुणाला भजायचे हे सारे हिंदु धर्ममार्तंड ठरवणार सहाजिकच याच यादीत आता आम्ही काय ऐकायचे , काय गायचे याचीही भर पडली तर नवल वाटायला नको. केंद्र सरकारची ही ‘मन की बात’ कुणी जाहीरपणे अमान्य केल्यास उद्या तसे करणाऱ्यांना देशद्रोहीसुध्दा ठरवले जाऊ शकते. 

अॅपड एम.आर. सबनीस, अंधेरी पूर्व (मुंबई)

आता फक्त अंमलबजावणी चालू आहे…

‘विश्वामित्र आणि विश्वामित्र’ शीर्षकाचे पत्र (लोकमानस- १ जानेवारी)वाचले. पत्रलेखकांनी हेच सूक्ष्मदर्शक यंत्र यापूर्वीच्या राज्यकर्त्यांवर व  सात-आठ शतकांच्या इतिहासावर वळवावे.  आठवा ते इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या शीखांच्या हत्याकांडानंतर  राजीव गांधींचे  उद्गार,  मुंबई बॉम्बस्फोट मालिका व २६/११ चा हल्ला,  गुजरातचे गोध्रा जळितकांड व अक्षरधाम मंदिरावरील हल्ला, इतर अनेक अतिरेकी हल्ले…

हिंदू समाज हा नेहमीच सहिष्णू, संवेदनशील व असंघटित राहिल्यामुळेच बहुसंख्येने असूनही अनेक शतके गुलामगिरीत राहिला. तो कधीच आक्रमक नव्हता. स्वातंत्र्यानंतर, बहुसंख्याक असूनही, राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे हिंदू समाजाला सतत असुरक्षित वाटत आले आहे. आता त्याची बाजू समजून घेणारे सरकार आले आहे. भाजपचा अजेंडा सर्वश्रुत आहे. आता त्याची फक्त अंमलबजावणी चालू आहे. काही लोक उन्मादाने गैरवर्तन करत आहेत, याची खंत सर्वांनाच वाटते; परंतु कुठलाच समाज परिपूर्ण नसतो हा न्याय हिंदूनाही मिळावा.

मोदींना बहुमताने निवडून दिलेल्या भारतीय मतदारांना याची पुरेपूर जाणीव आहे. तरीही पत्रलेखकाने, ‘सुशिक्षित  मध्यमवर्गाचा एक मोठा हिस्सा मोदींच्या भजनी लागला’ असे शब्द वापरून या मध्यमवर्गाच्या आकलनशक्तीचा अपमान केला आहे.

राघवेंद्र मण्णूर , डोंबिवली

शासकीय कर्मचाऱ्यांना उशिराची सवलत देताना शहरा-शहरांमध्ये भेदभाव नको

‘शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबईतील कार्यालयात उशिरा येण्याची सवलत’ ही बातमी (लोकसत्ता ३० डिसेंबर) वाचली. या अनुषंगाने एक विचार असा मनात येतो की जे कर्मचारी बाहेर गावाहून मुंबईत कामाला  येतात याचा सरळ अर्थ ते मुंबईत राहत नाहीत. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा घरभाडे भत्ता देते. हा एक प्रकारे घरभाड्यासाठी सबसिडी देण्याचा प्रकार आहे. आता जे कर्मचारी मुंबईत राहात नाहीत त्यांना मुंबई शहराला जो घरभाडे भत्याचा दर लागू आहे त्या दराने घरभाडे भत्ता देणे योग्य की अयोग्य हे शासनाने ठरवावे. कर्मचारी ज्या ठिकाणी राहतो व जिथून कामावर येण्यासाठी वेळेची सवलत मागतो त्या ठिकाणचा घरभाडे भत्ता त्याला मिळायला हवा. असे केले तरच घरभाडे भत्ता देण्यामागील जो तर्क आहे त्याला अर्थ असेल.

मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांतही जी शासकीय कार्यालये आहेत तेथील  कर्मचाऱ्यांना अशी सवलत देण्याचा शासनाने विचार करायला हवा.आज हजारो कर्मचारी नागपूर, पुणे, औरंगाबाद , नाशिक येथील कार्यालयात नजीकच्या गावांतून नोकरीसाठी येतात. शासनाने उशिरा येण्याची सवलत देताना मुंबईत नोकरीसाठी येणारे कर्मचारी व  इतर शहरांत येणारे कर्मचारी असा भेदभाव करू नये.

