कर्नाटक राज्यातल्या बंगळूरु शहरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची काही जणांनी विटंबना केली. आपण त्यांची गणना ‘समाजकंटक’ या वर्गात करू शकतो. पण या घटनेला ‘क्षुल्लक’ समजून तिचा उल्लेख ‘लहानसहान’ असा करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. आणि त्यांनी केलेले हे विधान अज्ञानापोटी नसेल तर त्यांच्या हिणकस वृत्तीविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल. ज्यांच्या राजनीतीचा अभ्यास परदेशातही केला जातो एवढ्या महान व्यक्तिमत्त्वाच्या शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ही क्षुल्लक गोष्ट समजणाऱ्या माणसाने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान होणे हा त्या खुर्चीचा अवमान आहे. नुकतेच, देशाच्या पंतप्रधानांनी शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढलेले असताना त्यांच्याच पक्षाच्या एका मुख्यमंत्र्याने शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेला क्षुल्लक घटना समजणे हे पंतप्रधानांच्या मताला आव्हान देण्यासारखे आहे. शिवराय आणि त्यांच्या राजकारणाबद्दल थोडीफार माहिती असती तर मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले असते असे वाटत नाही. निर्जीव पुतळ्यांची विटंबना करून आपल्या मनातील शिवरायांची प्रतिमा डागाळणार नाही, हे सर्वांनाच माहीत असले तरी सनदशीर मार्गाने समाजकंटकांना शिक्षा आणि संबंधित मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. – शरद बापट, पुणे
ती तर ‘दस्तऐवजी’ पुरावा नसलेली निराधार गोष्ट!
‘धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वालाच सुरुंग’ हे पत्र (१५ डिसेंबर) वाचले. त्यातील ऐतिहासिक बाबींविषयी अधिक खुलासा पुढे करीत आहे.
मआसिर-इ आलमगिरीत १७ झी अल-कादा, जुलूस सन १२ (८ एप्रिल १६६९) या तारखेखाली पुढील नोंद आहे:
‘धर्मरक्षक (दीन पर्वर) बादशाहांना कळविण्यात आले की, ठठ्ठा व मुलतान या सुभ्यांमध्ये, आणि विशेषत: बनारस येथे, ब्राह्मण त्यांच्या प्रस्थापित पाठशाळांमध्ये (मदारस) खोटी पुस्तके शिकविण्यात मग्न असतात आणि हिंदू व मुसलमान इच्छुक व विद्यार्थी अशुभ विद्या प्राप्त करण्याकरिता दूर अंतरांवरून त्या मार्गभ्रष्ट लोकांकडे येतात. इस्लामनुसार प्रशासन करणाऱ्या (इस्लाम निझाम) बादशाहांचे सर्व सुभ्यांच्या सुभेदारांना हुकूम सादर झाले की कुधर्मी लोकांच्या पाठशाळा व त्यांची उपासनास्थाने पाडून टाकावीत आणि काफिरांच्या धर्माचे अध्ययन, अध्यापन व जाहीर आचरण अत्यंत तातडीने बंद पाडावे.’
धर्मरक्षक म्हणजे कोणत्या तरी धर्माचा, किंवा सर्व धर्मांचा रक्षक नव्हे. इस्लामचा रक्षक, खोटी पुस्तके म्हणजे इस्लामेतर धर्माची पुस्तके, अशुभ विद्या म्हणजे इस्लामेतर धर्माशी संबंधित विद्या, मार्गभ्रष्ट म्हणजे गैरइस्लामी मार्गाने जाणारे, आणि कुधर्मी म्हणजे इस्लामेतर धर्माचे आचरण करणारे, असे अर्थ वरील उताऱ्यात अभिप्रेत आहेत.
डच ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीतील निकलस डी ग्राफ १६७० मध्ये बंगालमधील हुगळी येथे होता. औरंगजेबाच्या वरील हुकमाचे वृत्त त्याला समजले होते. तो लिहितो :
‘जानेवारी महिन्यात सर्व सुभेदारांना आणि मुसलमान अधिकाऱ्यांना सर्व राज्यात हिंदू धर्माच्या आचरणावर बंदी घालावी आणि मूर्तिपूजकांची सर्व देवळे बंद करावीत असा बादशाहाचा हुकूम मिळाला.’*
मआसिर-इ आलमगिरीत २ सप्टेंबर १६६९ आणि १४ सप्टेंबर १६६९ या दोन तारखांच्या दरम्यान पुढील नोंद आहे.
‘कळविण्यात आले की बादशाहांच्या हुकमानुसार काशी विश्वनाथाचे देऊळ (बुतखाना-इ काशी विश्वनाथ) पाडून टाकण्यात आले.’