रविंद्र भागवत, कल्याण पश्चिम   

नववर्षाचा संकल्प

राज्यात पुन्हा करोना आणि त्याची भावंडे आपला छळ करायला आली आहेत. म्हणून राज्य सरकारने पुन्हा कठोर निर्बंध लादणे अनिवार्य आहेच. ते पाळणे जनतेचे स्वहिताच्या दृष्टीने उपकारकचआहे.

खरे तर नववर्षाचा हाच संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे! 

याबरोबरच सर्व राजकीय पक्षांना कळकळीची विनंती आहे की सध्या त्यांनी कोणत्याही कारणास्तव आक्रस्ताळोणा करू नये- तूर्तास मेळावे, सभा, आंदोलने स्थगित ठेवावीत. लग्न समारंभास  ताफा घेऊन जाऊ नये. जनता व नेते, त्यांचे कार्यकर्ते व सुरक्षारक्षक…  सर्वच आरोग्यदृष्ट्या चांगले राहणे ही सध्याची गरज आहे.

सुधीर ब. देशपांडे, विलेपार्ले पूर्व (मुंबई)

मुखपट्टी तरी लावा!

नववर्षदिनीच ‘रुग्णवाढीच्यावेगाची चिंता’हे वृत्त वाचले. करोनाबाधित आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढणार, असे आकडेवारीच सांगते आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत तो ‘मुखपट्टीचा सुयोग्य वापर’ सर्वांनी करणे फार गरजेचे आहे. हा सर्वात योग्य आणि सहजपणे अंमलात आणता येण्याजोगा उपाय! पण मुखपट्टी न लावण्याचा प्रयोग सर्रासपणे आपल्याकडे दिसून येतो. मग ती धार्मिक स्थळे असोत की मॉल्स-बाजारपेठा की बस-लोकल सारखी सार्वजनिक वाहतुक साधने. जणू, ‘इतरांनाच कोविड होणार…आपल्याला मुखपट्टीची गरजच नाही!’ असा अविर्भाव अनेकांचा दिसतो!

राजेश श्रीराम बुदगे, ठाणे पश्चिम

दुकाने बंद… प्रचारासाठी मात्र गर्दी!

शाळा बंद करणे व संचार बंदी लागू करणे हे तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करेल असा विचार सरकार करतेच कसा?  ५० टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले  तरी त्यांना घरात बसवून ठेवायचे; प्रचारासाठी मात्र गर्दी करायची! जरी तिसरी लाट आली तरी शाळा व दुकाने बंद करून घरात बसणे ना सरकारला परवडणारे ना आपल्या अर्थ व्यवस्थेला.  दुसऱ्या लाटे दरम्यान झालेल्या चुका टाळताना नव्या चुकाही टाळल्या पाहिजेत. – अक्षता अनिल रूपणवार, हडपसर (पुणे)

जमावबंदी आहे ना?

करोना तसेच ओमायक्रोनमुळे ‘रुग्णवाढीच्या वेगाची चिंता’ तर आहेच. त्यामुळे शासनाने त्वरित जमावबंदीचा निर्णय घेतला परंतु मुंबईतील शाकाहारी,मांसाहारी मंडया, दादर फूलबाजार गर्दीने तुडुंब दिसत आहेत. जमावबंदीचे निकष कुणालाही समजलेले दिसत नसावेत… अगदी पोलिसांनासुद्धा! कारण यासंबंधीची कारवाई झालेली आढळलेली नाही.त्याची अर्थपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच सुयोग्य अशी याबाबतच्या नियमांबद्दल जागरूकता जनतेमध्ये निर्माण केल्यासच या महामारीच्या प्रसारास आळा बसू शकेल!

चंद्रशेखर कमळाकर दाभोळकर, भांडुप पश्चिम (मुंबई)

The post लोकमानस : चैत्यभूमी, संसद-प्रांगणातील पुतळा यांचे श्रेय कर्मवीर गायकवाड यांचे नव्हे… appeared first on Loksatta.


Viewing all articles
Browse latest Browse all 2339

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>