काशी विश्वनाथाचे देऊळ औरंगजेबाने का पाडले याविषयी पट्टाभि सीतारामय्या यांनी एक गोष्ट सांगितली आहे. भोगराजू पट्टाभि सीतारामय्या (१८८०-१९५९) हे आंध्र प्रदेशातील एक काँग्रेस पुढारी. १९४८ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते अहमदनगरच्या किल्ल्यात कैदेत असताना त्यांनी ऐकलेल्या व वाचलेल्या गोष्टी किंवा त्यांना सुचलेले विचार त्यांनी एका वहीत लिहून ठेवले. त्यांची सुटका झाल्यावर त्यांची ही टिपणे, ‘फेदर्स अॅण्ड स्टोन्स’ अशा नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकाला विशिष्ट असे काही सूत्र नाही. ते संकीर्ण स्वरूपाचे लेखन आहे. त्यात पृष्ठ १७८-७९ वर सांगितलेली एक गोष्ट अशी आहे :
‘औरंगजेब धर्मवेडा होता अशी एक समजूत लोकांमध्ये आहे. पण एका विशिष्ट (विचारसरणीच्या) गटाचे लोक याचा प्रतिवाद करतात. एक-दोन प्रसंग त्याच्या धर्मवेडाची उदाहरणे म्हणून सांगितली जातात. काशी विश्वेश्वराच्या मूळच्या देवळाच्या जागी मशीद बांधली हे असे एक उदाहरण आहे, तशीच मथुरेतील एक मशीद हे दुसरे एक उदाहरण आहे. जिझिया पुन्हा लागू करणे हे तिसरे उदाहरण आहे. पण ते वेगळ्या प्रकारचे आहे. औरंगजेब त्याच्या वैभवाच्या शिखरावर असताना एखाद्या देशातील कोणत्याही परकीय बादशाहाप्रमाणे त्यानेही त्याच्या सेवेत अनेक हिंदू उमराव बाळगले होते. ते सर्व जण एक दिवस बनारसचे पवित्र देऊळ पाहाण्यास निघाले. त्यांच्यात कच्छची एक राणीही होती. जेव्हा ते लोक देवळाला भेट देऊन परतले तेव्हा कच्छची राणी गायब होती. त्यांनी आत व बाहेर, पूर्वेला, उत्तरेला, पश्चिमेला व दक्षिणेला तिचा शोध घेतला; पण तिचा काही थांग आढळत नव्हता. शेवटी, ज्याला फक्त दोन मजले असल्याचे दिसत होते त्याचा अधिक झटून शोध घेतल्यावर त्या देवळाला एक तहखाना म्हणजे तळघर असल्याचे उघड झाले. तेव्हा त्याच्याकडे जाणारा मार्ग बंद असल्याचे आढळले तेव्हा त्यांनी दारे तोडली आणि त्यांना आत दागिने गमावून बसलेल्या राणीची फिकट आकृती दिसली. धनिक व दागिन्यांनी लगडलेले यात्रेकरू हेरायचे, त्यांना देऊळ दाखविताना फसवून तळघरात न्यायचे आणि त्यांचे दागिने लुटायचे हा महंतांचा धंदा होता असे उघड झाले. त्यांच्या जीविताचे नेमके काय झाले असते ते कोणाला ठाऊक नव्हते. कसेही असले तरी या प्रकरणात तपास झडून व लगेच केला गेल्याने अधिक काही करण्यास वेळ नव्हता. पुजाऱ्यांचा दुष्टपणा समजल्यावर औरंगजेबाने लुटीचे असे ठिकाण हे देवाचे घर असू शकत नाही असे जाहीर केले आणि ते लगेच पाडून टाकण्याचा हुकूम दिला. त्याचे अवशेष तिथेच राहू देण्यात आले. परंतु जी अशा प्रकारे वाचली होती त्या राणीनेच उद्ध्वस्त देवळाच्या जागी मशीद बांधण्याचा आग्रह धरला आणि तिला खूश करण्याकरिता नंतर एक मशीद (तिथे) बांधण्यात आली. अशा प्रकारे काशी विश्वेश्वराच्या देवळाच्या शेजारी मशीद अस्तित्वात आली. ते देऊळ हे खऱ्या अर्थाने देऊळ नसून ज्यात शिवाची संगमरवरी पिंड आहे असे सामान्य खोपटे आहे. मथुरेच्या मंदिराविषयी काही ज्ञात नाही. बनारसच्या मशिदीची ही गोष्ट लखनऊ येथील एका दुर्मीळ हस्तलिखितात दिलेली होती. ते एका आदरणीय मुल्लाच्या ताब्यात होते आणि त्याने त्यात ती गोष्ट वाचली होती. ज्या मित्राला त्याने ही गोष्ट सांगितली होती त्याला ते हस्तलिखित धुंडाळून देण्याचे त्याने जरी वचन दिले होते तरी त्याची पूर्तता न करताच तो मरण पावला होता. ती गोष्ट फारशी ज्ञात नाही आणि औरंगजेबाविरुद्धचा पूर्वग्रह कायम आहे असे सांगितले जाते.’
पट्टाभि सीतारामय्या यांना ही गोष्ट कोणी व कधी सांगितली ते त्यांनी नमूद केलेले नाही. मुल्लाने त्याच्या ज्या मित्राला ही गोष्ट सांगितली असे ते म्हणतात त्या मित्राने ती कदाचित त्यांना सांगितली असेल. मुल्लाने ज्या हस्तलिखितात ती वाचल्याचे सांगितले होते त्या हस्तलिखिताविषयीही काहीही तपशील पट्टाभि सीतारामय्या यांच्या गोष्टीत नाही. पट्टाभि सीतारामय्या यांनी ना मित्राचे नाव सांगितले, ना मुल्लाचे, ना हस्तलिखितांचे! मित्र गायब, मुल्ला गायब आणि हस्तलिखितही गायब!! आणि अशा या गोष्टीला पत्रलेखक सत्यकथा म्हणतात!!!
त्यांनी जी गोष्ट सांगितली तिच्याविषयी मला श्री. ना. ग. गोरे (१९०७-१९९३) यांच्याकडून मिळालेली माहिती थोडक्यात सांगतो.
ना. ग. गोरे हे समाजवादी पुढारी होते आणि लोकसभेचे व नंतर राज्यसभेचेही सदस्य होते. ते पुण्याला सदाशिव पेठेत जिथे राहात असत तिथून जवळच मी भाड्याच्या खोलीत काही वर्षे राहात होतो. आम्ही दोघेही हिंदळे या एकाच गावचे असल्याने मी त्यांना अधूनमधून भेटत असे. पट्टाभि सीतारामय्या यांच्या पुस्तकातील वरील गोष्ट वाचल्यावर मी नानासाहेबांना (म्हणजे ना. ग. गोरे यांना) तिच्यासंबंधी प्रश्न विचारले. त्यावर नानासाहेब मला म्हणाले की त्यांनीही तशाच स्वरूपाचे प्रश्न पट्टाभि सीतारामय्या यांना विचारले होते आणि त्यावर पट्टाभि सीतारामय्या यांनी त्यांना पुढील अर्थाचे उत्तर दिले होते : ‘मी हिंदू-मुसलमानांमध्ये ऐक्य असावे अशा मताचा आहे. असे ऐक्य घडून येण्याच्या मार्गात औरंगजेब हा मोठाच अडथळा आहे असे मला आढळून आले आहे. म्हणून मी ती गोष्ट स्वत: कल्पनेने रचून सांगितली आहे.’ ही गोष्ट मी स्वत: नानासाहेबांकडून ऐकली आहे.
अर्थात पट्टाभि सीतारामय्या यांनी सांगितलेली गोष्ट काल्पनिक आहे हे सिद्धच झाले. यावर जर कोणी म्हणेल की, ‘तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर आम्ही का विश्वास ठेवावा?’ तर पट्टाभि सीतारामय्या यांच्या पुस्तकातील गोष्टीवर तरी का विश्वास ठेवावा याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.
हीच निराधार कपोलकल्पित कथा गांधीवादी नेते बी. एन. पांडे, कम्युनिस्ट लेखिका गार्गी चक्रवर्ती इत्यादींनी आपला मसाला घालून आणखी पुढे वाढवलेली आहे. पट्टाभि सीतारामय्या यांनी सांगितलेल्या गोष्टीत बी. एन. पांडे यांनी स्वत:च्या पदरचा भरपूर मसाला घातला आहे. राणीचे दागदागिने हरण करण्यात आले एवढे सांगण्यावर पट्टाभि सीतारामय्या यांनी समाधान मानले होते. बी. एन. पांडे तेवढ्यावर थांबले नाहीत; त्यांनी त्यांच्या गोष्टीत बिचाऱ्या राणीची अब्रूही हरण केली. पट्टाभि सीतारामय्या यांनी सांगितलेली गोष्ट ही खरी गोष्ट आहे असा निर्वाळा देऊन ती ‘दस्तऐवज’दार पुराव्यांवर आधारित आहे अशी थाप बी. एन. पांडे यांनी मारली आहे. ती एका मुल्लाने एका हस्तलिखितात वाचली होती असे त्याने एका मित्राला सांगितले होते, एवढेच पट्टाभि सीतारामय्या यांनी म्हटले आहे. मित्राचे नावगाव सांगितलेले नाही, मुल्लाचे नाव सांगितलेले नाही आणि हस्तलिखित कोणी, कधी व कोणत्या भाषेत लिहिले तेही सांगितलेले नाही! याला ‘दस्तऐवजी’ पुरावा म्हणत नाहीत. ती गोष्ट निराधार आहे हे सांगण्यापलीकडे तिच्यावर काही भाष्य करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. खुळचटपणा एका मर्यादेपलीकडे गेला की त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज राहात नाही. – गजानन भास्कर मेहेंदळे, पुणे
The post लोकमानस : ‘त्यांना’ सनदशीर मार्गाने जागा दाखवण्याची गरज appeared first on Loksatta.